विश्वासावर बहरेल व्यापार

आरोग्याच्या बाबतीत सर्वांत जागरूक युरोपियन देशांतील लोकांना पाहिजे तशी द्राक्षे, डाळिंब, आंबा आपण पुरवितो. अशावेळी आपल्या केळीच्या दर्जाबाबतही चीनला पटवून द्यावे लागेल.
विश्वासावर  बहरेल व्यापार

चीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या झळा भारतासह संपूर्ण जगाला बसत आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांबरोबर जगातील प्रमुख देश व्यापार युद्ध संपुष्टात आणण्यासाठी सरसावले आहेत. शेतीमालाच्या आयात-निर्यातीत भारत हा जगातील एक महत्त्वाचा देश आहे. मसाल्याचे पदार्थ, बासमती तांदूळ, याबरोबर दर्जेदार फळे आणि भाजीपाला देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. शेतीमालाची निर्यात म्हणजे आजपर्यंत तरी आपला भर अमेरिका, युरोपियन आणि आखाती देशांवरच राहिला आहे. आयात-निर्यातीच्या बाबतीत शेजारील राष्ट्रांमध्ये आजपर्यंत खुली अथवा काही अंशी मर्यादित अशी आपली निर्यात चालू होती. परंतु, मागील काही वर्षांपासून आपल्या शेजारील देशांमधील शेतीमाल निर्यातीतही अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. केळी, आंबा, द्राक्ष, डाळिंब या फळपिकांची शेजारील देशांना होणारी निर्यात रोडावली आहे. फळपिकांची निर्यात कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात पुरवठा अधिक होऊन दर कमी झाले आहेत. याचा फटका या फळपिकांच्या उत्पादकांना बसतोय.

केळी उत्पादनात भारत जगात अव्वल क्रमांकाचा देश आहे. आपल्या केळीचा दर्जाही उत्तम असून, जगाच्या पसंतीला उतरलेला आहे. चालू हंगामात फिलिपिन्ससह इतर प्रमुख केळी निर्यातदार देशांत उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आखाती देशांसह आपल्या शेजारील देशांशी केळी निर्यात वाढविण्याची एक चांगली संधी आपल्याला लाभली आहे. आखाती देश केळीसाठी भारताकडे वळले असून, या देशांना निर्यातही वाढत आहे. परंतु, चीन व पाकिस्तान या देशांत आपली निर्यात सुरू करून ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पाकिस्तानमध्ये केळी पिकत नाहीत. त्यामुळे त्यांची पूर्ण मदार भारतावरच आहे. जम्मू-काश्मीर भागातील काही निर्यातदार थेट जळगावमधून केळी उचलून पाकिस्तानात पाठवीत होते. परंतु, या दोन्ही देशांमध्ये अलिकडे वाढलेल्या तणावामुळे पाकिस्तानला होणारी निर्यात बंद आहे. १९६५, १९७१, १९९९ च्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धांनंतरही थोड्या कालावधीसाठी बंद पडलेले व्यापारी संंबंध दोन्ही देशांनी मिळून पूर्ववत केले होते. सध्याचा तणावही दूर करून अधिकृत व्यापाऱ्यांकडून मर्यादित स्वरूपात आणि काटेकोर सुरक्षाव्यवस्थेत व्यापार संबंध पुनर्प्रस्थापित करायला हवेत.

बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि हवामान बदलामुळे चीनमधील केळीखालील क्षेत्र आणि उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे केळी आयात केल्याशिवाय चीनला सध्यातरी पर्याय नाही. जगभरातून कुठल्याही आयातीपेक्षा चीनला भारताकडून केलेली आयात स्वस्त पडते आणि यासाठी वेळही कमी लागतो. चीनमधील ग्राहकांना तुलनात्मक ताजी फळे कमी दरात मिळू शकतात. असे असताना आपल्या केळीचा दर्जा तसेच काही व्यापारी अटी-शर्तींमुळे मागील अनेक वर्षांपासून चीनला केळीची निर्यात होत नाही. आरोग्याच्या बाबतीत सर्वांत जागरूक युरोपियन देशांतील लोकांना पाहिजे तशी द्राक्षे, डाळिंब, आंबा आपण पुरवितो. अशावेळी आपल्या केळीच्या दर्जाबाबतही चीनला पटवून द्यावे लागेल. तसेच, व्यापार म्हणजे देवाण-घेवाण या सूत्रानुसार दोन्ही देशांनी अटी-शर्ती थोड्या शिथिल केल्या, तर चीनला केळीची निर्यात चालू होऊ शकते. यासाठी दोन्ही देशांमधील विदेश व्यापार विभाग तसेच आयात-निर्यातीतील संस्था यांनी पुढाकार घ्यायला हवा. एकमेकांवरील विश्वास आणि व्यवहार्य व्यापार धोरणातून शेजारील देशांशी आपली आयात-निर्यात वाढू शकते.                    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com