agriculture stories in marathi agrowon agralekh on feroman trap | Agrowon

सापळ्यात अडकलाय शेतकरी
विजय सुकळकर
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

राज्यात अनेक स्थानिक कंपन्यांनी बोगस कामगंध सापळेनिर्मितीचा सपाटा लावला आहे. काही ठिकाणी तर मुदत संपलेले ल्यूर विकून कंपन्या नफा कमवत आहेत. 

यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक-दोन ठिकाणी दिसून आलेल्या गुलाबी बोंड अळीने महिनाभरात राज्य व्यापले आहे. अनेक गावांत या अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे. गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंधासाठी यावर्षी राज्यात पूर्व हंगामी कापूस लागवडीस बियाणे उपलब्ध न होऊ देण्यापासून ते पुढील प्रसार प्रचारावरही भर दिला आहे. परंतु, कृषी विभागाच्या याबाबतच्या प्रयत्नाला अपेक्षित यश लाभलेले नाही. राज्यात काही शेतकरी बीटी कापसावरील यावर्षीचा गुलाबी बोंड अळीचा उद्रेक पाहून कापूस उपटून टाकत आहेत. गुलाबी बोंड अळीचे सर्वेक्षण आणि नियंत्रणासाठी कपाशीच्या शेतात कामगंध सापळे लावण्याबाबत कृषी विभाग, कृषी विद्यापीठांद्वारे सांगितले जात आहे. धास्तावलेला शेतकरी वाट्टेल तिथून कामगंध सापळे उपलब्ध करण्यासाठी धडपडतो आहे. खरे तर यावर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कापसावर होणार, हे निश्चित होते. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने एकात्मिक नियंत्रणातील सर्व घटकांची पुरेशा प्रमाणात आणि योग्य गुणवत्तेत उपलब्धता करून देणे गरजेचे होते. प्रत्येक घटकांचा शास्त्रशुद्ध वापर कसा करायचा, याबाबतची माहिती प्रत्येक कापूस उत्पादकांपर्यंत पोचायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही. याचा फायदा राज्यातील काही नफेखोर कंपन्या उचलत आहेत. गुलाबी बोंड अळीचे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात या कंपन्या मात्र आपली संधी साधून घेत आहेत.   

बोंड अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी दोन तर नियंत्रणासाठी आठ कामगंध सापळे लावणे आवश्यक आहेत. सापळा लावताना त्याच्या पॉलिथीनचे खालचे टोक पिकाच्या सहा इंच वर असले पाहिजे. त्यातील ल्यूर हे अडकवायचे आणि कांडीमध्ये घालून लावायचे असे दोन प्रकारचे असतात. ते योग्य पद्धतीने लावले गेले पाहिजे. ल्यूर हे प्रत्येक किडीसाठी वेगळे असते. गुलाबी बोंड अळीसाठी त्याच किडीसाठीचे विशिष्ट ल्यूर लावायला पाहिजेत. महत्त्वाचे म्हणजे ल्यूर लावताना तंबाखूचा वगैरे हात असू नये. असे योग्य प्रबोधन किती कापूस उत्पादकांपर्यंत पोचले, हा आजही राज्यात संशोधनाचा विषय ठरू शकतो. त्याहून गंभीर बाब म्हणजे राज्यात अनेक स्थानिक कंपन्यांनी बोगस कामगंध सापळे निर्मितीचा सपाटा लावला आहे. कामगंध सापळा आणि ल्यूरची एकत्रित किंमत ४५ ते ५० रुपये असायला पाहिजे. परंतु, अनेक कंपन्या ७० ते १०० रुपयास एक कामगंध सापळा विकत आहेत. त्यावर कळस म्हणजे भातावरील खोडकिडीचे ल्यूर गुलाबी बोंड अळीसाठी वापरले जात आहेत. काही ठिकाणी तर मुदत संपलेले ल्यूर विकून कंपन्या नफा कमवत आहेत. अनेक कंपन्या शेतकऱ्यांना असे लूटत असताना कृषी विभागाचे मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे कामगंध सापळ्यांवर शेतकऱ्यांचा पैसा खर्च होतोय. परंतु, त्यात गुलाबी बोंड अळीचे पतंग मात्र अडकत नाहीत. 

कामगंध सापळ्याच्या या सर्व गौडबंगालाची कृषी विभागाने कसून चौकशी करायला हवी. सापळे, ल्यूरचे नमुने गोळा करून त्याची तपासणी व्हायला पाहिजे. त्यात बोगसगिरी आढळून आल्यास संबंधित कंपनीवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. विशेष म्हणजे अशा कंपन्यांना कामगंध सापळे, ल्यूर निर्मिती, विक्रीचे परवाने कोणी दिले, हेही पुढे यायला पाहिजे. काही ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावच कमी असल्यामुळे अथवा नसल्यामुळे सापळ्यात पतंग येत नसतील, तर तेही स्पष्ट व्हायला पाहिजे.

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...