शिक्षणातून वाढेल शेतीची गोडी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जगण्याच्या विषयाबाबत शाळेतून काहीही माहिती मिळत नसेल, तर ही बाब दुर्दैवीच म्हणावी लागेल.
संपादकीय
संपादकीय

पूर्वी लहान मूल शाळेत जात नसेल तेव्हा ‘शिकला नाही तर तुला ढोरं वळावी लागतील, अथवा रुमणं दाबावं लागेल,’ असे बोलले जात होते, आजही बोलले जाते. अर्थात शिक्षण घेतले तर नोकरीच करायची, शेती करण्याचा विचारही करायचा नाही, असेच लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवले जाते. यात तथ्यही आढळून येते. ग्रामीण भागातील बहुतांश मुले आजही दहावी-बारावीपर्यंत शिकतात. या शिक्षणात त्यास शेतीचे काहीही ज्ञान मिळत नाही. दहावी-बारावीनंतर शेतीसह इतर व्यावसायिक शिक्षणाचे धडे मिळतात. परंतु ग्रामीण भागातील बहुतांश मुले तिथपर्यंत पोचतच नाहीत. त्यामुळे शालेय शिक्षण घेऊन शेती करणाऱ्या मुलांना त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा फारसा फायदा होत नाही.

पूर्वी शेतीत फारशी आव्हाने नव्हती. त्यामुळे न शिकताही पारंपरिक पद्धतीने शेती करता येत होती. परंतु आज आपण पाहतोय, शेतीमध्ये आव्हाने वाढली आहेत. शेती क्षेत्र घटत चालले आहे, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास वाढला आहे, हवामान बदलाच्या काळात नैसर्गिक संकटे वाढली आहेत, शेतमाल विक्रीमध्ये अनेक समस्या पुढे येत आहेत. या सर्व आव्हानांचा सामना करीत शेतीत यशस्वी व्हायचे असेल, तर शेती समजून उमजूनच करावी लागेल आणि शेतीच्या शिक्षणाशिवाय हे शक्य नाही.

खरे तर शेती शिक्षणाचे धडे हे मुलांना शालेय शिक्षणापासूनच मिळायला हवेत. याबाबत २००० साल उजाडेपर्यंत तर विचारच झाला नाही. २००० पासून काही कृषी शास्त्रज्ञ याबाबत आग्रह करीत आहेत. २००८ मध्ये माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख यांनी शालेय शिक्षणात शेतीचे महत्त्व पटवून देत हा विषय पर्यायी नको तर सक्तीचा करावा, असा अहवालही शासनाला सादर केला आहे. परंतु याबाबतची शासनाची उदासीनता अनाकलनीयच म्हणावी लागेल.

महाराष्ट्रातील ५५ ते ६० टक्के लोक आजही ग्रामीण भागात राहतात. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे थेट शेती अथवा शेती आधारित इतर व्यवसाय असलेल्या कुटुंबातून येतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जगण्याच्या विषयाबाबत शाळेतून काहीही माहिती मिळत नाही, ही बाब दुर्दैवीच म्हणावी लागेल.

शालेय शिक्षणात शेतीचा समावेश करण्याचा विषय ज्या ज्या वेळी एेरणीवर येतो, तेव्हा शहरी भागातील लोकांचा तसेच शिक्षण विभागातील लॉबीचा त्यास विरोध होत असल्याचे दिसते. खरे तर आज ग्रामीण लोकांबरोबर शहरी लोकांनाही शेती शिक्षण गरजेचे झाले आहे. आपण खात असलेले अन्न कुठून आणि कसे येते, त्याचे उत्पादन कसे घेतले जाते, हे शहरी ग्राहकांना कळायला हवे. त्यामुळे शालेय शिक्षणात शेतीचा समावेश संपूर्ण राज्यभर पाचव्या वर्गापासूनच करायला हवा.

एवढे करूनही शहरी लोकांचा विरोध कायम राहत असेल, तर किमान ग्रामीण भागातील मुलांना तरी शेतीचे शिक्षण मिळायला हवे. आज शेतीबाबत नकारात्मक वातावरण आहे. शेती हे कष्टाचे काम असून, ती कायम तोट्यातच असते, असा प्रसार सर्वत्र झालेला असून, शेती करायला कोणीही तयार होताना दिसत नाही. अशा वेळी कृषी शिक्षणातून कमी कष्ट (अत्याधुनिक/यांत्रिक शेती) आणि फायदेशीर शेतीचे धडे मुलांना मिळाले तर त्यांची शेतीबाबत गोडी निर्माण होईल.

सध्याची शेती ही हवामान बदल, जागतिक पीकपद्धती आणि बाजार व्यवस्था, आयात-निर्यात याचा अभ्यास करून करावी लागणार आहे. शेतमालाचे केवळ उत्पादन घेऊन चालणार नाही, तर त्याचे मूल्यवर्धन-प्रक्रिया करून ग्राहकांना हव्या असलेल्या स्वरूपात बाजारात आणावे लागेल; आणि हे सर्व कृषी शिक्षणातूनच साध्य होणार असल्याने राज्य शासनाने याबाबत तत्काळ निर्णय घ्यायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com