बाष्कळ बडबड नको

रासायनिक खतांवर बंदी आणताना त्याला पर्यायी खते कोणती, हे मंत्रिमहोदयांनी सांगायला हवे. काही पर्याय हाती नसतील तर वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी अन्नधान्य आयातीची तयारी ठेवावी लागेल.
sampadkiya
sampadkiya

रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत शासनाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचा बॉँब टाकून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शेती क्षेत्र हादरून टाकले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकबंदी ठीक आहे; परंतु याबाबतसुद्धा व्यवहार्य पर्याय उपलब्ध नसताना अत्यंत घाईगडबडीने हा निर्णय घेतला गेल्यामुळे शेतीसह उद्योग-व्यवसाय क्षेत्राला अडचणी भासत आहेत. रासायनिक खतांच्या बंदीबाबतचा विचार म्हणजे शेती कशी चालते, याचे काहीही आकलन न करता केलेले अत्यंत बाळबोध वक्तव्य म्हणावे लागेल. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबनाकडे घेऊन जाणारी बाष्कळ बडबड राज्यकर्त्यांनी न केलेली बरी!  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास एक दशक देशात रासायनिक खतांचा वापर नव्हता. त्या वेळी देशाची लोकसंख्या जेमतेम ४५ कोटी होती. आपल्या पारंपरिक शेती पद्धतीने एवढ्या लोकसंख्येचीसुद्धा आपण भूक भागवू शकत नव्हतो. देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने उचललेल्या पावलात संकरित बियाणे जोडीला रासायनिक खतांचा वापर सुरू झाला आणि १९७० च्या दरम्यान आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालो. आज देशाची लोकसंख्या १२८ कोटींवर गेलेली असताना अन्नधान्याची स्वयंपूर्णतः अबाधित आहे. याचे श्रेय शेतीत आलेले संकरित वाण आणि रासायनिक निविष्ठा (खते, कीडनाशके) यांना द्यावेच लागेल. अशा वेळी रासायनिक खतांवर बंदी आणण्याचा विचार करताना त्याला पर्यायी खते कोणती, हे मंत्रिमहोदयांनी सांगायला हवे. काही पर्याय हाती नसतील, तर वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी अन्नधान्य आयातीची तयारी ठेवावी लागेल. आयातीचे अन्नधान्य कसेही असले तरी ते पदरात पाडून घ्यावेच लागते, याची आपल्याला चांगली जाण आहे.

‘अति तिथं माती’ अशी म्हण आहे. याचा अर्थ कशाचाही अतिवापर झाला तर त्याचे दुष्परिणाम दिसतातच. शेतीमालाच्या अधिक उत्पादकतेच्या हव्यासापोटी देशात रासायनिक खतांचा अती, अनियंत्रित वापर होतोय. त्यातून माती, पाणी, अन्न प्रदूषित होत आहे, हे वास्तव आहे. परंतु अशा वेळी रासायनिक खतांवर बंदी आणण्याएेवजी त्याचा संतुलित वापर कसा वाढेल, यावर केंद्र-राज्य शासन, शेती संबंधित संस्थांचा भर असायला हवा. उत्तम पीक पोषण आणि अधिक उत्पादकतेसाठी पिकाला अन्नद्रव्ये आवश्यकच असतात. जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्ये आणि पिकाची गरज यानुसार खतांचा वापर करायचा असतो. जमिनीचे आरोग्य टिकवून उत्पादन वाढ साधायची असेल तर माती परीक्षण अहवालानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पीकनिहाय सेंद्रिय, रासायनिक, जैविक खतांचा कधी, किती आणि कसा वापर करायचा हे सांगायला पाहिजे. परंतु याबाबत शासन तसेच संबंधित संस्थांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येते. पिकाचे उत्पादन घेताना एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन या महत्त्वाच्या घटकाकडे शेतकऱ्यांपासून शासनापर्यंत असे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे, होत आहे. शेणखत, गांडूळखत, पेंड, जैविक खते ही रासायनिक खतास पर्यायी नव्हे; तर पूरक खते आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांची उपलब्धता अत्यंत कमी आहे. अशा वेळी रासायनिक खतांचा वापर बंद करताना पीक पोषण आणि उत्पादकतावाढ साधणार कशी, याचा खुलासा व्हायला हवा. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती यांचा वापर काही शेतकऱ्यांकडून, मर्यादित क्षेत्रावर होतोय, ते ठीक आहे; परंतु रासायनिक खतांवर बंदी आणून अशी शेती सर्वांवर लादू नये, एवढेच!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com