एकत्र या, प्रगती साधा

अमूल या सहकारी संस्थेने मात्र सहकाराच्या भावनेबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन जपला आहे. प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीने अमूलचा हा आदर्श घेतला तर आपल्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणू शकते.
संपादकीय
संपादकीय

द्राक्षे, डाळिंब, संत्रा, आंबा, केळी बरोबर कांदा, टोमॅटो, कारले, कोथिंबिरीपर्यंत अशा अनेक फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. फळे-भाजीपाल्याच्या अधिक आणि दर्जेदार उत्पादनासाठी अत्याधुनिक तंत्राचा अवलंब राज्यातील शेतकरी करतात. अलीकडे हवामान बदलाच्या काळात फळे-भाजीपाल्यांच्या व्यवस्थापनात अडचणी येऊन त्यांची उत्पादकता घटत चालली आहे. त्यातच प्रक्रिया आणि विक्री-पुरवठा साखळीतील सोयीसुविधांअभावी अनमोल अशा शेतीमालाच्या उत्पादनाचे आकर्षक उत्पन्नात रूपांतर होताना दिसत नाही.

या समस्येवर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अत्यंत मार्मिकपणे बोट ठेवत अमूलने सहकाराच्या बळावर दुधाची अर्थव्यवस्था जशी बदलली, त्याच धर्तीवर राज्यातील फळे-भाजीपाला उत्पादकांनी एकत्र येऊन क्रांती करावी, असा सल्ला त्यांनी नुकताच दिला आहे. विशेष म्हणजे फळे-भाजीपाल्यात संशोधन, अभ्यासासाठी ‘व्हीएसआय’च्या धर्तीवर स्वतंत्र संस्थेबाबतची त्यांची संकल्पना चांगली वाटते.

सोळा हजारांच्या वर सोसायट्यांना गुजरातमधील लाखो शेतकरी दूध पुरवितात. त्यावर प्रक्रिया करून विक्रीचे काम अमूल करते. गुणवत्तापूर्ण उत्पादनांनी अमूलने देशातच नव्हे, तर जगभर विश्वासार्हता मिळवून ती टिकून ठेवली आहे. अगदी खालपासून ते वरपर्यंत सर्व स्तरावर अमूल पारदर्शक आणि निर्भेळ संस्कृतीचे जतन करते.

अमूलच्या यशाचे गमक अभ्यास व संशोधन, तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्कृष्ट विस्तार शिक्षण, उत्तम व्यवस्थापन आणि पारदर्शक व्यवहार ही पंचसूत्री आहे. डेअरी उद्योगातील दिग्गज ब्रॅंड अमूलने आता शेतकऱ्यांकडून ताजा फळे-भाजीपाला विकत घेऊन प्रस्थापित यंत्रणेद्वारेच शहरांमध्ये पोचवायचा निर्णय घेतला आहे. याबाबत तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा गुजरात सरकार बरोबर सामंजस्य करार झाला असल्याचे कळते.

याच धर्तीवर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फळे-भाजीपाल्याची थेट विक्री, त्यांचे मूल्यवर्धन करून प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री करायला हवी. प्रचलित बाजार यंत्रणेत शेतकऱ्यांना कदापि न्याय मिळणार नाही, असेच चित्र दिसत असताना फळे-भाजीपाल उत्पादक शेतकरी एकत्र आले तर अमूलसारखी क्रांती घडवून आणता येऊ शकते.   

खरे तर राज्यात जवळपास हजारएेक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी एकत्र आले आहेत. अशा कंपन्या म्हणजे सहकार आणि उद्योग यांचा संगम म्हणता येईल. परंतु, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीसारख्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच कंपन्यांचे काम उल्लेखनीय आहे. बाकी शेतकरी उत्पादक कंपन्यांना कामाची योग्य दिशाच मिळाली नसल्याने त्या नावालाच कागदावर आहेत.

अमूल या सहकारी संस्थेने मात्र सहकाराच्या भावनेबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन जपला आहे. प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीने अमूलचा हा आदर्श घेतला तर आपल्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणू शकते. फळे-भाजीपाल्यात उत्पादकता वाढ, मूल्यवर्धन याबाबत प्रगत संशोधनाची आता गरज आहे.

बदलत्या हवामानात टिकणारी वाणं, नवनवीन कीड-रोगांचे प्रभावी नियंत्रण, उत्पादकता वाढीचे अद्ययावत तंत्र शेतकऱ्यांना हवे आहे. आणि हे काम व्हीएसआयसारखी स्वतंत्र संस्थाच सातत्याने करू शकते. सध्या काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावी मोठ्या प्रमाणात फळे-भाजीपाल्यांचे नुकसान होते. हे नुकसान वाचवायचे असेल तर फळे-भाजीपाला उत्पादकांनीच आपल्या उत्पन्नातील थोड्याफार हिस्सा देऊन अशी संस्था उभी राहू शकते. यावरही गांभीर्याने विचार व्हायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com