agriculture stories in marathi agrowon agralekh on direct marketing | Agrowon

थेट पणन उत्तम पर्याय
विजय सुकळकर
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

व्हाॅट्सॲप ग्रुपचा वापर शेतमाल विक्रीसाठी प्रभावीपणे केला जाऊ शकतो, हे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

दसरा, दिवाळी आणि लग्न-समारंभात फुलांना खासकरून झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. सण-समारंभात मंदिरे-घरे-दुकाने-कार्यालये-गाड्यांच्या सजावटीसाठी झेंडूची फुले वापरली जातात. अनेक शेतकरी दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधण्यासाठी झेंडूची नियोजनपूर्वक शेती करून फुले बाजारात पाठवितात. पूर्वी दसरा-दिवाळीत शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या झेंडूच्या फुलांना दरही चांगला मिळत होता, परंतु मागील काही वर्षांपासून ऐन सणासुदीच्या काळात व्यापारी झेंडूच्या फुलांचे दर ठरवूनच पाडत आहेत. शेतकऱ्यांकडून पाच ते दहा रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची खरेदी करून नंतर ती फुले किरकोळ बाजारात शहरी ग्राहकांना १०० ते २०० रुपये किलो दराने विकत आहेत. जिल्ह्यांच्या बाजारपेठेबरोबर मुंबई, पुण्याच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये असे सातत्याने घडत आहे.

अनेक वेळा शेतकऱ्यांना झेंडूच्या फुलशेतीसाठी येणारा खर्च तर सोडाच, मात्र वाहतूक भाड्याऐवढे पैसेसुद्धा मिळत नाहीत. अशावेळी रस्त्याच्या कडेला झेंडूची फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. नियमित अन्नधान्ये, फुले-फळे-भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभवदेखील यापेक्षा वेगळे नाहीत. व्यापारी कार्टेलकरून शेतमालाचे दर पाडतात. विक्री न झालेल्या शेतमालाची वाहतूक परवडत नसल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना तो तेथेच सोडून द्यावा लागतो. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय, हा विचार शेतकऱ्यांनी करून त्यावर उपाय शोधायला हवा.

बाजारव्यवस्थेतील एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी मॉडेल ॲक्ट केला, नियमनमुक्तीसारखे निर्णय घेतले गेलेत, पारदर्शक आणि गतिमान कारभारासाठी अनेक पणन सुधारणा केल्या जात आहेत, परंतु कशाचीही प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांची लूट काही थांबत नाही. अशावेळी थेट पणनसाठी शेतकऱ्यांनीच पुढे यायला पाहिजे. दसऱ्याच्या वेळी झेंडूची फुले रस्त्यावर फेकून द्यावी लागल्याने दिवाळीत अशीच वेळ येऊ नये म्हणून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राबविलेल्या झेंडू फुले अभियानाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. व्हॉट्सॲपवर ‘झेंडूची फुले’ नावाने ग्रुप तयार करण्यात आला. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून किमान ५० रुपये प्रतिकिलो दराने झेंडूची फुले खरेदी करावीत, असा मेसेज या ग्रुपद्वारे हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात व्हायरल करण्यात आला. त्यामुळे झेंडू उत्पादकांबरोबर ग्राहकांमध्येसुद्धा जागृती निर्माण झाली. या अभियानाच्या माध्यमातून उत्पादक आणि ग्राहक मधल्या कुठल्याही व्यवस्थेशिवाय एकत्र आले. त्यास ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद लाभला. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन अथवा त्यांनी शहरात लावलेल्या स्टॉलवरून ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने ग्राहकांनी झेंडूची फुले खरेदी केली. त्यामुळे हे अभियान उत्पादकांबरोबर ग्राहकांच्याही फायद्याचे ठरले. असे अभियान इतरही फुलांबरोबर नाशवंत फळे-भाजीपाला पिकांच्या विक्रीत शेतकऱ्यांनी राबवायला हवे. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरातून थेट शेतमाल विक्रीच्या अशा मोहिमा शेतकऱ्यांनी फत्ते करायला हव्यात.

प्रत्येक भागातच आता मित्र, पाहुणे, सहकारी यांचे व्हाॅट्सॲप ग्रुप आहेत. अशा बहुतांश ग्रुपमध्ये सध्या केवळ शुभेच्छा अथवा करमणुकीचे मेसेज फॉरवर्ड होतात. फारतर एखादी माहितीवजा पोस्ट असते. व्हाॅट्सॲप ग्रुपचा वापर शेतमाल विक्रीसाठी केला जाऊ शकतो हे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. हा आदर्श राज्यातील इतरही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीसुद्धा घ्यायला हवा. असे झाले तर टोमॅटोपासून स्ट्रॉबेरीपर्यंत मागणी अथवा दर नाही म्हणून शेतकऱ्यांवर शेतमाल फेकून देण्याची वेळ येणार नाही.
...........................................

 

इतर संपादकीय
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
कृषिकेंद्रित ग्रामविकासाची पायाभरणी! स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...
जाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
कपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...
शिल्लक कांद्याचे करायचे काय?कांद्याचे भाव दिवसेंदिवस खाली खाली येत आहेत....
ऑपरेशन ‘मनीऑर्डर’शेतीमालास मिळत असलेल्या अत्यंत कमी दराबाबत...
‘स्मार्ट’ पाऊल पडते पुढे प्रचलित बाजार व्यवस्थेत उत्पादक आणि ग्राहक या...
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यातच... नियोजनवादी औद्योगिकीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर...
शेत तेथे हवे शेततळेमहाराष्ट्रात २०१२ ते २०१४ सलग तीन वर्षे भीषण...
शेतीच्या शोषणातून आर्थिक विकास अशक्यभांडवलशाही औद्योगीकरण  सतराव्या शतकात...
संघर्ष वाढला; मदतही वाढवा वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या...
काळ्या आईचे जपूया आरोग्यपृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब...
यांत्रिकीकरणात घडवूया क्रांतीराज्यात आत्तापर्यंत १७१ अवजारे बॅंका तयार झाल्या...
शेतरस्त्यातून जाते देश विकासाची वाटजुन्या हैद्राबाद संस्थानातील जिल्ह्यांत...
अस्वस्थ वर्तमान अन् स्वस्थ शासनदेशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत...