राधामोहनजी पुन्हा बडबडले

शेतीच्या सर्वाधिक अस्वस्थ अशा सध्याच्या काळाचे धनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह आहेत, हे शेतकऱ्यांबद्दल काही वक्तव्य करताना त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
sampadkiya
sampadkiya

मध्य प्रदेशमधील भाजपच्या एका महामंत्र्याने शेतकऱ्यांवर उधळलेली ‘स्तुतिसुमने’ सोशल मीडियातून देशभर पसरत आहेत. शेतकऱ्यांना चोर, बेईमान, बदमाश असे संबोधणाऱ्या या महाशयाच्या पुढील वाक्यांचे वर्णनसुद्धा केले जाऊ शकत नाही. त्याचा निषेध सर्वत्र सुरू असतानाच केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना देशभर सुरू असलेला शेतकऱ्यांचा संघर्ष नाटकी वाटतो, यात त्यांना पब्लिसिटी स्टंट दिसतो. शेतकऱ्यांचा ‘उद्धार’ करण्याची त्यांची ही काही पहिलीच वेळ नाही, त्यांना ती सवयच लागली अाहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी देशात वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे प्रेम प्रकरण, गृह कलह, अपत्य न होणे अशी असल्याचा जावईशोध त्यांनी लावला होता. त्यानंतरही हमीभाव, आयात-निर्यात असो की योगिक शेती याबाबतची त्यांची बाष्कळ बडबड जगजाहीर आहे. मोदी सरकारचा चार वर्षांचा कार्यकाळ हा या देशातील शेती, शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात वाईट म्हणावा लागेल. सर्वाधिक अस्वस्थ अशा या काळाचे धनी कृषिमंत्री राधामोहनसिंह आहेत, हे शेतकऱ्यांबद्दल काही बडबड करताना त्यांनी लक्षात घ्यायला हवे. कृषिमंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यापासून आपले कर्तत्व शून्य असून शेतीबाबतच्या उदासीनतेने शेतकरी देशोधडीला लागत अाहेत, हे त्यांनी विसरता कामा नये. अडचणीतील शेतकऱ्यांना संवेदनशीलता दाखविणे तर दूरच राहिले, परंतू त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून कृषिमंत्री स्वःतच पब्लिसिटी स्टंट करीत आहेत की काय? अशी शंका उपस्थित होते. कारण पब्लिसिटी स्टंट हे शेतकरी नाही, तर नेते आणि अभिनेतेच करू शकतात, हे सर्वजण जाणतात. 

कृषिमंत्री होण्यापूर्वी राधामोहनसिंह हे नाव देशात फारसे कोणाला ज्ञात नव्हते. मोदी लाटेत अनेकांचा जसा उद्धार झाला तसाच यांचाही झाला अन् केंद्रीय कृषिमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. मंत्री पद घोषित होताना एवढ्या महत्त्वाच्या पदाला ते न्याय देऊ शकतील का? अशी शंका अनेकांना वाटत होती. सत्तासंपादनानंतरच्या चार वर्षात लोकांच्या मनातील ही शंका रास्त होती, हे राधामोहनसिंह यांनीच सिद्ध केले आहे. त्यांनी सत्ता संपादन करताना कृषीचा विकासदर असो की शेतमाल निर्यातीचा टक्का यात चढता आलेख होता. मागील तीन-चार वर्षाच्या अनुकूल नैसर्गिक परिस्थितीच्या काळात शेतीची अधिक भरभराट होणे अपेक्षित असताना केवळ आपल्या चुकीच्या धोरणांनी शेतीची वाट लावण्याचे काम त्यांनी केले. शेतकऱ्यांवर केवळ घोषणांचा पाऊस चालू असून वास्तविक परिस्थिती तर शेतीला ना पाणी, ना वीज, ना शेतमालास भाव अशी आहे. शेतमालाचे उत्पादन वाढत असताना अधिकाधिक निर्यात करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होऊ द्यायचा सोडून केंद्र सरकारचा भर आयातीवर राहिला आहे. मागील चार वर्षांमध्ये शेतीला उभारी देणारा एकही नाविण्यपूर्ण उपक्रम, योजना, कार्यक्रम केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राबविलेला नाही. जमिनीची आरोग्यपत्रिका वाटपासून ते पीकविमा योजनेपर्यंत मागील शासन काळातील योजनांचीच नावे, निकष बदलून त्यांना ‘रि-प्रोजेक्ट’ केले जात आहे. विशेष म्हणजे अंमलबजावणीच्या पातळीवर या सर्व योजनांचे तीन तेरा वाजलेले आहेत. एक वर्षापासून देशभरातील शेतकरी संप, आंदोलन, मोर्च्यांच्या रुपाने रस्त्यावर उतरलेला आहे. हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून पोटच्या लेकराप्रमाणे वाढविलेला शेतमाल रस्त्यावर फेकून देण्यात कसली स्टंटबाजी! असे करताना शेतकऱ्यांना होणाऱ्या यातनांची जाण नाही तर नाही, त्यावर मीठ चोळण्याचे काम तरी कृषिमंत्र्यांनी करू नये एवढेच!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com