agriculture stories in marathi agrowon agralekh on cooperative movement in india | Agrowon

विना `सहकार` नाही उद्धार
विजय सुकळकर
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018
आता सहकारला पुन्हा लोकचळवळ बनवायचे असेल, तर प्रथमतः लोकप्रतिनिधींनी आपली मानसिकता बदलायला हवी.

ग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत असताना येणाऱ्या काळात सहकार ही लोकचळवळ बनेल, असा विश्वास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान नुकताच व्यक्त केला आहे. मागील दीड-दोन दशकांपासून सहकाराला उतरती कळा लागणे सुरू झाले असून, सध्या अत्यंत वाईट अवस्थेत हे क्षेत्र आहे. सहकाराचा असा ऱ्हास देश विकासाच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे सहकार चळवळ पुन्हा उभी करावी लागेल, असे एक प्रकारे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केवळ सरकारच्या भरवशावर विकास होणे शक्य नव्हते. खासगी उद्योग आपापल्या परीने उभे राहून त्यांची वाटचाल सुरू होती, परंतु त्यात देशातील सर्वसामान्य नागरिकांचा थेट सहभाग नव्हता. देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या अनुषंगाने आपण सहकार हा मधला मार्ग निवडला होता. खरे तर आपल्या राज्यात सहकाराची बीजे सुमारे १०० वर्षांपूर्वी रोवली गेली. ‘एकमेकांच्या सहकार्यातून सर्वांचाच विकास’ या संकल्पनेवर राज्यात सहकार रुजला, फुलला. १९६०, ७०, ८० ही दशके सहकाराच्या दृष्टीने अनुकूल असा काळ होता. याच काळात सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ, पतसंस्था, बॅंका, खरेदी-विक्री संघ आदी शेती संलग्न क्षेत्रात राज्याने उल्लेखनीय कामगिरी केली. याचा फायदा सहकाराशी संबंधित सर्वांनाच झाला. राज्यातील सहकाराचा आदर्श पुढे देशभर
पोचला.

सर्वांसाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते जोपर्यंत सहकारात होते, तोपर्यंत सहकार चळवळीला देशभर भरभराट लाभली होती. सर्वांच्या हितापेक्षा स्वहित जपण्यास सहकारात सुरवात झाली, राजकारणाची कीड लागली आणि या किडीने सहकारला गिळंकृत केले. आज सहकार क्षेत्रातील बहुतांश संस्था आजारी आहेत. काही संस्था बंद पडल्या तर अनेक बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. नवीन आर्थिक धोरण, मुक्त अर्थव्यवस्थेचा रेटाही सहकारला सहन झाला नाही. याच काळात सहकारला असलेला सरकारचा आधारही काढून घेण्यास सुरवात झाली. पूर्वी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळातर्फे सहकारी संस्थांना कर्ज मिळत होते. या कर्जाची हमी सरकार घेत होते. शासनाकडूनही अनेक सहकारी संस्थाना मोठे भागभांडवल, अनुदान मिळत होते. हे सर्व आता कमी झाले आहे, किंबहुना बंदच झाले आहे. विशेष म्हणजे बदलत्या काळानुसार सहकारने तंत्रज्ञानाचा अवलंब केला नाही. आपले मनुष्यबळ प्रशिक्षित केले नाही. या सर्वांचा परिपाक म्हणजे आपल्या राज्यात, देशात सहकार चळवळ मोडकळीस आली आहे.

आता सहकारला पुन्हा लोकचळवळ बनवायचे असेल तर प्रथमतः लोकप्रतिनिधींनी आपली मानसिकता बदलायला हवी. सहकार म्हणजे स्वाहाकार नसून सहकार म्हणजे सर्वांचा उद्धार हे लक्षात घ्यायला हवे. सहकारात जलद निर्णय होत नाहीत, कामे गतीने मार्गी लागत नाहीत, हे सत्य असून, शासन आणि प्रशासनाने अनुक्रमे कायदे-नियमावलीत दुरुस्ती आणि कामकाजात बदल करून सहकारला गतिमान करावे. शासनाने सहकारच्या भागभांडवलात वाढ करावी. सहकारी संस्थांनीसुद्धा तंत्रज्ञानाचा अवलंब आणि मनुष्यबळास प्रशिक्षित करून सरकारी तसेच खासगी क्षेत्राशी स्पर्धा वाढवायला हवी. असे झाले तरच सहकारी चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होऊन या क्षेत्राची पुन्हा भरभराट पाहावयास मिळेल.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...