Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on options for bt. | Agrowon

आता पर्याय हवाच
विजय सुकळकर
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

अधिक कालावधीच्या संकरित बीटी कापसाखालील क्षेत्र हळूहळू कमी करून कमी कालावधीची बीटीची सरळ वाण, देशी वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला हवीत.
 

रसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही शेतकऱ्यांना फवारण्या कराव्या लागत असल्याने त्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. बोलगार्ड-२ कापसाच्या वाणांपासून अपेक्षित उत्पादकताही मिळत नसल्याने कापूस उत्पादक अडचणीत आहे. बीटी कापसाच्या वापराबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करावे, अशी विनंती राज्य शासनाने या हंगामाच्या सुरवातीलाच केली होती. त्यावर केंद्र शासनाने नॉन बीटीचा वापर कटाक्षाने करा, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होईल, असा सल्ला राज्याला दिला होता.

महाराष्ट्रासह इतर राज्यांतील कापूस उत्पादकही बीटीवरील किडींच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्रस्त आहेत. हा विषय संशोधनासंबंधी असताना यावर ‘आयसीएआर’चे मत काय आहे, हे जाणून घेणे गरजेचे होते. या संस्थेनेदेखील बीजी-२ वाणांचा वापर देशात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बीजी-१ कापसाची वाणं हिरवी, ठिपक्याची आणि शेंदरी अशा तिन्ही बोंडअळ्यांना प्रतिकारक होती. त्यानंतर २००६-०७ मध्ये या तिन्ही बोंडअळ्यांसह लष्करी अळीस प्रतिकारक बीजी-२ ची वाण बाजारात आली. खरे तर बीजी-१ आणि बीजी-२ या दोन्ही प्रकारची वाणं बोंड अळीला प्रतिकारक असताना आणि देशभरात कुठेही कापसावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत नसताना ही वाणं आपण केवळ स्वीकारलीच नाही; तर त्यांचा प्रसारही झपाट्याने झाला आहे.  

आज कापसाच्या क्षेत्रापैकी ९८ टक्के क्षेत्र बीजी-२ खाली आहे. गंभीर बाब म्हणजे कापसाचे पीक परवडत नसतानाही पर्यायी पिके, पर्यायी कापसाची वाण उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना बीजी-२ चाच वापर करावा लागत आहे. बीटीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रामुख्याने बियाणे उत्पादक कंपन्या जबाबदार आहेत. बियाण्यात बीटी जनुकांचा योग्य वापर न करण्याबरोबर काही कंपन्या बोगस कापसाचे बियाणे विकून स्वतःची चांदी करून घेत आहेत. बीटी कापसाच्या लागवडीसोबत थोड्या प्रमाणात ‘रेफ्युजी’ (नॉन बीटी) लावणे गरजेचे असताना अनेक कंपन्या बीटीच्या पाकिटामध्ये नॉनबीटी बियाणे देतच नाहीत. काही कंपन्या असे बियाणे देत असल्या तरी त्याचे महत्त्व पटवून देण्यात कृषी विभाग मागे पडला. त्यामुळे कापूस उत्पादकांकडून याबाबत दुर्लक्ष झाले. बोंड अळीला पर्यायी खाद्यच नसल्यामुळे त्यांच्यात बीटी जनुकाबाबत प्रतिकारशक्ती निर्माण होऊन मागील काही वर्षांत कापसावर गुलाबी बोंड अळीचा उद्रेक पाहावयास मिळतो.

देशभरातील कापसाखालील क्षेत्र टिकवून शेतकऱ्यांना हे पीक फायदेशीर ठरण्यासाठी शेतकरी, कृषी विद्यापीठे, बियाणे उत्पादक कंपन्या आणि शासन यांना सामूहिक प्रयत्न करावे लागतील. जीईएसी ने निर्बंध घातल्याप्रमाणे आता नर आणि मादीतही बीटी जनुकांचा निर्धारित प्रमाणात समावेश असणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य शासनाने बीजी-२ ची अशीच वाणं बाजारात येतील हे पाहावे. बीटी कापसाच्या लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी नॉन बीटीसह पीक फेरपालट, लवकर येणाऱ्या वाणांची निवड, उन्हाळभर बांधावर पऱ्हाट्या न ठेवणे या बाबींचे पालन करायला हवे.

अधिक कालावधीच्या संकरित बीटी कापसाखालील क्षेत्र हळूहळू कमी करून कमी कालावधीची बीटीची सरळ वाणं, देशी वाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला हवीत. देशी कापसाची काही नवीन वाणं रसशोषक किडी, बोंड अळीला प्रतिकारक असून, त्यांचा धागाही लांब आहे. अशा वाणांचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये करून त्याचे प्रगत लागवड तंत्र शेतकऱ्यांना दिले तर मान्यता रद्द न करताही राज्यात, देशात बीजी-२ खालील क्षेत्र कमी होईल. 

इतर अॅग्रो विशेष
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...
सोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...
तेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...
‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...
अभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...
समविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...
स्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...
भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...