शेळी दूध प्रकल्प कौतुकास्पदच!

बेलावे परिसरातील महिलांनी पारंपरिक मटणासाठी बोकड विक्रीत न अडकता शेळीचे दूध संकलन, प्रक्रिया आणि वितरणात पदार्पण केले आहे. या प्रकल्पातील सर्वांचा एकत्रित सहभाग कौतुकास्पद असून, हा प्रकल्प इतरांसाठी आदर्शवत ठरेल, अशी आशा करूया.
संपादकीय
संपादकीय

शेळीच्या दुधाचे संकलन, प्रक्रिया आणि विक्री प्रकल्प राज्यात सिन्नर तालुक्यातील बेलावे शिवारात स्थापन झाला आहे. दूध प्रक्रिया आणि विक्रीच्या सहकारी पद्धतीत आजपर्यंत गाय आणि म्हैस यांचे विशेष स्थान होते. मात्र गरिबांची गाय दूध देते, त्यावर प्रक्रिया करता येते आणि त्याचे प्रमाण विक्री योग्य एवढे मोठे असू शकते, याची जाणीव नारायणगावच्या शेती संस्थेने महाराष्ट्राला अगोदरच करून दिली आहे. परदेशातून सानेन शेळ्या आणून त्यांचे स्थानिक संगमनेरी शेळीशी संकरण झाल्याचा प्रयोग राज्याने ऐकला आहे. गाय असो किंवा शेळी दुधासाठी परदेशी गुणवत्तेशी संकर हा नियम दिसून आला आहे. मात्र म्हशींच्या दुधासाठी गुणवत्ता आणि प्रमाण देशातच वाढविण्यात आले. मुळात दूधवाढीसाठी आणि प्रमाणात भरपूर भर पडण्यासाठी राज्यामध्ये बंदिस्त शेळीपालनाचे प्रयोग यशस्वी झाले, याकडे लक्ष असणे गरजेचे आहे. शेळी बंदिस्त झाली आणि खुराक मिळण्याच्या सुधारणेने तिचे दूध उत्पादन वाढले, असा परिणाम व्यावसायिक शेळी पालकांना अनुभवता आल्यामुळेच शेळीचे दूध विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. 

शेळीच्या दुधात घन पदार्थ १३.३ टक्के, स्निग्धांश ४.४८ टक्के तर साखर ४.६ टक्के या प्रमाणात आढळते. पोष्टिक असणारे शेळीचे दूध महात्मा गांधींना आवडले; मात्र स्वातंत्र्योत्तर काळात शेळीच्या दुधाचा प्रसार-प्रचार करणारा राष्ट्रपुरुष दिसून आला नाही. परदेशात मात्र शेळीचे दूध मानवी आहारात आवडीने सेवन केले जाते. शिवाय शेळीच्या दुधापासून बनविलेले सगळे पदार्थ चवीने खाल्ले जातात. राज्यात शेळीचे दूध सहकारी पद्धतीने संकलित आणि वितरित होण्यासाठी मोठी व्यावसायिक चळवळ, संघटना आणि अभियान यांची गरज होती. ही उणीव सिन्नर तालुक्यातील प्रकल्पाने भरून निघाली आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. खरे तर राज्यात शेळीपालनात महिला आघाडीवर आहेत. परंतु बेलावे परिसरातील महिलांनी नेहमीच्या पारंपरिक मटणसाठी बोकड विक्रीत न अडकता शेळीचे दूध संकलन, प्रक्रिया आणि वितरणात पदार्पण केले आहे. त्यांना परिसरातील युवा मित्र संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विद्यापीठ आणि मुंबईतील एका संस्थेची साथ लाभली, हे सर्व कौतुकास्पदच म्हणावे लागेल. या प्रकल्पातील सर्वांचा एकत्रित सहभाग पाहता तो यशस्वी होईल आणि इतरांसाठी आदर्शवत ठरेल, अशी आशा करूया. 

राज्यात खासगी स्तरावर यापूर्वीच मुंबई, नाशिक आणि नगर येथे केवळ शेळी दूध विक्री केंद्रे उघडण्यात आली ही ताजी उदाहरणे सहकारी चळवळीला प्रोत्साहित करू शकतील. शेळी किती दूध देते आणि काढण्याचा खर्च परवडतो का, असा प्रश्न पारंपरिक शेळी पालकांना पडू शकेल मात्र बंदिस्त शेळीपालनात ‘पिळत गेलं की मिळत जातं’ हा दूध उत्पादनाचा संदेश महत्त्वाचा ठरतो. राज्यात शेळीच्या दूध संकलनासाठी दूध दोहन यंत्रे उपलब्ध करण्यात आलेली आहेत आणि दिवसभरात चार वेळेस दोहन केली जाणारी शेळी चार-पाच लिटर दूध उत्पादनापर्यंत पोचू शकेल, याची व्यावसायिक शेळीपालकांना खात्री आहे. राज्यातील ग्रामीण भागात बेरोजगारी वाढत आहे. शेतकरी महिलांनाही आर्थिक सबलतेसाठी काही ना काही पूरक व्यवसाय हवाच आहे. अशा तरुण बेरोजगार युवकांसाठी तसेच शेतकरी महिलांना दुधासाठी शेळीपालन तसेच शेळीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ विक्रीतून रोजगारच्या अनेक नव्या संधी लाभू शकतात. या संधीचा लाभ अधिकाधिक तरुणांनी तसेच महिलांनी घ्यायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com