तूरपुराण, यंदाही गाजणार!

शासकीय खरेदी केंद्रावरील एमएसपीने शेतमालाची खरेदी हे शेतकऱ्यांसाठी मृगजळच असते, असा आजवरचा सोयाबीन, कापसासह तुरीबाबतचा अनुभव आहे.
संपादकीय
संपादकीय

मागील खरिपातील जिरायती शेतीतील शेवटचे पीक तूर आता   बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. या पिकालादेखील किमान आधारभूत किमतीचा (एमएसपी) आधार मिळताना दिसत नाही. खरिपातील सर्वांत आधी येणाऱ्या मुगापासून एमएसपीपेक्षा कमी भाव मिळण्याचे सत्र सर्वांत शेवटी येणाऱ्या तूर पिकापर्यंत चालू आहे. तुरीला बोनससह ५४५० रुपये प्रतिक्विंटल एमएसपी असताना यापेक्षा हजार, दीड हजार रुपये कमी दराने तुरीची खरेदी चालू आहे. तुरीच्या हंगामाची ही सुरवात असल्याने बाजारात आवक कमी आहे, तरी दर मात्र एमएसपीपेक्षा कमी मिळत आहेत. पुढे तुरीची आवक वाढल्यास दर अजून पडण्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्र शासनाच्या वतीने यंदाही राज्यात एमएसपीने तुरीची खरेदी केली जाईल, असे शासनाने जाहीर केले आहे.

राज्याला सुमारे साडेचार लाख टन तूर खरेदीचे निर्देशही केंद्राने दिले आहेत. तूर उत्पादनातील अग्रक्रमावर असलेल्या महाराष्ट्रात सुमारे २० लाख टन उत्पादनाचा अंदाज असताना, शासन खरेदीचा आकडा फारच कमी म्हणावा लागेल. राज्यात ३८ लाख टनांवर सोयाबीनचे उत्पादन होत असताना, केंद्र शासनाने केवळ एक लाख टन सोयाबीनला एमएसपीने खरेदीस मंजुरी दिली होती. यामुळे सोयाबीनचे दर एमएसपीच्या वर राहतील, असा दावाही केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी केला होता. मात्र सोयाबीनला प्रतिक्विंटल ३०५० रुपये एमएसपी असताना हंगाम संपेपर्यंत २५०० ते २८०० रुपयेच दर मिळाला. तुरीचेही असेच होणार, असे संकेत सध्यातरी मिळत आहेत. 

गेल्या वर्षी राज्यात विक्रमी तुरीचे उत्पादन (२०.३६ लाख टन) झाले होते. शासनाने तुरीचा दाणा न दाणा खरेदी करू, असे जाहीरही केले होते; परंतु केवळ साडेसहा लाख टन तुरीची खरेदी करतानाच शासनाची उडालेली त्रेधा आणि शेतकऱ्यांचे झालेले हाल जगजाहीर आहेत. मात्र, यातून शासनाने काहीही धडा घेतलेला दिसत नाही. या वर्षीची शासनाची एमएसपीने तूर खरेदी नोंदणीतच अडकलेली दिसते आहे. गंभीर बाब म्हणजे शासकीय खरेदी केंद्रांवरील एमएसपीने शेतमालाची खरेदी हे शेतकऱ्यांसाठी मृगजळच असते, असा आजवरचा सोयाबीन, कापसासह तुरीबाबतचा अनुभव आहे. खरेदी केंद्रावर केंद्र शासनाने निश्चित केलेल्या मापदंडात बहुतांश शेतकऱ्यांचा शेतमाल बसतच नाही. त्यात पुन्हा ऑनलाइन नोंद करून माल नेण्यासाठी एसएमएसची वाट पाहा, माल विक्रीसाठी कागदपत्रांची जंत्री या सर्व भानगडीमध्ये शेतकरी पडत नाही. परिणामी खरेदी केंद्रांवर अपेक्षित शेतमालाची खरेदी होत नाही, हेही सत्य आहे.

बारदाण्याच्या तुडवड्यामुळे मागील हंगामात तूर खरेदी रखडली होती. ते संकट या वर्षीसुद्धा कायम आहे. शासनाचे ऑनलाइन अनुदान वाटप असो की शेतमाल खरेदी, या संकल्पना आणि योजनादेखील चांगल्या आहेत. ऑनलाइन प्रक्रियेने पारदर्शकता येऊन अनेक गैरप्रकारांना आळा बसतो; परंतु त्यासाठी मागील अनुभवातून शिकत अंमलबजावणीमध्ये सुधारणा अपेक्षित आहेत. त्या होताना दिसत नाहीत; आणि मग ‘येरे माझ्या मागल्या’ अशी शासनाची अवस्था होते. या वर्षी खरेदी केंद्रांवर तूर खरेदी अजूनही चालू झाली नसून केवळ नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे. परंतु ही प्रक्रिया सुलभ, शेतकरीभिमुख केली नाही तर गाजावाजा करूनही त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com