शेतमाल खरेदीचा बोजवारा

व्यापाऱ्यांच्या मालाची खरेदी टाळण्याबरोबर पारदर्शक व्यवहारासाठी ऑनलाइन नोंदणीद्वारे शेतमाल खरेदीची पद्धत चांगली आहे. मात्र त्यातील काही जाचक नियम, त्रुटी शासनाला दूर कराव्या लागतील.
संपादकीय
संपादकीय
दसरा-दिवाळीआधी मूग आणि उडदाची विक्री शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावाने करावी लागली. आता दिवाळीनंतर सोयाबीन आणि कापसाचे दर कोसळले आहेत. सोयाबीनचा हमीभाव बोनससह ३०५० रुपये प्रतिक्विंटल अाहे. परंतु चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला १८०० ते २००० रुपये एवढा कमी दर मिळत आहे. कापसाचा हमीभाव प्रतिक्विंटल ४३३० रुपये असताना ३४०० ते ३६०० रुपये एवढ्या कमी दराने शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. या वर्षीचा खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांना अत्यंत वाईट अनुभव देऊन जातोय. नैसर्गिक आपत्तीने सर्वच पिकांच्या उत्पादनात ४० ते ६० टक्क्यांपर्यंत घट आढळून येत आहे. पिकांचा एकूण उत्पादन खर्च मागील काही वर्षांत प्रचंड वाढला आहे; मात्र या वर्षी सोयाबीनची काढणी असो की कापूस वेचणी ही कामे मजूरटंचाई आणि मजुरीच्या वाढलेल्या दराने अत्यंत जिकिरीचे ठरताहेत. सोयाबीनच्या काढणी, मळणीला एकरी ४००० रुपयांपर्यंत खर्च येतोय. तर कापसाच्या वेचणीला प्रतिकिलो सहा ते आठ रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे उत्पादनात घट असली, तरी अयोग्य प्रतीचा शेतमाल ठरवून तसेच आवकेत वाढ आणि उठावच नाही म्हणून व्यापाऱ्यांकडून अत्यंत कमी दरात खरेदी चालू आहे. अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये शासकीय सोयाबीन खरेदी जाचक नियम, निकष, अटींमध्ये अडकली असून, कापूस खरेदी केंद्रांना तर राज्यात अजूनही मुहूर्तच लाभलेला दिसत नाही. या वर्षी सोयाबीन काढणीच्या हंगामात राज्यात पाऊस होता. त्यामुळे शासनास अपेक्षित एफएक्यू प्रतीचा माल शेतकऱ्यांकडे मिळणे जवळपास अशक्य आहे. खरेदी केंद्रे तसेच बाजार समिती स्तरावर शेतमालाची विक्री करायची म्हटले, तर आधी ऑनलाइन नोंदणी करायची आहे. या नोंदणीकरिता सोयाबीनची पीकपेऱ्यात नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड आणि बॅंक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे. व्यापाऱ्यांच्या मालाची खरेदी टाळण्याबरोबर पारदर्शक व्यवहार आणि अचूक आकडेवारीसाठी ही पद्धत चांगली आहे. मात्र त्यातील काही जाचक नियम, त्रुटी शासनाला दूर कराव्या लागतील. बहुतांश शेतकऱ्यांच्या सातबारावर सोयाबीनची नोंदच नसल्याने ही अट शेतकऱ्यांना अडचणीची ठरते आहे. विशेष म्हणजे सोयाबीन खरेदी करताना एकरी आठ क्विंटलची अट असल्याने यापेक्षा अधिक उतारा आलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित मालाचे करायचे काय, हा प्रश्न आहे. कापसाच्या बाबतीत बोलायचे झाले तर पहिल्या-दुसऱ्या वेचणीचा कापूस भिजला असल्याने शेतकरी असा कापूस जास्त वेळ साठवून ठेऊ शकत नाहीत. त्यात कापसाची खरेदी केंद्रे राज्यात अजून सुरूच झालेली नाहीत. सध्या कापसाची ऑनलाइन नोंदणी चालू असून, त्यासाठीपण सोयाबीनसारखीच नियम-अटींची जंत्री आहे. राज्यात कापूस खरेदी केंद्रांना होत असलेल्या विलंबाचा फायदा गुजरातमधील जिनिंग व्यावसायिक, व्यापारी घेत आहेत. संपूर्ण खानदेशचा कापूस गुजरातमध्ये जात आहे. उर्वरित राज्यात खरिपाची उधारी तसेच कापूस वेचणीची मजुरी चुकती करण्यासाठी शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. गुजरातमध्ये सध्या कापसाला हमीभावाच्या जवळपास दर मिळत आहेत. पुढे आवक वाढून दर पडण्याचा अंदाज पाहून तेथील सरकारने हमीभावावर प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला आहे. ही घोषणा आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन केली असल्याची टीका होत असली, तरी त्याचा लाभ तेथील कापूस उत्पादकांना होणार आहे. आपल्या राज्यात तर सोयाबीन आणि कापसाला हमीभावाचाही आधार मिळत नसताना एकरी बोनस जाहीर करावा, नाहीतर हमीभाव आणि चालू भाव यांतील फरक तरी शेतकऱ्यांना द्यावा. असे केले तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com