‘जीएम’चा तिढा

एचटीबीटी कापूस असो की बीटी वांगी, हे खरोखरच व्यावसायिक लागवडीत अधिक उत्पादनक्षम, शेतकऱ्यांना फायदेशीर, जैवविविधता, तसेच पर्यावरणास पूरक आणि मानवी आरोग्यास सुरक्षित आहेत की नाहीत, याचा सोक्षमोक्ष आता लागायलाच हवा.
संपादकीय
संपादकीय

महिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या शेतात बीटी वांग्याची लागवड आढळून आली होती. त्या शेतकऱ्याच्या शेतातील वांग्याचे पीक जनुकीय सुधारित (जीएम) वाणाचेच असल्याचे तपासणीअंती सिद्ध झाल्यावर तेथील कृषी विभागाने ते उपटून नष्ट केले. तेव्हापासून जीएम तंत्रज्ञानाला परवानगीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशात बीटी कापसाशिवाय इतर कोणत्याही पिकामध्ये तसेच कापसामध्येसुद्धा तणनाशक सहनशील एचटीबीटी वाणांना परवानगी नाही. असे असले तरी पंजाब, हरियानामध्ये अवैध बीटी वांगे तसेच महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये एचटीबीटी कापसाची लागवड मागील तीन-चार वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे.

तुम्ही परवानगी दिली नाही तरी आम्ही चोरट्या मार्गाने आमचे बियाणे-वाण तुमच्या देशात घुसवू अन मग रीतसर परवानगी मिळवू, हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा डाव देशात यशस्वी होताना दिसतो. तंत्रज्ञान वापरास विरोध नको म्हणून आठवडाभरापूर्वी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अकोला जिल्ह्यातील अकोली जहॉँगीर येथे एचटीबीटी कापूस आणि बीटी वांग्याची लागवड करून आंदोलन छेडले. याची दखल केंद्रीय पर्यावरण विभागाने घेतली असून, राज्याला याबाबत खुलासा मागितला आहे.  खरे तर देशात अवैध जीएम वाणांना झपाट्याने होत असलेला प्रसार पाहता केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांची भूमिका पण संदिग्ध वाटते. देशात एचटीबीटी कापसाला परवानगीच नसताना मागील तीन-चार वर्षांपासून त्याची लाखो पाकिटे विकली जात आहेत. दरवर्षी लाखो हेक्टर क्षेत्र एचटीबीटी खाली असल्याचे बोलले जाते. एचटीबीटीच्या बीजोत्पादनापासून ते विक्रीपर्यंत कापूस उत्पादक प्रमुख राज्यांत एक मोठे रॅकेट काम करीत आहे. त्यास केंद्र-राज्य शासन आणि प्रशासनातील काही भ्रष्ट लोकांची साथ लाभते आहे, ही बाब अधिक गंभीर आहे. मागील तीन वर्षांपासून राज्यात एचटीबीटीचे साठे, विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकल्या जात आहेत, काही ठिकाणी अटकसत्रही सुरू आहे. परंतु हे सर्व ‘आम्ही मारल्यासारखे करतो तुम्ही रडल्यासारखे करा’ असाच प्रकार म्हणावा लागेल.  

सध्यातरी क्षेत्र वाढते आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या पसंतीस हे बियाणे उतरले आहे, असाच प्रसार-प्रचार होतोय. अशा प्रकारच्या एकंदरीत वातावरणात शेतकरी मात्र प्रचंड संभ्रमात आहेत. अशा वेळी एचटीबीटी कापूस असो की बीटी वांगे हे खरोखरच व्यावसायिक लागवडीत अधिक उत्पादनक्षम, शेतकऱ्यांना फायदेशीर, जैवविविधता तसेच पर्यावरणास पूरक आणि मानवी आरोग्यास सुरक्षित आहेत की नाहीत, याचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा. बीटी कापसाशिवाय इतर जीएम वाणांबाबत पर्यावरणवादी तसेच ग्रीनपीससारख्या संस्थांच्या काय तक्रारी आहेत, त्यात खरेच काही तथ्य आहे की नाही, हे कसून चाचण्या आणि खोलवर तपासणीअंती पुढे यायला हवे. हे वाण चांगले असतील तर ते केंद्र-राज्य शासनाच्या परवानगीने वैध स्वरूपात शेतकऱ्यांना मिळायला हवेत. तसेच यात काही गैर आढळून आल्यास त्यांचा देशात होत असलेला प्रसार थांबवावा लागेल. शेतकरी संघटनांनीसुद्धा परवानगीस प्रलंबित जीएम वाणांच्या चाचण्या आणि त्यानंतरच रीतसर निर्णय घेण्याबाबत केंद्र सरकारवर दबाव आणायला पाहिजे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com