एका ब्रॅंडमधून क्रांती

सेंद्रिय शेतमालाचा एकच ब्रॅंड केला, तर देश-विदेशातील ग्राहकांना गुणवत्तेबाबत खात्री पटून देशांतर्गत खप आणि निर्यातही अनेक पटीने वाढणार आहे.
संपादकीय
संपादकीय
राज्यात कुठे सेंद्रिय शेतमाल थेट विक्री केंद्रे सुरू होत आहेत, कुठे सेंद्रिय शेतमालाचे गट-समूह एकत्र येऊन उत्पादन विक्री करत आहेत. काही संस्था सेंद्रिय शेती उत्पादन, प्रमाणिकरण, मूल्यवर्धन, विक्री, निर्यात याबाबत प्रशिक्षण, चर्चासत्रे, कार्यशाळा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. सेंद्रिय निविष्ठांच्या उत्पादनातही काही जण सक्रिय आहेत. यावरून हे स्पष्ट होते, की रासायनिक अवशेष विरहीत आरोग्यदायी सेंद्रिय शेतमालाच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. आपले राज्य, देशच नव्हे, तर जगभरातून सेंद्रिय पदार्थांची मागणी वाढत आहे. असे असताना राज्यातील काही गट-समूह सोडले तर शेतकरी, निविष्ठा उत्पादक, विक्रेते-निर्यातदार यांच्याकडून वैयक्तिक पातळीवर काम चालू असून, त्यात सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीच्या या चळवळीत राज्य शासनाचे धोरण अत्यंत उदासीन असल्याचे दिसून येते. अशावेळी सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन ते विक्री यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शेतकरी, गट, कंपन्या यांचे संघटन करण्याबाबत माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सेंद्रिय शेतकऱ्यांचे गट, उत्पादक कंपन्या यांच्या संघटनातून सेंद्रिय उत्पादनाचा राज्याचा एकच ब्रॅंड बनविण्याचा निर्णयही दोन दिवसांपूर्वीच ‘व्हीएसआय’ येथील एका कार्यक्रमात झाला. राज्यात अनेक वर्षांपासून शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत; परंतु या शेतकऱ्यांना अजूनही सेंद्रिय शेतमाल उत्पादनासाठी जमीन तयारीपासून ते काढणीपश्वात तंत्रज्ञान याबाबत पीकनिहाय ए-टू-झेड उत्पादन तंत्र मिळत नाही. सेंद्रिय शेतमालाच्या विक्रीत तर समस्यांच समस्या आहेत. ग्राहकांमध्येही सेंद्रिय मालाच्या गुणवत्तेबाबत संभ्रमाचे वातावरण दिसून येते. शासनानेही सेंद्रिय शेतीचे अनेक गट केलेत; परंतु मार्केटिंग लिंग न झाल्याने या गटांचे उत्पादनांचे कामही थंडावले आहे. राज्यात सेंद्रिय शेती चळवळ अपेक्षित गतीने पुढे न जाण्यास कारण म्हणजे यातील सर्व कामे धोरणाशिवाय चालू आहेत. आघाडी सरकारच्या काळात गट-समूहाच्या माध्यमातून ही चळवळ पुढे नेण्यासाठी सेंद्रिय शेतीचे धोरण आणणे गेले; परंतु उशिरा जाहीर केलेल्या धोरणाच्या अनुषंगिक कोणतेच प्रशासकीय काम झाले नाही. फडणवीस सरकारने हे धोरण मोडीत काढून केंद्र शासनाच्या अभियानात परंपरागत कृषी विकास योजनेखाली सेंद्रिय शेतीचे काम चालू केले; परंतु त्यातही फारसे काही काम होताना दिसत नाही. अशावेळी सेंद्रिय शेती संबंधित सर्वच एकत्र येत असतील, तर ही बाब जमेचीच म्हणावी लागेल. या संघटनातून उत्पादकांना पीकनिहाय मार्गदर्शन करणे तसेच मध्यस्थ-विक्रेते यांना मूल्यवर्धन, ब्रॅंडिंग, विक्री याबाबत सोयीसुविधा उपलब्ध करून सोयीचे पडणार आहे. पुणे शहरात प्रायोगिक तत्त्वावर शहरातील प्रमुख ठिकाणी सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. राज्यात पुण्याबरोबर मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव या शहरांमध्ये सेंद्रिय बाजारपेठ वाढत असताना तिथेही विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. सेंद्रिय शेतमालाचा एकच ब्रॅंड केला, तर देश-विदेशातील ग्राहकांना गुणवत्तेबाबत खात्री पटून देशांतर्गत खप आणि निर्यातही अनेक पटीने वाढणार आहे. राज्यातील सेंद्रिय शेतीत क्रांती घडवून आणणारा हा निर्णय ठरणार असल्याने याबाबत सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com