गाभ्रीचा पाऊस

सप्टेंबर आणि आता ऑक्टोबरमध्ये धोधो कोसळणाऱ्या पावसाने राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर झाले असले, तरी शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला खरीप हंगाम हिरावून घेण्याचे काम केले आहे.
संपादकीय
संपादकीय

यावर्षी पावसाबाबत आलेल्या हवामान विभागाच्या पहिल्या अंदाजाने बळिराजा चांगलाच सुखावला होता. सरासरीच्या ९६ टक्के अशा चांगल्या पावसाचा तो अंदाज होता. अंदाज वर्तविल्याप्रमाणे जवळपास तेवढाच पाऊस झाला असल्याचा दावा भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. जे. रमेश यांनी नुकताच केला आहे. परंतु या वर्षीच्या पावसाचे मुख्य वैशिष्टे त्याचे असमान वितरण म्हणावे लागेल; आणि त्याचा फटका महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांतील शेतकऱ्यांना बसला आहे, बसत आहे.

राज्याचा विचार करता सुरवातीच्या दोन मोठ्या पावसाच्या खंडाने जिरायती शेतीचे मोठे नुकसान झाले. १५ ऑगस्टपर्यंत अर्ध्याहून अधिक राज्यावर दुष्काळाचे सावट घोंघावत होते. त्यानंतर सप्टेंबर आणि आता ऑक्टोबरमध्ये धोधो कोसळणाऱ्या पावसाने दुष्काळाचे सावट दूर झाले असले, तरी शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला खरीप हंगाम हिरावून घेण्याचे काम केले आहे. पावसाच्या खंडात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशमधील जिरायती शेतीतील मूग, उडीद ही पिके होरपळली. आता बहुतांश शेतकऱ्यांचे काढणी चालू असलेले सोयाबीन भिजले आहे. पहिल्या दुसऱ्या वेचणीचा कापूसही भिजून लोळत अाहे. या शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसानही कमी नाही. पश्चिम महाराष्ट्रात ऊस, द्राक्षासह अनेक फळे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान मोठे आहे. ऑक्टोबर छाटणीदरम्यान सातत्याने ढगाळ वातावरण आणि पडणाऱ्या पावसाने ‘डावणी’सह अनेक रोगांच्या प्रादुर्भावाने बहुतांश शेतकऱ्यांना बागा सोडून द्याव्या लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काढणीस तयार भातालाही या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. 

हवामान बदलाच्या काळातील अनिश्चित शेती आणि शेतकऱ्यांचे जीवन यावर ‘गाभ्रीचा पाऊस’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला. सध्याच्या नुकसानकारक पावसात या चित्रपटाची कथा राज्यातील शेतकरी वास्तवात अनुभवतोय. मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान वाढले आहे. परंतु पंचनामे करणे, नुकसानभरपाई ठरविणे, याबाबतचा अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या पदरात मदत टाकणे या पद्धतीत फारशा काही सुधारणा झालेल्या नाहीत. नुकसानग्रस्त भागांत अनेक ठिकाणी पंचनामेच होत नाहीत, झाले तर अपेक्षित नुकसानभरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. या वेळी असे होता कामा नये.

पावसाने धुमाकूळ घातलेल्या भागांतील प्रत्येक पिकांचे पंचनामे तत्काळ व्हायला हवेत. नुकसानभरपाई मिळण्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी राज्य शासन-प्रशासनाने घ्यायला हवी. या वर्षी राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेसही चांगला प्रतिसाद लाभला आहे. परंतु ३१ जुलैनंतरचे पीक पेरणीचे दाखले जोडलेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार नाही, असेच दिसते. याबाबतचा शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करून ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला अशा सर्वांना विम्याचा लाभ मिळायला हवा.

महत्त्वाची बाब म्हणजे हवामान बदलाचे दुष्परिणाम या देशातील शेतकरी मागील दीड दशकापासून भोगतोय. यात शेतीचे अपरिमित असे नुकसान झाले आहे. दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर अादी नैसर्गिक आपत्तींमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित-वित्तहानी झाली आहे, होत आहे. याची दखल कोणी, कधी घेणार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. या देशात हवामान बदलाचे परिणाम, त्यातून होणारे नुकसान हा विषय गांभीर्याने घेऊन अभ्यास, संशोधनातून त्याच्या झळा कमी करण्याबाबत प्रयत्न वाढवायला हवेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com