शेखचिल्ली धारणा कधी बदलणार?

शेतकरी अस्मानी संकटाने गांजून गेलेला असताना समाजातील एक वर्ग मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात कोल्हेकुई करत आहे. त्यांचा पवित्रा शेखचिल्लीसारखा आहे.
संपादकीय
संपादकीय

खरीप पिकांच्या काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि रबी पिकांच्या काढणीला गारपिटीचा फटका हे दुष्टचक्र पाच-सहा हंगामापासून सुरू आहे. पण हवामानाचा अचूक अंदाज, भक्कम पीकविमा योजना आणि हवामानातील बदलाला सामोरे जाण्यासाठी सुयोग्य शेतीपद्धती या मूलभूत मुद्यांवर ठोस काम होताना दिसत नाही. केवळ पंचनामे, भरपाईचे कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानली जात आहे. शेतकरी अस्मानी संकटाने गांजून गेलेला असताना समाजातील एक वर्ग मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात कोल्हेकुई करत आहे. गारपीटग्रस्तांना मदतीचे पॅकेज अजून हवेतच असताना या पॅकेजमुळे राज्याची वित्तीय तूट वाढणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे. तसेच शेतकऱ्यांना बियाणे-वीज-पाणी फुकट मिळते, अनुदाने मिळतात, उत्पन्नावर शून्य कर लागतो, आणि तरीही ते कायम सरकार आणि निसर्गाच्या नावाने ओरडच करत असतात, असा सूर ही मंडळी आळवत आहेत.    हा युक्तिवाद वस्तुस्थितीला सोडून आहे. या मंडळींच्या शेती आणि शेतकऱ्यांबद्दलच्या धारणा किती सदोष, अर्धवट आणि पूर्वग्रहदूषित आहेत, हेच त्यावरून कळून येते. मुळात `शेतकऱ्याला उत्पादनखर्चाइतकाही भाव मिळू न देण्यासाठी कारणीभूत असणारी सरकारची चुकीची धोरणं, पायाभूत सुविधांची वानवा आणि  शेतकरी विरोधी कायदे` या तीन गोष्टींमुळे शेतीचा धंदा दिवाळखोरीत निघाला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी धोरणात्मक आणि संरचनात्मक सुधारणांची तातडीची गरज आहे, हे या मंडळींच्या गावीही नसते. परंतु मूळ दुखण्यावर इलाज न करता सरकारचा सगळा भर घोषणा, जुमलेबाजी आणि प्रतिमानिर्मितीवर आहे. बिगर शेतकरी समाजाच्या चुकीच्या धारणा सरकारच्या पथ्यावर पडतात.

आज जवळपास ५० टक्के लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे. समाजरूपी शरीराचा निम्मा भाग जराजर्जर झाला असेल तर तो समाज निरोगी कसा म्हणावा? शेतीच पिकली नाही तर सगळ्या अर्थव्यवस्थेचे चाक मंदीच्या चिखलात अडकून जातं. शेतमालाला चांगले भाव देणे हे शेतकऱ्यांवर केलेले उपकार नाहीत तर अर्थव्यवस्थेचा गाडा नीट चालावा म्हणून केलेला तो उपाय असतो. ग्रामीण लोकसंख्येची क्रयशक्ती वाढली नाही तर सगळ्या अर्थकारणालाच मोठा फटका बसतो. शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अशीच वाईट होत गेली तर अर्थव्यवस्था गळाठून जाईल. त्याचा परिणाम म्हणून सगळ्याच क्षेत्रांतल्या नोकऱ्या कमी होतील, व्यवसाय मार खातील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अन्नसुरक्षेचा. शेतकऱ्यांचं शोषण करण्याचं धोरण बदललं नाही आणि त्याला प्रतिसाद म्हणून शेतकऱ्यांनी पोटापुरतंच पिकवलं तर भारताच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्याची क्षमता जगातील कोणत्याच देशात नाही. शिवाय त्या वेळी अन्नधान्याच्या किंमती आभाळाला भिडतील. व्यवस्थेने प्रचंड कोंडी करूनही शेतकरी अजूनही संयम बाळगून आहे. आज देशाच्या काही पॉकेट्समध्ये नक्षलवादाचे अस्तित्व आहे. पण तरीही तो प्रश्न मोठी डोकेदुखी होऊन बसला आहे. उद्या शेतकऱ्यांनी नांगर सोडून संघर्षाचा पवित्रा घेतला तर किती अराजक माजेल! त्यामुळे शेतकऱ्यांचा जास्त अंत बघणे योग्य नाही. शेतकऱ्यांची उपेक्षा करून देशाची प्रगती करण्याचं स्वप्न पाहणं म्हणजे स्वतः बसलेल्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यासारखं आहे, याचं भान विसरून कसं चालेल?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com