तंत्र सायप्रिनस माशांच्या बीजोत्पादनाचे

सायप्रिनस माशाच्या बीजोत्पादनासाठी तलावामध्ये तयार केलेला हापा.
सायप्रिनस माशाच्या बीजोत्पादनासाठी तलावामध्ये तयार केलेला हापा.

प्रजनन योग्य नर आणि मादीची निवड 

  • सायप्रिनस हा मासा साधारणतः सहा ते आठ महिन्यानंतर प्रजननक्षम होतो; परंतु प्रजनन करण्यासाठी १ ते २ वर्षे वयाचे, तसेच १ ते २.५ किलो वजनाचे नर व मादी निवडणे हे उत्तम प्रतिच्या बीजनिर्मितीसाठी आवश्‍यक आहे. 
  •  नर माशांच्या कल्ल्याच्या मागचे कुक्षी पर आतील बाजूस खरखरीत असतो.त्याचे पोट दाबले असता पांढरट रंगाचा द्रव बाहेर पडतो. तो प्रजनन योग्य नर असतो. 
  • प्रजनन योग्य मादीच्या ओळखीच्या खुणा म्हणजे कल्ल्याच्या मागील कुक्षीपर आतील बाजूस गुळगुळीत असतो. पोट फुगीर असून, थोडासा दाब दिल्यावर पिवळसर अंडी बाहेर येतात.
  • बीजोत्पादनाची पूर्वतयारी  

  • माशाचा प्रजनन हंगाम प्रामुख्याने जानेवारी ते मार्च आणि जुले ते ऑगस्ट यादरम्यान असतो. प्रजनन हंगामाच्या दोन महिने अगोदर वयात आलेले नर व माद्या वेगवेगळ्या तलावात ठेवाव्यात. 
  •  माशांना साधारणतः त्याच्या वजनाच्या तीन ते पाच टक्के प्रमाणात पूरक खाद्य द्यावे. पूरक खाद्यामध्ये शेंगदाणा पेंड व भाताचा कोंडा १ः१ या सम प्रमाणात द्यावे.
  •  माशांचे प्रजनन व बीजोत्पादन नायलॉन हाप्यामध्ये करता येते. याकरिता तलावात चार बांबूचे खांब रोवून त्याला नायलॉन (२ मी. x १ मी. x १ मी.) व्यवस्थित बांधून घ्यावे. या वेळी तलावामध्ये १ ते १.५ मीटर खोलीपर्यंत पाणी भरलेले असावे. 
  •  माशांची अंडी चिकटणारी असतात. प्रजनन झाल्यानंतर ही अंडी चिकटण्याकरिता हाप्यामध्ये हायड्रिलासारख्या पाणवनस्पती दोरीने बांधून ठेवाव्यात किंवा प्लॅस्टिक पिशवीच्या २ ते ३ फुटाच्या पट्ट्या कापून एकत्रित दोरीने बांधून एका टोकास दगड बांधून हाप्यामध्ये पसराव्यात. 
  •  सायप्रिनस माशाचे प्रजनन यशस्वीरीत्या करण्याकरिता तज्ज्ञांच्या सल्याने संप्रेरकाचे इंजेक्‍शन प्रजननक्षम नर आणि प्रजननक्षम मादीस दिले जाते. 
  •  संध्याकाळच्या थंड हवामानात हाप्यामध्ये हे प्रजननक्षम मादी व नर  १ः२ या प्रमाणात सोडावेत. साधारणतः १० ते १२ तासांत मादी अंडी सोडते. मादीने सोडलेल्या अंड्यावर नर पांढरा द्रव पसरवून ती फलित करतो. अंडी घालण्याची क्रिया तीन ते चार तास चालू राहते. 
  •  साधारणपणे एक किलोची मादी १.५ ते २ लाख अंडी देऊ शकते. त्यानंतर अंड्यांना इजा होऊ नये  याकरिता नर व मादी हाप्यातून बाहेर काढून वेगवेगळ्या तलावात सोडावेत. अंडी चिकटलेल्या प्लॅस्टीकच्या पट्ट्यावर पोटॅशिअम परमॅगनेटचे द्रावण शिंपडावे. यामुळे अंड्यावर होणारा बुरशीचा संसर्ग टाळता येते. 
  •  फलीत झालेली अंडी पारदर्शक पिवळी रंगाची व १.२ ते १.८ मिलिमीटर व्यासाची असतात; तसेच फलीत न झालेली अंडी पांढऱ्या रंगाची असतात.
  •  फलीत झालेल्या अंड्यातून २ ते ३ दिवसांनंतर पिल्ले बाहेर पडण्यास सुरवात होते. पहिल्या २ ते ३ दिवसांत ही पिले त्यांच्या पोटावरील अन्न पिशवीत असलेल्या अन्नावर उपजीविका करतात. त्यानंतर ती तलावातील प्लवंग खावू शकतात. या पिलांना मत्स्य जिरे असे म्हणतात. हाप्यातील प्लॅस्टिकच्या पट्ट्या काळजीपूर्वक हलवून काढाव्यात. त्यामुळे त्यांना चिकटलेले, अडकलेले मत्स्य जिरे मोकळे होवून हाप्यातील पाण्यात राहतील. यानंतर हे  मत्स्य जिरे सकाळी किंवा थंडवेळी हाप्यामधून काढावेत. हे मत्स्य जिरे नंतर मत्स्यबीज अवस्थेपर्यंत वाढण्याकरिता संगोपन तलावात सोडतात.
  • मत्स्य बोटुकलीचे उत्पादन 

  •  मत्स्य बोटुकली उत्पादनासाठी साधारणतः ०.५ ते १ हेक्‍टर आकाराचा संचयन तलावात करतात. संचनाची पूर्वतयारी ही संगोपन तलावासारखीच करतात. 
  • मत्स्यबीजापासून बोटुकली अवस्थेपर्यंत वाढण्याकरिता २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामध्ये संचयनाचा दर २ ते ३ लाख मत्स्यबीज इतका असतो. 
  •  मत्स्य बीजाच्या उत्तम वाढीकरता शेंगदाणा पेंड व भाताचा कोंडा १ः१ या सम प्रमाणात पूरक खाद्य म्हणून वापरतात. पूरक खाद्याचे प्रमाण पहिल्या महिन्यात एकूण वजनाच्या ८ ते १० टक्के, दुसऱ्या महिन्यात ६ ते ८ टक्के इतके असते. चांगल्या तऱ्हेने व्यवस्थापन केल्यास ६० ते ७० टक्के जगणुकीचे प्रमाण मिळते. 
  •    सायप्रिनस मासांचे संगोपन व संवर्धन खोदकाम केलेल्या तलावामध्ये करावे. 
  • तलावाचे क्षेत्र

  • मत्स्यबीज उत्पादन करण्याकरिता ०.०५ ते ०.१ हेक्‍टर क्षेत्रफळ आणि १ ते १.५ मीटर खोल असणारा संगोपन तलाव निवडावेत. संगोपन तलावात मत्स्य जिरे सोडण्यापूर्वी पूर्वतयारी करणे आवश्‍यक असते. 
  •  सुरवातीला संगोपन तलावातील सर्व पाणी काढून टाकल्यानंतर तलाव कमीत कमी १ ते २ आठवडे उन्हात सुकवावा. यानंतर तलावात पाणी भरावे.
  •  तलावातील पाण्याची सामू हा साधारणपणे ७ ते ८.५ च्या दरम्यान असेल, तर मत्स्य जिऱ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते. सामू कमी असेल तर चुना वापरावा. जास्त असेल तर जिप्समचा शिफारशीनुसार वापर करावा.
  •   तलावातील पाण्यातील पाणकीटक व किड्यांचा नायनाट करावा. याकरिता तज्ज्ञांच्या सल्याने तलावामध्ये दर हेक्‍टरी ६० किलो तेल व २० किलो साबण यांचे मिश्रण करून पाण्यात पसरावे.
  •  संगोपन तलावातील पाण्यात योग्य प्रमाणात नैसर्गिक खाद्य म्हणजेच प्लवंग तयार होण्याकरिता दर हेक्‍टरी ७०० किलो शेंगदाणा पेंड, २०० किलो शेण आणि ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण वापरावे. या मिश्रणापैकी निम्मे मिश्रण पाण्यात व्यवस्थित मिसळून मत्स्यजिरे संचयनापूर्वी संगोपन तलावात २ ते ३ दिवस अगोदर पसरविले जाते. उरलेले मिश्रण २ किंवा ३ मात्रेच्या स्वरूपात तलावातील प्लंवगाच्या पातळीनुसार टाकावे. 
  •  यानंतर ३-५ दशलक्ष प्रतिहेक्‍टर या प्रमाणात मत्स्य जिरे संचयन करावे. संगोपन कालावधी १५ ते २० दिवस इतका असतो. तलावातील नैसर्गिक खाद्याबरोबरच मत्स्य जिऱ्यांची वाढ चांगली होण्याकरिता पूरक खाद्य द्यावे. पूरक खाद्याचे प्रमाण पहिल्या आठवड्यात सहा किलो प्रति दशलक्ष मत्स्यजिरे प्रति दिन आणि दुसऱ्या आठवड्यात बारा किलो प्रति दशलक्ष मत्स्यजिरे प्रति दिन ठेवावे. साधरणतः ३० ते ४० टक्के जगणुकीचे प्रमाण मिळते. हे मत्स्यबीज नंतर बोटुकली अवस्थेपर्यंत वाढण्याकरिता संचयन तलावात सोडतात.
  • सायप्रिनस मासा  

  • हा मासा चीन या देशातील आहे. हा मासा काळपट, हिरवट, पिवळसर, सोनेरी, लालसर इ. विविध रंगांत आढळतो. 
  •  माशाच्या खालच्या व वरच्या जबड्यास मिळून एकूण चार मिशा असतात. पृष्ठपर लांब असतो. त्याच्या सुरवातीला किंचित दातेरी काटा असतो. 
  •  स्केल कार्प, मिरर कार्प आणि लेदर कार्प या तीन उपजाती आहेत. यापैकी भारतामध्ये स्केल कार्प या उपजातीचे मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन व संवर्धन केले जाते.
  • संपर्क ः डॉ. अजय कुलकर्णी, ९८६००७९८२६  

    मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com