क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी उपाययोजना

क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी उपाययोजना

क्षारयुक्त पाण्याचा वापर, उसासाठी पाण्याचा अमर्याद वापर, खडकांची झीज होऊन सखल भागात क्षारांची साठवण, भारी - काळ्या जमिनी नैसर्गिक उताराचा अभाव, यांत्रिकीकरणामुळे जमिनीचे सपाटीकरण आणि नैसर्गिक चरबंदी, रासायनिक खताचा असमतोल वापर इत्यादी कारणांमुळे जमिनी क्षारपड होत चालल्या आहेत. पाण्याचा अमर्याद वापर, बागायती क्षेत्राची अति बांध-बंदिस्ती, नैसर्गिक चरांची सपाटीकरण, जमिनीचा प्रकार विचारात न घेता पिकांना पाणी देण्याची पद्धत इ. कारणांमुळे जमिनी पाणथळ बनत गेलेल्या आहेत.

  • क्षारयुक्त जमिनीमध्ये विद्राव्य क्षारांचे प्रमाण चारपेक्षा जास्त आणि विनिमयुक्त सोडियम १५ पेक्षा कमी असून, अशा जमिनीवर पांढरे क्षार दिसून येतात. 
  •  चोपण व क्षारयुक्त जमिनीमध्ये विद्राव्य क्षाराचे प्रमाण चारपेक्षा कमी आणि विनिमययुक्त सोडियम १५ पेक्षा जास्त असते, अशा जमिनीवर पांढरा व राखेसारखा क्षाराचा थर असतो. अशा जमिनींमध्ये पीक उत्पादनात घट येते.
  •  जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे उपयुक्त जिवाणूची वाढ होत नाही. बुरशीजन्य रोगाची वाढ होते. सोडियम आणि क्‍लोराइड यांचे प्रमाण वाढल्यामुळे पिके पाणी कमी प्रमाणात शोषून घेतात, त्यामुळे पिकांच्या वाढीवर प्रतीकूल परिणाम होतो.
  • उपाययोजना ः 

  •  क्षारपड जमींन सुधारण्यासाठी क्षारपड व क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये भूमिगत बंदिस्त निचरा प्रणाली राबविणे आवश्‍यक आहे. 
  •  जमिनीच्या पृष्ठभागाखाली ०.९ ते १.८ मीटर खोलीवर सच्छिद्र पी.व्ही.सी. ड्रेनेज पाइप टाकून त्या पाइपभोवती फिल्टर म्हणून ७.५ ते १० सें.मी. जाडीचा वाळूचा थर किंवा कापडी फिल्टर गुंडाळून पाइप जमिनीत गाडाव्यात. या पद्धतीमध्ये मुख्य नळी व उप मुख्य नळ्या व उपनळ्या यांच्या जाळ्यांची अशा प्रकारे रचना केली जाते, की जेणेकरून पिकांच्या मुळाच्या कक्षेतील क्षार व अतिरिक्त पाणी शेतीच्या बाहेर सोडले जाते. या पद्धतीसाठी सर्वसाधारण दर हेक्‍टरी रुपये एक लाख इतका खर्च येतो. 
  •  क्षारयुक्त व क्षारयुक्त चोपण जमिनीतील निचरा होण्यासाठी मोल निचरापद्धती राबविणे आवश्‍यक आहे. या पद्धतीमध्ये मोल नांगराच्या साह्याने दोन मोलमधील अंतर चार मीटर ठेवून त्याची खोली ६० सें.मी. पर्यंत असावी. ही प्रणाली ज्या जमिनीमध्ये चिकण मातीच्या प्रमाणे ३५ टक्यांपेक्षा जास्त आहे आणि जमिनीस उतार अाहे येथे बसवावी. या प्रणालीची आयुमर्यादा ४ ते ५ वर्षे आहे. या प्रणालीसाठी एकरी ५ ते ६ हजार रुपये खर्च येतो.
  •  क्षारपड जमिनीची समस्या कमी करण्यासाठी एकच पीक न घेता पिकाची फेरपालट, हिरवळीची पिके, ताग, धैंचा, शेवरीसारखी पिके घेऊन जमिनीत गाडल्यास जमिनीची जडण-घडण सुधारते. प्रामुख्याने ऊस, कापूस, गहू, पालक, शुगरबीट, निलगरी ही पिके क्षारास प्रतिकारक आहेत. अशा जमिनीत द्विदलवर्गीय पिके घेऊ नयेत.
  • जमिनीची क्षारता कमी करण्यासाठी व क्षारपड जमिनीची सुधारणा झाल्यानंतर जमिनीत पाण्याची पातळी वाढू नये यासाठी पिकास गरजेपुरते पाणी द्यावे. त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
  •  जमिनीची मशागत खोलवर करावी. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी मुरण्याची क्षमता वाढते, पृष्ठभागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. 
  •  क्षारपड जमिनी शक्‍यतो मोकळ्या ठेऊ नयेत. कारण जमिनीच्या खालच्या थरातील क्षार बाष्पीभवनामुळे पृष्ठभागावर येतात. यासाठी शेतीतील सेंद्रिय पदार्थ, उसाचे पाचट, गव्हाचा भुसा, पालापाचोळा, काड्यांचे आच्छादन म्हणून वापर करावा.
  •  क्षारपड जमिनीमध्ये रासायनिक खते देण्यापूर्वी त्या जमिनीचे मातीपरीक्षण करून घ्यावे. क्षारपड व चोपण जमिनीतून नत्राचा बऱ्याच प्रमाणात ऱ्हास होतो. त्यासाठी नत्र खताची मात्रा २५ टक्क्यांपेक्षा जास्त देणे फायद्याचे ठरते. या जमिनीत स्फुरद, लोह व जस्ताची कमतरता आढळते. रासायनिक खते सेंद्रिय खते व जैविक खते यांचा समतोल वापर केल्याने अशा जमिनी लवकरात लवकर पीक उत्पादनासाठी फायद्याच्या ठरतात.
  •  क्षारयुक्त व चोपण जमिनी होऊ नये, त्यासाठी जमिनीमध्ये पाणी साठवून राहणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा निचरा योग्य होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत.  योग्य वाढीसाठी व उत्पादनासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी, रोग, कीड व्यवस्थापन करावे. माती व पाण्याच्या तपासणीनुसार उपाययोजना करावी.
  • संपर्क ः डॉ. भीमराव कांबळे, ८२७५३७६९४८ (कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com