संघर्ष वाढला; मदतही वाढवा

वन्यप्राण्यांकडून शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अडचणींचा डोंगरच आहे.
संपादकीय
संपादकीय

वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या  कायदेशीर वारसास आता १५ लाख रुपये, तर पाळीव प्राणी गाय, बैल, म्हैस यांची वन्यजीव प्राण्याने शिकार केली तर प्रत्येकी ६० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच जाहीर केले आहे. यापूर्वी वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसास १० लाख तर पाळीव प्राण्यांचा जीव गेल्यास संबंधित शेतकऱ्याला ४० हजार रुपये मदत मिळत होती. राज्यात अवनी वाघिणीला ठार मारल्यानंतर मानव-वन्यप्राणी संघर्ष हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वन्यप्राणी व नागरिक या दोघांचाही जीव महत्त्वाचा असून त्यांचे संरक्षण व्हायलाच पाहिजे. पूर्वी दुर्गम, डोंगराळ भागात वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर यांच्या हल्ल्याचे प्रसंग क्वचितच घडत होते. परंतु, अलीकडच्या काळात वन्यप्राण्यांचे मानवावरील हल्ले सर्वत्रच होत असून त्यांचे प्रमाणही वाढले आहे. यात अनेक शेतकरी, शेतमजूर गंभीर जखमी होताहेत, अनेकांना आपले प्राणही गमवावे लागत आहेत. खरे तर मनुष्य असो अथवा प्राणी त्यांच्या प्राणाचे मोल होऊच शकत नाही तरीपण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानव अथवा पाळीव प्राणी यांचा जीव गेल्यानंतर मिळणाऱ्या मदतीत शासनाने वाढ केली ते बरेच झाले. परंतु, या दोहोंसाठीसुद्धा मदत मिळण्यासाठीच्या अटी-शर्ती अत्यंत किचकट असल्यामुळे अनेकजण लाभापासून वंचितच राहतात. हल्ला झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला कळविण्याचा कालावधी, पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यावरील वेळेचे बंधन यासह इतरही अटी शर्तीत शिथिलता देऊन अधिकाधिक नुकसानग्रस्तांपर्यंत शासन ही मदत पोचू शकते.

वन्यप्राणी केवळ मानव अथवा पाळीव प्राण्यावरच हल्ला करीत नाहीत तर हरिण, हत्ती, रोही, रानगवे, रानडुकरे, नीलगायी, वानरे हे प्राणी शेतपिकांचे अतोनात नुकसान करतात. शेतकरी दिवसभर पिकांची राखण करतो. परंतु रोही, रानडुकरे, नीलगायी रात्री पिकांवर डल्ला मारतात. रात्री शेत राखणीला जावे तर वाघ, रानडुकरे, अस्वल यांच्या हल्ल्याची भीती! विशेष म्हणजे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान झाल्यास मिळणारी भरपाई एक हजार रुपयांपासून ते २५ हजारांपर्यंतच आहे. अनेकवेळा यापेक्षा कितीतरी अधिक पटीने शेतमालाचे नुकसान वन्यप्राण्यांकडून होते. ही बाब विचारात घेऊन वास्तवात किती नुकसान झाले त्याप्रमाणात मदत मिळायला हवी. वन्यप्राण्यांकडून शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अडचणीचा डोंगरच आहे. पीक नुकसानीची तक्रार संबंधित वनअधिकाऱ्याकडे तीन दिवसांत करावी, वनअधिकाऱ्याने १० दिवसांच्या आत घटनेची शहानिशा अर्थात जागेवर जाऊन पंचनामा, नुकसान क्षेत्राची मोजणी, पुरावे तपासणी, मूल्य ठरविणे करायला पाहिजे, अशी अट आहे. गंमत म्हणजे वानरे, रोही, हरिण, रानडुकरे हे जवळपास रोजच पिकांवर हल्ला करीत असताना शेतकऱ्यांनी तक्रार कधी आणि किती वेळा करायची? हा प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रानडुकरांसह अनेक वन्यप्राण्यांचे नुकसान कळायला काही दिवस लागतात. तर हरिण, नीलगायींचे नुकसान काही दिवसानंतर दिसूनच येत नाही. पिकांच्या नुकसानीत एवढे वैविध्य असताना फक्त एकदा पाहणी करून किती नुकसान झाले, हे सांगता येणार नाही. एकंदरीतच वन्यप्राण्यांनी केलेल्या शेतपिकांच्या नुकसानीत सध्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीत शेतकऱ्यांना न्याय देणारी पद्धती विकसित करायला हवी. हे करीत असताना शासनासह सर्वांनीच मानव-वन्यप्राणी संघर्ष कसा कमी होईल, हेही पाहावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com