उघडिपीवरील उपाय

उघडिपीवर मात करायची असेल तर शेततळे अथवा विहिरीतून उपलब्ध होणारे थोडे पाणी, त्याला लागणारी वीज आणि तुषार संचासह पंपसेट या तीन गोष्टी शेतकऱ्यांकडे हव्या आहेत.
संपादकीय
संपादकीय

राज्यात मॉन्सूनचे दमदार आगमन झाल्यानंतर १२ ते २३ जूनपर्यंत पावसाचा खंड पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने अगोदरच वर्तविली होती. परंतु, तीन-चार दिवसांच्या चांगल्या पावसाने राज्यात १४ जूनपर्यंत ४५ हजार हेक्टरवरील खरिपाचा पेरा उरकला होता. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे मागील चार दिवसांपासून उघाड आहे. तापमानाचा पारा वाढू लागला आहे, अगोदर झालेल्या पावसाने उकाडा वाढला आहे. अशा वातावरणात जमिनीतील ओल लवकर फाकते. त्यातच उगवून येत असलेल्या भात, कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांच्या रोपांना हलका पाण्याचा शिडकावा हवा असतो. पावसाच्या खंडाने असा शिडकावा मिळत नसल्याने रोपे कोमेजून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. अजून आठवडाभर पाऊस नाही आल्यास काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. पहिल्या पेरणीसाठी पदरमोड करून बी-बियाण्याची सोय लावल्यानंतर दुबार पेरणीची सोय करायाची कशी? अशी चिंताही अनेकांना लागली आहे. ज्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत त्यांना २० जूनपर्यंत थांबण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातोय. अशा शेतकऱ्यांनी तणमोड करण्यासाठी सध्याच्या उघाडीत वखराची पाळी देऊन घ्यावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. मागील तीन वर्षांपासून राज्यात सरासरी एवढा पाऊस पडत असला तरी जून, जुलै, ऑगस्टमधील पावसाच्या मोठ्या खंडाने शेतकऱ्यांना खरीप पिकांचे उत्पादन कमी मिळत आहे. अशा वेळी सातत्याच्या उघडिपीवर उपाय शोधावाच लागेल.

पावसाचा वाढता लहरीपणा आपण थांबवू शकत नाही; पण त्यास तोंड कसे द्यावे याची आखणी निश्चित करू शकतो. पावसाच्या खंडात हवामान रखरखीत कोरडे असते, तापमान वाढते, बाष्पीभवनाचा वेगही अधिक असतो. बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी पेरणी केलेले जमेल तेवढे क्षेत्र पाला-पाचोळा अथवा पीक अवशेषाने आच्छादित करावे. तसेच सोयाबीन, कापसाचे कोंब चांगले वर आले असल्यास त्यात आंतरमशागत करत राहावे. यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि उघडिपीचा फारसा फटका पिकांना बसत नाही. पाऊसमान कमी, अनियमित झाले आहे. पावसाचे खंड वारंवार पडताहेत. अशा परिस्थितीमध्ये भूगर्भ आणि जलाशयेदेखील कोरडी असतात आणि शेतीसाठी नव्हे तर पिण्यासाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसतो. म्हणून पर्जन्यछायेच्या प्रदेशात बारमाही पिके विशेषतः अधिक पाणी लागणाऱ्या पिकांवर मर्यादा हव्यात. पावसाच्या लहरीपणात हंगामी पिके वाचविण्यासाठी जिरायती शेतीस संरक्षित सिंचनाची सोय सर्वांनी करायलाच हवी. ‘हर खेत को पानी’, ‘पाण्याच्या प्रत्येक थेंबातून अधिक पिके ’, ‘मागेल त्यास शेततळे’ अशा घोषणा केंद्र-राज्य शासन सातत्याने करते आहे. मात्र, त्या दिशेने फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. राज्य शासन जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीचे स्वप्न पाहते. परंतु, त्याची व्याप्ती फारच कमी असून सर्वच ठिकाणी जलयुक्तच्या उपाययोजना योग्य ठरणार नाहीत. पावसाळ्यातील उघडिपीवर मात करायची असेल तर शेततळे अथवा विहिरीतून उपलब्ध होणारे थोडे पाणी, त्याला लागणारी वीज आणि तुषार संचासह पंपसेट या तीन गोष्टी शेतकऱ्यांकडे हव्या आहेत. शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना प्रत्यक्षात उतरवून जिरायती शेतकऱ्यांना पंपसेट, तुषार संच सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावेत. असे झाले तरच जिरायती शेतीतून शाश्वत उत्पादनाची हमी मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com