agriculture stories in marathi agrowon agralekh on desi cotton | Agrowon

‘देशी’ प्रेम; नको नुसता देखावा
विजय सुकळकर
बुधवार, 5 जून 2019

इजिप्शियन कापसाचा सुवीन हा लांब धाग्याचा ब्रॅंड जगात प्रसिद्ध आहे. या कापसाला मागणी अधिक असून, चढा दरही मिळतो. केंद्र सरकार पातळीवर व्यवस्थित प्रयत्न झाले, तर भारतीय देशी कापसाचा ब्रॅंडसुद्धा जगभर स्थापित होऊ शकतो.
 

जमिनीच्या आरोग्यापासून ते शेतकऱ्यांच्या अर्थकारणापर्यंत बीटी कापसाचे घातक परिणाम आता पुढे येत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशी कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. खरे तर मोदी सरकारच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात पण बीटीला पर्यायी-पूरक म्हणून देशी कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या खूप घोषणा झाल्यात. राज्यात फडणवीस सरकारनेसुद्धा देशी कापूस तसेच बीटीची सरळ वाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ, अशा घोषणा केल्या. परंतु यावर केंद्र आणि राज्य पातळीवरसुद्धा पाच वर्षांमध्ये एक दोन बैठकांतील चर्चेपुढे विषय गेला नाही, हे वास्तव आहे. सध्या देशभरातील ९७-९८ टक्के कापसाखालील क्षेत्र बीटीने व्यापले आहे. अशा वेळी महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून कापूस उत्पादक देशी कापसाबरोबर बिगर बीटी अमेरिकन कापूस, सरळ वाणांत बीटीची मागणी मोठ्या प्रमाणात करताहेत.

त्याचे कारण म्हणजे बीटी कापूस लागवडीचा खर्च वाढला आहे. बीटीवर रोग-किडींचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतोय. बीटी कापसापासून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळेनासे झाले आहे. परिणामी बीटी कापसाची शेती तोट्याची ठरतेय. दुर्दैवाची बाब म्हणजे देशात बीटीच्या आगमनानंतर बहुतांश कापूस संशोधन केंद्रांनी वाणांच्या बाबतीत संशोधनाकडे दुर्लक्ष केले. परिणामी अनेक चांगली देशी कापसांची वाणं लुप्त पावली आहेत. यातील आशादायक बाब म्हणजे देश पातळीवर केवळ नांदेड आणि परभणी येथील कापूस संशोधन केंद्रांवर देशी कापसाच्या वाणांबाबत संशोधन चालू आहे. या केंद्रांनी बीटीच्या लाटेतसुद्धा देशी वाणं केवळ जिवंतच ठेवली नाही तर कापसाच्या धाग्याची लांबी २२ मिलिमीटरपासून ३२ मिलिमीटरपर्यंत वाढविण्यात त्यांना यश आले आहे. 

देशी कापूस लागवडीचे अनेक फायदे आहेत. देशी कापसात स्थानिक वातावरणास समरस होण्याची क्षमता अधिक असते. मूळं खोल जात असल्यामुळे देशी कापूस पाण्याचा ताण सहन करू शकतात. कोरडवाहू शेतीत हा कापूस अधिक उत्पादनक्षम ठरतो. देशी कापसामध्ये लाल्या विकृती आढळून येत नाही. रसशोषक किडींचा प्रादुर्भावही कमी होतो. शेतकऱ्यांना दरवर्षी बियाणे विकत घ्यावे लागत नाही. देशी कापसाचा एकंदरीत उत्पादन खर्च कमी असतो. त्यामुळे जेमतेम उत्पादन मिळाले तरी हा कापूस किफायतशीर ठरतो.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने नव्याने विकसित केलेल्या देशी कापसाच्या वाणांची धाग्याची लांबी, मजबुती आणि तलमपणा अमेरिकन कपाशीसारखा किंवा त्यापेक्षा सरस आहे. आता केंद्र सरकारने देशी कापसाला प्रोत्साहन देण्याचे ठरविलेच आहे तर या वाणांचा बिजोत्पादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेऊन शेतकऱ्यांना वाढत्या मागणीनुसार बियाणे उत्पादन करून द्यायला हवे. देशी कापसाच्या बिजोत्पादनाचा कार्यक्रम महाबीज, कृषी विद्यापीठे, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्याबरोबर काही खासगी कंपन्यांनासुद्धा द्यायला हवा. बिजोत्पादनासाठी अशा संस्थांना अनुदान मिळायला हवे.

हे करीत असताना इतर राज्यातील देशी कापूस संशोधनाला गती मिळवून देण्यासाठी केंद्र तसेच संबंधित राज्यांनी प्रयत्न वाढवायला हवेत. देशभरातील अधिकाधिक शेतकऱ्यांना देशी कापसाकडे वळविण्यासाठी बीटीच्या तुलनेत या कापसाला २० टक्के अधिक हमीदर मिळायला हवा. इजिप्शियन कापसाचा सुवीन हा लांब धाग्याचा ब्रॅंड जगात प्रसिद्ध आहे. या कापसाला मागणी अधिक असून चढा दरही मिळतो. केंद्र सरकार पातळीवर व्यवस्थित प्रयत्न झाले तर भारतीय देशी कापसाचा ब्रॅंडसुद्धा जगभर स्थापित होऊ शकतो. असे झाले तर कायमच आर्थिक चणचणीत असलेल्या देशातील कापूस उत्पादकांचा कायापालट होईल.  


इतर संपादकीय
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
बेगडी विकास कितपत टिकेल?हवामान बदल ही जागतिक स्वरूपाची समस्या आहे....
शेळी दूध प्रकल्प कौतुकास्पदच! शेळीच्या दुधाचे संकलन, प्रक्रिया आणि विक्री...
आंधळी कोशिंबीर जूनचा पहिला आठवडा संपत आला आहे. केरळमध्ये मॉन्सून...
स्वायत्त विद्यापीठेच देतील...भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठांची व...
‘देशी’ प्रेम; नको नुसता देखावाजमिनीच्या आरोग्यापासून ते शेतकऱ्यांच्या...
पर्यावरणपूरक विकासासाठी ‘ग्रीन पार्टी’शाश्वत विकासाच्या संकल्पनेमध्ये नैसर्गिक...
नियोजन प्लॅस्टिकमुक्तीचे  वाढत्या दूध उत्पादन खर्चाबरोबर दूध आणि...
अविश्‍वसनीय विजयाचा अन्वयार्थलोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचा विजय झाला...
काँग्रेस नेतृत्वासाठी कसोटीचा काळघराणेशाहीचे आरोप व प्रचार, पक्षाचे निष्क्रिय...
‘सन्मान’ योजनेत नको चेष्टा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित...
कोरडे इशारेयं दा पीक कर्जवाटपात बॅंकांनी हात आखडता घेतल्यास...