संवाद, सलोखा आणि स्वास्थ्य

संवादातून एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर होतात, मतभेद मिटतात, अडचणीत मार्ग सापडतो, तर सलोख्याच्या भावनेतून उद्‌ध्वस्त होत चाललेल्या अथवा झालेल्या कुटुंबाची गाडी रुळावर येऊ शकते.
संपादकीय
संपादकीय

भावनिक आधार आणि कौटुंबिक संवादाच्या अभावामुळे महाविद्यालयीन तरुणांचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येत असल्याचे पुण्यातील एका महाविद्यालयातील वैद्यकीय तपासणीअंती समोर आले आहे. आक्रमकपणा, नैराश्य, असमतोल विचारसरणी आदी लक्षणे तपासणीत आढळली आहेत. सध्या हे प्रमाण अडीच ते तीन टक्के असले तरी वाढती विभक्त कुटुंब पद्धती, नोकरी करीत असलेल्या आई-वडिलांचा कुटुंबासाठी मिळत नसलेला वेळ, सोशल मीडियाचा वाढता वापर आणि यातून कमी कमी होत चाललेल्या संवादामुळे भविष्यात हे प्रमाण वाढू शकते. गंभीर बाब म्हणजे मुलांचे बिघडत चाललेले मानसिक स्वास्थ्य हे वास्तव स्वीकारून पालकांनी त्यातून मार्ग काढणे अपेक्षित असताना ते ही बाब मान्यच करायला तयार नाहीत.

सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकांना आपलाच पाल्य अव्वल यावा, तो मेडिकल नाही, तर इंजिनिअरिंगला लागावा, असा आग्रह असतो. हा ताण तर मुलांवर आहेच; परंतु त्यातही त्यांना घरून आधार, प्रोत्साहन मिळत नसेल तर त्यांचे नैराश्य वाढतच जाणार आहे. यात भरीस भर म्हणजे सध्या अनेक कारणांवरून कुटुंबात कलह वाढत चालला आहे. सलोख्याच्या वातावरणाअभावी वाद होताहेत. कुणीच कुणाचे एेकायला तयार नसल्याने दोन्ही पक्षांकडून टोकाची भूमिका घेतली जाऊन त्यातूनही अनर्थ घडताहेत. आज आपण अगदी क्षुल्लक कारणांवरून कुटुंबे उद्‌ध्वस्त होताना पाहतोय. याचाही विपरित परिणाम मुलांच्या जीवनावर होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. 

संवाद आणि सलोख्यातून मुलांचे बिघडत चाललेले मानसिक संतुलन पूर्वपदावर येऊ शकते. संवादातून एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर होतात, मतभेद मिटतात, अडचणीत मार्ग सापडतो, समस्यांवर उपाय-उत्तरे मिळतात. तर सलोख्याच्या भावनेतून उद्‌ध्वस्त होत चाललेल्या, झालेल्या कुटुंबाची गाडी रुळावर येऊ शकते. कुटुंबात संवाद आणि सलोखा न घडण्यास अहंकार (इगो) कारणीभूत असतो. मी काय म्हणून माघार घेऊ, हा विचार जीवन नष्ट करतो. ‘झुकना तो ज्ञानी की शान है - अकडना मुर्दो की पहचान है।’ असे म्हटले जाते. ज्ञानवंत नेहमी नम्र असतात. माणसातील नम्रता आणि करुणा त्याला मोठे करते. म्हणून अहंकार नष्ट करून करुणा आणि मानवतेचा स्वीकार करायला हवा. आणि संवाद, सलोखा वाढवून मुलांबरोबर कुटुंबातील सर्वच सदस्यांचे स्वास्थ्य चांगले कसे राहील, हे शहरे, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाने पाहावे.

थेट संवाद वाढविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादेतच हवा. सोशल मीडियाने जग जवळ आलं परंतु जवळची माणसं दुरावत आहेत. कुटुंबातील चार सदस्य एकत्र असताना एकमेकांशी संवाद साधायचा सोडून ते भलत्याच ठिकाणी ‘कनेक्ट’ असतात. ‘अलोन टुगेदर’ ही नव्यानेच रुजत असलेली संकल्पना वेळीच मोडीत काढत ‘ऑल टुगेदर’चाच पुरस्कार सर्वांनी करायला हवा. सध्या एकाद-दुसऱ्या महाविद्यालयामध्येच होत असलेल्या मानसिक स्वास्थाच्या चाचण्या राज्यातील प्रत्येक महाविद्यालयामध्ये व्हायला हव्यात. याद्वारे असे रुग्ण शोधून त्यांच्यावर वेळीच औषधोपचार तसेच समुपदेशन करून सुधारणा घडून आणता येईल आणि पुढील धोके टाळले जातील.      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com