घातक किडींविरुद्ध लढा एकत्र

पूर्वहंगामी पावसाने किंवा मृगाचा चांगला पाऊस पडल्यावर हुमणीचे भुंगेरे वर येतात. हे भुंगेरे गोळा करून नष्ट करण्याचे नियोजन योग्यच म्हणावे लागेल. यातून हुमणीच्या प्रादुर्भावाला चांगलाच आळा बसू शकतो.
संपादकीय
संपादकीय

को ल्हापूर जिल्ह्यात या वर्षीपासून कृषी विभाग व साखर कारखाने यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हुमणी प्रतिबंधक मोहीम’ हाती घेण्यात आली आहे. यात जिल्ह्याधिकाऱ्याच्या माध्यमातून महसूल विभागानेदेखील सहभाग नोंदविला आहे. आत्मा सोबतीला आहेच. हुमणीला नियोजनात्मक नष्ट करण्यासाठीची ही सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातील पहिलीच मोहीम आहे. आपल्या देशात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या काही प्रमुख किडी आहेत, त्यात हुमणीचा क्रमांक बराच वरचा लागतो. हुमणी ही बहुभक्षी कीड असून, याची अळी उसासह तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, नगदी पिके, फळे-भाजीपाला पिकांच्या मुळावर आपली उपजीविका भागवते. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यामध्ये कृषी विभाग व साखर कारखाने यांच्या माध्यमातून हुमणी नियंत्रणासाठी आपापल्या पातळीवर प्रयत्न झालेत. परंतु त्यांचे फारसे चांगले परिणाम पुढे आलेले नाहीत. त्यामुळेच या परिसरात दरवर्षी हुमणीचा प्रादुर्भाव वाढून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता जिल्ह्यातील ६०० गावांत एकाच वेळी हुमणी हटाव मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी सर्वांचा सहभाग आणि टायमिंग चांगलेच साधले आहे. हुमणीची अळी जमिनीत राहत असल्याने तिचे नियंत्रण करणे कठीण जाते. त्यामुळे पूर्वहंगामी पावसाने किंवा मृगाचा चांगला पाऊस पडल्यावर हुमणीचे भुंगेरे वर येतात. हे भुंगेरे गोळा करून नष्ट करण्याचे नियोजन योग्यच म्हणावे लागेल. यातून हुमणीच्या प्रादुर्भावाला  चांगलाच आळा बसू शकतो. पुढे ऊस पिकावर या किडीचा थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला तरी, कीडनाशक फवारणीचेही नियोजन आहे. या मोहिमेअंतर्गत कीडनाशके खरेदी तसेच फवारणीचा भार शेतकऱ्यांवर पडणार नाही, ही बाबही उल्लेखनीयच!

हुमणीचा प्रादुर्भाव कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, नगर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील बीड, जालना, औरंगाबाद या भागातील उसावरही मोठ्या प्रमाणावर होतो. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे मराठवाडा, विदर्भातील खरीप तसेच रब्बी पिके हुमणीने अनेक वेळा उद्‍ध्वस्त केली आहेत. २०१५ च्या रब्बी हंगामात तर हुमणीच्या प्रादुर्भावाने मराठवाड्यातील काही भागात दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे केवळ एका जिल्ह्यात एका पिकापुरती ही मोहीम मर्यादित राहू नये. हुमणी या किडीचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर, अशी हुमणी प्रतिबंधक मोहीम तिच्या ‘होस्ट रेंज’मधील सर्व पिकांवर राज्यभर राबवायला हवी. 

अलीकडे हवामान बदलाच्या काळात हुमणीसह इतरही किडी अत्यंत घातक ठरत आहेत. त्यात अमेरिकन लष्करी अळी (फॉल आर्मी वर्म), गुलाबी बोंड अळी तसेच कडधान्ये आणि तेलबिया पिकांवरील पाने खाणाऱ्या अळ्या यांचा उल्लेख करता येईल. अमेरिकन लष्करी अळी ही कीड राज्यात नव्याने दाखल झालेली, परंतु मक्यासह इतरही महत्त्वाच्या पिकांवर झपाट्याने हल्ला चढवित आहे. मागील खरिपात या किडीकडे खरे तर सर्वांचेच दुर्लक्ष झाले. त्यामुळे रब्बीमध्ये किडीचा प्रादुर्भाव वाढला. सध्या सुरू ऊस आणि हळदीमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या मधुमका पिकावर या किडीने हल्ला चढविला आहे. मधुमक्याच्या नुकत्याच उगवून आलेल्या कोंबांचा ही कीड फडशा पाडत आहे. मका उपलब्ध नसलेल्या ठिकाणी अमेरिकन लष्करी अळी उसासह इतरही पिकांवर आक्रमण करीत आहे. या किडीचा भविष्यातील धोका लक्षात घेऊन तिच्या प्रतिबंधासाठी अशीच मोहीम हाती घ्यायला हवी. विदर्भ, मराठवाड्यात कापसावर गुलाबी बोंड अळी, तसेच सोयाबीनवर पाने खाणारी अळी या किडीही हंगामात अत्यंत घातक ठरत आहेत. त्यामुळे या किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीसुद्धा अशीच सर्वसमावेशक आणि व्यापक मोहीम राबविणे गरजेचे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com