मसाला पिकांचा पर्याय उत्तम

विदर्भातील स्थानिक बाजार समित्या देशभरातील मसाला पिकांच्या मोठ्या बाजारपेठांशी जोडण्यात याव्यात. असे झाल्यास ओवा, बडीशेप या पिकांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होईल.
संपादकीय
संपादकीय

विदर्भात काळी, कसदार जमीन आहे. निश्चित पावसाचा   हा प्रदेश मानला जातो; परंतु या भागातील बहुतांश शेती ही जिरायती आहे. या भागात खरिपात कापूस, सोयाबीन; तर रब्बीमध्ये हरभरा, गहू ही पिके सोडली तर फारशी पर्यायी पिके उपलब्ध नाहीत. सिंचनाच्या सुविधेअभावी विदर्भात फळे-फुले-भाजीपाला लागवडीस मर्यादा आहेत.

कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा यांची घटती उत्पादकता आणि या पिकांना मिळणारा अत्यंत कमी भाव यामुळे ही पिके शेतकऱ्यांना परवडेवाशी झाली आहेत. सातत्याने तोट्याच्या शेतीमुळे विदर्भात कर्जबाजारीपणा वाढत असून, त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढताहेत. अशावेळी या भागात शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील अशी पर्यायी पिके शेतकऱ्यांना मिळायला हवीत.

खरे तर विदर्भातील खारपाण पट्ट्यात कापसाच्या बाद फुलीवर शेतकरी ओवा, बडीशेपची लागवड पूर्वापार करीत होते. त्यात त्यांना चांगले उत्पादन मिळत होते. त्यातूनच या पिकांच्या सलग लागवडीचा विचार पुढे आला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे २००९-१० पासून चालू असलेल्या संशोधनात विदर्भातील वातावरण ओवा, बडीशेपला पोषक असून, या पिकाचे खर्च मिळकतीचे गुणोत्तरही फायदेशीर आढळून आले आहे.

शेतकऱ्यांचा या पिकांच्या लागवडीकडे कल वाढत असताना त्यावर उत्पादनवाढीच्या अनुषंगाने अधिक संशोधन व्हायला हवे; तसेच ओवा, बडीशेप यांचे काढणीपश्चात व्यवस्थापन विकसित करून देशभरातील बाजारपेठांशी येथील शेतकऱ्यांना जोडण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील.

ओवा, बडीशेप ही दोन्ही पिके रब्बी हंगामात येतात; तर खारपाण पट्ट्यात या पिकांची लागवड ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात (लेट खरीप) करावी लागते. या दोन्ही पिकांना रासायनिक खते अजिबात लागत नाहीत. या पिकांवर रोग किडींचा फारसा प्रादुर्भावही होत नाही. त्यामुळे फवारणीवरील खर्चही नसल्यातच जमा आहे. उत्पादन खर्च अत्यंत कमी, चांगले उत्पादन आणि भावही बऱ्यापैकी मिळत असल्याने या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. अशावेळी ओवा, बडीशेपच्या अधिक उत्पादनक्षम स्थानिक जाती शेतकऱ्यांना मिळायला हव्यात; तसेच त्यांचे उत्पादनवाढीचे प्रगत तंत्र विकसित होणेही गरजेचे आहे.

सातत्याच्या संशोधनातूनच हे शक्य असल्याने राष्ट्रीय मसाला बीज संशोधन केंद्राचे ‘सब-सेंटर’ अकोला येथील कृषी विद्यापीठात देण्याच्या बाबतीतही विचार व्हायला हवा. सध्या मजुरांची टंचाई सर्वत्रच जाणवत असल्याने या पिकांची काढणी, मळणीसाठी छोटी छोटी यंत्रे विकसित करावी लागतील. यावर अकोला येथील कृषी विद्यापीठात काम सुरू असल्याचे कळते, ते अधिक गतिमान करावे लागेल.

महत्त्वाचे म्हणजे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथे ओवा, बडीशेपच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. सध्या तेथील व्यापारी विदर्भात येऊन ओवा, बडीशेपची खरेदी करीत आहेत; परंतु विदर्भातील स्थानिक बाजार समित्या देशभरातील मसाला पिकांच्या मोठ्या बाजारपेठांशी जोडाव्यात. असे झाल्यास या मसाला पिकांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होईल. याबाबतचा प्रस्ताव कृषी विद्यापीठाने दोन वेळा कृषी आयुक्तांकडे पाठविला असल्याचे कळते. तो मार्गी लागल्यास या मसाला पिकांच्या लागवडीस विदर्भातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.

धने, जीरे, ओवा, बडीशेप यांचा बऱ्याच आजारांवर (विशेषतः पचनसंस्थेचे) आयुर्वेदिक औषध म्हणूनही वापर वाढतोय. त्यामुळे यांची मागणी सातत्याने वाढत जाणार आहे. अशावेळी देशभरातील बाजारपेठांशी विदर्भातील उत्पादक जोडला गेल्यास त्यांचा फायदाच होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com