चिंब झाली रान माती...

मागील तीन वर्षांपासून राज्यात समाधानकारक पाऊस पडूनही खरीप पिकांचे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना मिळत नाही, याची दखल सर्वांनी घ्यायला हवी.
संपादकीय
संपादकीय

कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीत सर्वाधिक हालअपेष्टा शेतकऱ्यांना सोसाव्या लागतात. पिण्याच्या पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भटकंतीपासून शेतातील उभे पीक वाळताना त्यास वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची चाललेली धडपड, हे सर्व आठवले तर अंगावर काटा येतो. त्यामुळेच  नको देऊ सोनं नाणं, नको देऊ हिरे मोती लई पडू दे पाऊस,    चिंब कर रान माती  अशी प्रार्थना बळिराजा करीत असतो. बळिराजाची ही प्रार्थना वरुणराजापर्यंत पोचलेली दिसते. त्यामुळे या वर्षी आत्तापर्यंत तरी राज्यात सर्वदूर (अपवाद काही भाग) चांगला पाऊस पडला आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून अजून आठवडाभर कुठे जोरदार, मध्यम तर कुठे हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर राज्यात पावसाने लावलेल्या हजेरीनंतर पेरणीस सुरवात झाली होती. आठवडाभराच्या उघडिपीने पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु त्यानंतर अधूनमधून होणाऱ्या वृष्टीने बहुतांश भागातील पेरण्या उरकल्या आहेत. सध्या मराठवाडा, विदर्भ, खानदेश, दक्षिण महाराष्ट्र या भागातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका, ज्वारी आदी पिके वाढीच्या अवस्थेत असून, त्यासाठी सध्याचा पाऊस चांगला आहे. या भागांमध्ये नदी, नाल्याचे पाणी पात्राबाहेर पडून काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे, तर सखल भागात पाणी साचून पिके पिवळी पडत आहेत. असे असले तरी मराठवाडा, नाशिक, नगरचा दुष्काळी पट्टा कोल्हापूरचा पूर्व भाग आणि पूर्व विदर्भात अजूनही पाऊस कमी असून पेरणीसाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. 

ज्या भागात पावसाअभावी पेरण्या लांबलेल्या आहेत, जिथे समाधानकारक पाऊस झाल्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्या उरकून घ्यायला हव्यात. सखल भागातील शेतात साचलेले पावसाचे पाणी चर काढून बाहेर काढायला हवे. सततच्या पावसाने पिकाची वाढ खुंटलेल्या शेतात वाफसा आल्याबरोबर आंतरमशागतीची कामे उरकून घ्यायला हवीत. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण कीड-रोगास पोषक असते. अशा वेळी तज्ज्ञाच्या सल्ल्याने कीड-रोगासाठी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय योजना शेतकऱ्यांनी हाती घ्यायला हव्यात. मागील तीन वर्षांमध्ये राज्यात समाधानकारक पाऊस पडूनही खरीप पिकांचे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना मिळत नाही. यामागची नेमकी कारणे काय आहेत, हे कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यातील तज्ज्ञांनी शोधून त्यावरील उपायांबाबत शेतकऱ्यांना प्रबोधन करायला हवे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने मुळा, गिरणा, येलदरी अशी काही धरणे सोडली तर राज्यातील उर्वरित धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. पावसाळा अजून अडीच महिने बाकी आहे. या काळात चांगला पाऊस झाला, तर राज्यातील बहुतांश धरणे भरतील, हे चित्र काहीसे आश्वासक आहे. असे असले तरी उपलब्ध पाणी वापरायचे कसे, हे आपल्याला माहीत नाही. शेतकरी त्याच्याजवळील जलसाठ्यातील (विहीर, बोअरवेल, शेततळे) पाणी खरीप-रब्बी-उन्हाळी हंगामासाठी वेळेवर वापरून त्याचा अपेक्षित लाभ पदरात पाडून घेतो. परंतु धरणात साठलेले पाणी वेळेवर न सोडणे, सोडले तरी कालवे, चाऱ्या, पाटचाऱ्या यांची देखभाल दुरुस्ती नसल्याने गळतीद्वारे बहुतांश पाणी वायाच जाते. हे टाळले तरच अडविलेल्या, साठविलेल्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com