विविध योजनांचा लाभ घेत बोराळे गाव प्रगतिपथावर

ग्रामस्थांची एकजूटच गावच्या विकासाला कारणीभूत ठरली आहे.
ग्रामस्थांची एकजूटच गावच्या विकासाला कारणीभूत ठरली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बोराळे (ता. नांदगाव) या गावाने विविध विकासकामे तडीस नेत प्रगतीकडे लक्षणीय वाटचाल केली आहे. ग्रामस्थांची एकजूटच त्यामागे कारणीभूत ठरली आहे. शेतीप्रधान असलेल्या या गावातील नागरिकांनी शेती व ग्रामविकास अशी दोन्ही बाबींची चांगली सांगड घातली आहे. शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभही गावाने घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्‍याच्या ठिकाणापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर गिरणा नदीच्या काठावर बोराळे गाव वसले आहे. काही वर्षांपूर्वी विकासापासून वंचित असताना गेल्या काही वर्षांत मात्र विकासात भरारी घेणारे हे लक्षवेधी गाव ठरले आहे. गावाच्या वरच्या बाजूला साधारणतः चार किलोमीटर अंतरावर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे गिरणा धरण आहे. या धरणाचा फायदा नांदगाव तालुक्‍यातील बोटावर मोजण्याइतक्‍याच गावांना होतो. त्यात बोराळे हे देखील गाव आहे.

एकीचे बळ दाखवले बोराळे गावात उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती हेच आहे. प्रगतीकडे वाटचाल करण्याबाबतीत ग्रामस्थांची एकी पाहायला मिळते. गिरणा नदीपात्रातील वाळू (रेती) किमती आहे. एकजुटीतूनच विस्तीर्ण नदीपात्रातील वाळू बोराळेच्या ग्रामस्थांनी सांभाळली आहे. प्रसंगी कोर्टकचेऱ्यांही त्यांनी केल्या. यास्तव लोकवर्गणी करून त्यांनी एकत्रित लढा दिला. आज त्यामुळेच गावाची परिस्थिती बदलणे शक्य झाले. वाळूंनी भरलेले भरगच्च नदीपात्र आज दिमाखाने मिरवते आहे. परिसरातील विहिरींतील पाणीपातळी सदैव टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे.

नांदगाव तालुक्‍यातील पहिले स्मार्ट ग्राम सन २०११ च्या जनगणनेनुसार बोराळे गावाची लोकसंख्या २१९८ आहे. विमुक्त जमाती लोकसंख्या सर्वाधिक आहे. गावाला २०१६-१७ साठी शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या स्मार्ट ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या रूपाने दहा लाख रुपयांचा निधी ग्रामपालिकेला प्राप्त होणार आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गतही याच वर्षासाठी तालुका स्तरावर द्वितीय पुरस्कार गावाला मिळाला आहे. येथील राजेंद्र थोरात यांनाही यापूर्वी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला आहे. जनसुविधा योजनेंतर्गत तालुक्‍यातील पहिले वातानुकूलित व उपसरपंच या पदांची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर विकासकामांचा आलेख वाढता ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

प्रगतीतील अन्य बाबी

  • सन १९६१ पासून म्हणजे ग्रामपंचायत निर्मितीपासून आतापावेतो सर्व नोंदी अद्ययावत स्वरूपात व सुव्यवस्थित ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामपालिकेचे सर्व व्यवहार संगणकीकृत आहेत.
  • गावात भूमिगत गटार आहे. पुरस्कारातील दहा लाख रुपयांच्या निधीतून त्यासंबंधीचे उर्वरित काम व घंटागाडी घेण्याचे प्रस्तावित आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ही कामे प्रस्तावित आहेत.
  • गावातील उघड्या गटारी बंद झाल्याने डासांचे प्रमाण व पर्यायाने रोगराईचे प्रमाण कमी झाले आहे. गाव आज ८० टक्के गटारमुक्त झाले आहे.
  • गावात सुमारे ३५० घरे आहेत. त्यापैकी ३३५ वैयक्तिक शौचालये आहेत, तर १५ घरे सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात.
  • एक मार्च, २०१६ अखेर गाव हागणदारीमुक्त झाले आहे.
  • गावात पहिली ते चौथी व पहिली ते सातवी अशा दोन शाळा आहेत. दोन्ही डिजिटल आहेत.
  • ग्रामपालिकेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्यात येतात.
  • पंधरा ऑगस्ट, २०१५ पासून ग्रामपालिकेने वाचनालय सुरू केले आहे. त्याद्वारे सकाळ व ॲग्रोवन ही दैनिके ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात येतात. समाजकल्याण विभागांतर्गत मिळालेल्या पुस्तकांचा वापरही ग्रामस्थ करू लागले आहेत. गावातील नागरिकही काही पुस्तके भेट देतात.
  • गावातील वाद सामंजस्याने मिटविले जातात. तीन वर्षात एकही वादग्रस्त प्रकरण झाले नसल्याचे आढळले आहे. गावच्या एकीमुळे वादविवादांना फाटा दिला जातो.
  • व्यसनमुक्ती शिबिरासाठी वाहनांची ग्रामपालिकेतर्फे मोफत व्यवस्था केली जाते.
  • ठक्कर बप्पा योजनेंतर्गत साडेबारा लाख रुपयांचा निधी सार्वजनिक मंडपासाठी, तर मुलांच्या क्रीडांगणासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. व्यायामशाळेसाठी पाच लाख रुपये निधी प्रस्तावित आहे.
  • शेतीतही प्रगती

    गावाचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ६२३ हेक्‍टर आहे. बहुतांश जमीन बागायती स्वरूपाची आहे. केळी, ऊस, कांदा, कपाशी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. सुमारे ५० टक्के क्षेत्र ठिबकखाली आहे. पुढील काळात शंभर टक्के क्षेत्र ठिबकखाली आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे उपसरपंच राजेंद्र पवार यांनी सांगितले. गिरणा नदीपात्रात वाळूउपशाबंदी असल्याने विहिरींना भरपूर पाणी असते. शेतकरी सुधारित यंत्रांचा वापर करतात. पीक उत्पादकता समाधानकारक असते. गिरणा धरणातून डिसेंबर ते मार्चपर्यंत पाण्याचे आवर्तन जळगाव जिल्ह्यासाठी सोडण्यात येते. बोराळे गाव नदीपात्रामुळे दोन विभागांत गेले आहे. नदीपात्रापलीकडे सुमारे २०० हेक्‍टर शेतीक्षेत्र व पाचशेपर्यंत लोकसंख्या आहे. त्यांना प्रसंगी नदीच्या पाण्याची पातळी पाहून ये-जा करावी लागते. नदीपात्रात पुलाची मागणी ग्रामस्थांची आहे. जेणेकरून शेतमालाची वाहतूक व परिसरातील पाचशेहून अधिक लोकांच्या येण्याजाण्याचा प्रश्‍न सुटेल.

    विविध योजनांतर्गत विकासकामे

    गावाच्या विकासाच्या अनुषंगाने रस्त्याच्या डांबरीकरणाची दोन टप्प्यांत कामे मंजूर करून घेतली असून हे काम पूर्ण झाले आहे. तांडा सुधार योजनेंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमी, आमदार निधीअंतर्गत मोरी बांधकाम, दलीत वस्ती सुधारअंतर्गत भूमिगत गटार व रस्ता कॉंक्रीटीकरण ही कामे मार्गी लागली आहेत. सध्या विविध योजनांतर्गत सभामंडप, शौचालय दुरुस्ती, वृक्षसंवर्धन, दहा सौर पथदिवे, सात सिंचन विहिरी, त्याचबरोबर काही घरकुले मंजूर झाली आहेत. युवकांसाठी क्रीडांगण, व्यायामशाळा साहित्य, गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प, बगीचा, घाटकाम, प्राथमिक शाळेला प्रशस्त इमारत अनुषंगाने अन्य कामे प्रस्तावित आहेत. प्रतिक्रिया... स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत जनजागृतीकामी महिला सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ग्रामस्थ एकत्र आल्यानेच गावची प्रगती वेगाने होण्यास चालना मिळाली. - सुनंदा अशोक मोरे, सरपंच, बोराळे

    सर्वांना सोबत घेऊन विकासकामे केली. लोकहिताला प्राधान्य दिले तर कामे यशस्वी होतात हे अनुभवण्यास मिळाले. ग्रामस्थांबरोबरच माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरीताई बोरसे व महेंद्र बोरसे यांचेही सहकार्य लाभले. - राजेंद्र पवार, उपसरपंच, बोराळे, संपर्क ः ९३२५९३८३३३

    संपर्क ः राजेंद्र थोरात, ९६८९१९५३१५ ग्रामसेवक, बोराळे  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com