देशी गोसंवर्धनास सुगीचे दिवस

देशी गोवंशाच्या सांभाळात केवळ दूध दडले नसून शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे आव्हान पेलले जाणार आहे. गोमुत्रातून कीडनियंत्रक गुणधर्म सिद्ध होत आहेत.
संपादकीय
संपादकीय

राज्यामध्ये दूधदराचा प्रश्‍न दिवसेंदिवस चिघळत जाणार आहे. दूध उत्पादकांना खर्च परवडेना, तर दूध संघ वाढीस दर देण्यास नाक मुरडत आहेत. सध्याचे दुधाचे दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्‍याबाहेरचे आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील अनेक पशुपालक देशी गोवंश संवर्धनाकडे वळत आहेत. देशी गाईंच्या संवर्धन आणि विकासासाठी राज्यात १५ वर्षांपूर्वी सुरू झालेले पशुधन विकास मंडळाचे काम कासवगतीने सुरू असले तरी गेल्या दोन वर्षांत स्थानिक गोसंवर्धनास सुगीचे दिवस आले आहेत. राज्यातील देवनी, खिलार, लाल कंधार पशुधनाच्या सांभाळासाठी आणि राज्याबाहेरून गीर, साहिवाल, थारपारकर गोवंश खरेदी करून सांभाळासाठी पशुपालकांमध्ये इच्छुकता वाढली आहे.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय गोपरिषद आणि गोविज्ञान कार्यशाळा देशी गोवंशाच्या विकासाला निश्‍चित पूरक आहेत. देशी गोवंशाच्या सांभाळात केवळ दूध दडले नसून शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे आव्हान पेलले जाणार आहे. गोमुत्रातून कीड नियंत्रक गुणधर्म सिद्ध होत आहेत. देशी गोवंशाच्या विकासाला चालना देण्यासाठी ॲग्रोवनतर्फे नियमित प्रकाशित होणारी ज्ञानमाला जेव्हा पुस्तकरूपाने साकारली गेली तेव्हा अवघ्या चार महिन्यांत चार आवृत्या राज्यात वितरित झाल्या आहेत. यावरून पशुपालकांमध्ये देशी गोवंश संवर्धन, विकास याबाबतची आवड आपल्या लक्षात येईल. एकूणच कमी होत जाणारी शुद्ध गोवंशाची संख्या वाढत गेल्यास पर्यावरण ऱ्हास, तापमानवाढ आणि जमीन सुपीकतेचा प्रश्‍न सुटण्यास हातभार लागेल. गाईच्या शरीरक्रियेत, सहवासात, उत्पादनात दडलेले विज्ञान सिद्ध करण्याची जबाबदारी संशोधकांची आहे. राज्यात स्थापन झालेल्या पशुवैद्यक विद्यापीठाकडून पशुपालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गोउत्पादने मानवी वापरात येत असताना त्यांचे अनेक सकारात्मक परिणाम सांगितले जातात. मात्र वैज्ञानिक सत्यता सिद्ध केल्याशिवाय त्यांचा सर्वदूर वापर अशक्‍य आहे. 

पुण्यात झालेल्या राष्ट्रीय गोपरिषदेने गाय हा विषय शालेय अभ्यासक्रमापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत परिपूर्ण शिकविला जावा, अशी धाडसाची मागणी केली आहे. यात देशी गोवंश संवर्धनाच्या विकासापेक्षा सामाजिक आरोग्याच्या विकासाची नांदी दडली आहे काय, याची उत्तरे पशुवैद्यकीय संशोधकांकडून अपेक्षित आहेत. राज्यातील गोशाळा सक्षमीकरणासाठी गोविज्ञानाची साथ असताना गाईवरचे प्रेम कृतीतून व्यक्त करण्याची गरज पुढे आली आहे. कारण गोशाळा हा धर्म नसून अपधर्म असल्याची प्रतिक्रिया म्हणजे सध्या गोशाळेत सुरू असलेल्या गोसांभाळावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे.

गोशाळेतील विकासाची उद्दिष्टे वंशसुधार, पर्यटन, प्रशिक्षण, रोगप्रतिबंध अशा दृष्टीने सुधारित झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या गोसंवर्धनाचे धडे लाभू शकतील. तात्पर्य असे की सध्या सुरू असलेली गाय सांभाळण्याची चढाओढ व्यावसायिक स्पर्धा न बनता शाश्‍वत गोविकासाची दिशा ठरावी, असे अपेक्षित आहे. राज्यात दूधभेसळीचा प्रश्‍न कधीही कमी झाला नाही. देशी गोवंशाच्या दुधातून तरी निर्भेळ विश्‍वासार्हता ग्राहकांना लाभावी म्हणजे उत्पादक आणि ग्राहक यांचा सुयोग्य समन्वय दिसून देशी गाय समृद्ध बनू शकेल. देशी गाईंच्या संवर्धनासाठी राज्यात प्रशिक्षणे सुरू आहेत, साहित्य आणि संगणकप्रणाली देखील उपलब्ध होत आहेत. याद्वारे शुद्ध, तांत्रिक माहिती पशुपालकांपुढे येऊन त्यातून देशी गोसंवर्धन आणि विकासास हातभार लागावा, हेच अपेक्षित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com