अनियमित पावसाचा सांगावा

राज्यातील दुष्काळी पट्टा नव्याने ‘डिफाइन’ करून सर्कलनिहाय पाऊस कधी, किती, कसा पडतो याचा अभ्यास व्हायला हवा.
संपादकीय
संपादकीय

पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. या काळातील पावसाचा ट्रेंड पाहिला तर चार-पाच दिवस सातत्याने धो-धो पडणारा पाऊस आणि त्यानंतर आठ-दहा दिवस खंड असा राहिला आहे. विशेष म्हणजे एकाच जिल्ह्यातील काही गावांत अतिवृष्टी, तर काही गावांत पाऊसच नाही, अशी स्थिती कोकणवगळता उर्वरित राज्यात आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, नगर आणि पुणे या जिल्ह्यांत अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे पिके सुकू लागली आहेत, तर विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांत तसेच नांदेड, हिंगोली, परभणी यासह पुणे जिल्ह्याच्या काही भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. चांगल्या पावसाच्या जिल्ह्यातही मागील आठवडाभराच्या झडीने पिके पिवळी पडून त्यांची वाढ खुंटली आहे. खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यातही पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात आहेत. असे असताना पावसाअभावी पिके धोक्यात आल्याबाबत राज्याच्या कोणत्याही भागातून माहिती आलेली नाही, असे कृषी विभाग सांगते. राज्यातील विविध भागातून पुरेशा पावसाअभावी पिके धोक्यात असल्याचा बातम्या मागील आठ दिवसांपासून येत आहेत. पावसाचा खंड वाढत असताना परिस्थिती विदारक होत आहे. अशावेळी कृषी विभागाचा दावा म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असाच म्हणावा लागेल. पावसाचे दिवस अजून संपलेले नाहीत, असा दावा कृषी विभाग करते. हे सर्वांनाच माहीत आहे; परंतु ऑगस्टमध्येसुद्धा मोठा खंड असल्याचे यातील तज्ज्ञ सांगत असताना अडचणीतील खरीप वाचवायचा कसा? याबाबत कृषी विभागाचे प्रयत्न पाहिजेत.

मागील तीन वर्षे राज्यात चांगल्या पावसाची होती; परंतु पाहिजे तेेव्हा पावसाने ओढ दिल्याने अन् नको तेेेव्हा बरसल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले, हे शासनासह कृषी विभागानेदेखील लक्षात घ्यायला हवे. अडचणीतील खरीप वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे एकहाती प्रयत्न सुरू आहेत. पावसाच्या मोठ्या खंडात संरक्षित सिंचन पिकाला जीवनदायी ठरते. पाण्याची सोय असलेला शेतकरी वाळत असलेल्या पिकांना पाणी देऊन वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु पावसाच्या खंडाची व्याप्ती आणि वारंवारता पाहता गावनिहाय खरीप सुरक्षित करण्याबाबत शासन पातळीवरून प्रयत्न व्हायला हवेत. शासनाचे आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे पेरणीचा कालावधी जसा लांबतो, तसा पर्यायी पिके देणे, आंतरपिके, आंतरमशागत याबाबत सल्ले देणे नसून, वाया जात असलेली पिके सामूहिक प्रयत्नांतून वाचविणे, असा त्याचा अर्थ अपेक्षित आहे. १९७२, २०१२, २०१५ या दुष्काळी वर्षात दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढली आहे. दुष्काळी पट्टा मराठवाडा आणि विदर्भातील नवनवे तालुके कवेत घेत आहे. दुष्काळी पट्ट्यात जून, जुलैमध्ये अत्यंत कमी, तर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अधिक पाऊस पडत आहे. अशा वेळी दुष्काळी पट्टा नव्याने ‘डिफाइन’ करून सर्कलनिहाय पाऊस कधी, किती, कसा पडतो, याचा अभ्यास व्हायला हवा. त्यानुसार पिके, पीकपद्धतीची रचना व्हायला हवी. नव्या रचनेतील पिकांच्या लागवडीपासून ते पुढील सर्व व्यवस्थापन तंत्राचा कृषी विद्यापीठाने अभ्यास करायला हवा. अशा अभ्यासातून नव्या शिफारशी पुढे यायला हव्यात. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे या शिफारशींची पुस्तिका पोचायला हवी. पावसाच्या मोठ्या खंडात कृत्रिम पावसाचा उपायही प्रभावी ठरतो. अनेक प्रगत देशात कृत्रिम पाऊस पाडून शेती वाचविली जाते. आपल्याकडे मात्र प्रयोग पातळीवर असलेल्या या तंत्राला कायमस्वरूपी यंत्रणा असा मुहूर्त कधी लागेल, हे सध्यातरी कोणीही सांगू शकत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com