जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक सिंचनासाठी आराखडा

जमिनीची प्रत आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचे नियोजन करावे.
जमिनीची प्रत आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचे नियोजन करावे.

ऊस पिकामध्ये ठिबक सिंचन संच बसविताना जमिनीच्या प्रकारानुसार दोन सऱ्यांमधील अंतर, ड्रीपरमधून पडणारे पाणी आणि दोन ड्रीपरमधील अंतर यांचे योग्य नियोजन अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे पिकास आवश्‍यक तेवढे पाणी देऊन पाण्याची बचत व पिकाचे योग्य पोषण होते.

  • जमिनीच्या प्रकारानुसार दोन सऱ्यांमधील अंतर ठरवावे. त्यानुसारच ड्रिपरमधून पडणारे पाणी (ड्रिपर डिसचार्ज) व दोन ड्रिपरमधील अंतर ठेवावे. 
  •  जमिनीच्या मगदुरानुसार ड्रिपर्सची संख्या व त्यांची योग्य जागा अवलंबून असते. उदा. भारी काळ्या जमिनीत केशाकर्षण दाब जास्त असतो. त्यामुळे पाणी आडवे पसरते. तुलनेने गुरुत्वाकर्षण दाब कमी असल्यामुळे पाणी कमी खोल जाते. या उलट हलक्या, मुरमाड वा वालुकामय जमिनीत केशाकर्षण दाब हा गुरुत्वाकर्षण दाबापेक्षा कमी असतो. तसेच जमिनीच्या कणांमध्ये पोकळीही जास्त असल्याने त्यांचे एकमेकांविषयी आकर्षण नसते. या सर्व बाबींमुळे पाणी आडवे न पसरता खाली जाते. 
  •  मध्यम जमिनीत हे प्रमाण दोन्ही (हलकी व भारी जमीन) यांच्यामध्ये असते. त्यामुळे पिकांच्या सऱ्या व ठिबक नळ्या जवळ घ्याव्यात, तसेच ड्रिपर्स कमी अंतरावर लावावेत. तांत्रिक सल्याने ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्यास सर्व क्षेत्रामध्ये पिकाच्या गरजेनुसार पाणी दिले जाते. परिणामी ठिबक सिंचन प्रणालीची कार्यक्षमता सुधारते. 
  •  हलक्या जमिनीत चिकणमातीचे प्रमाण कमी असल्यामुळे जमिनीत पाणी आडवे पसरण्याचा वेग कमी होतो. तसेच अन्नद्रव्य देवाण-घेवाण करण्याची क्षमता (केशाकर्षण) कमी असते. त्यामुळे दोन सरीमधील व ड्रिपरमधील अंतर कमी ठेवले तसेच ड्रिपर डिसचार्ज कमी ठेवल्यास पाणी समप्रमाणात मिळते. 
  •  जस-जशी जमीन भारी होत जाते तस तसे जमिनीत चिकणमातीचे प्रमाण वाढते. त्यामुळे पाणी आडवे पसरण्याचा वेग वाढत जातो. अन्न द्रव्य देवाण-घेवाण करण्याची क्षमताही वाढत जाते. त्यामुळे दोन सरीतील व ड्रिपरमधील अंतर वाढवावे.
  •  हलक्या जमिनीत (जमिनीची खोली १ ते १.५ फूट) दोन सरीतील अंतर ४ ते ४.५ फूट, मध्यम जमिनीत (जमिनीची खोली १.५ ते ३ फूट) दोन सरीतील अंतर ५ फूट व भारी जमिनीत (जमिनीची खोली ३ फुटांपेक्षा जास्त) दोन सरीतील अंतर ६ फूट ठेवावे. 
  •  जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिपरमधील अंतर व ड्रिपर डिसचार्ज (लिटर / तास) बदलतो. हलक्या जमिनीसाठी दोन ड्रिपरमधील अंतर हे ३० सें.मी. व ड्रिपर डिसचार्ज ताशी २ ते २.४ लिटर पाणी, मध्यम जमिनीसाठी दोन ड्रिपरमधील अंतर ४० सें.मी. व ड्रिपर डिसचार्ज जमिनीच्या कमीअधिक खोलीनुसार २.४ ते ४ लिटर पाणी, तसेच भारी जमिनीसाठी दोन ड्रिपरमधील अंतर ५० सें.मी. व ताशी ४ लिटरचाच ड्रिपर वापरावा. 
  •  प्रतिदिन विजेचा पुरवठा (६ ते ८तास), उन्हाळ्यातील जास्त बाष्पीभवनामुळे वाढणारी पिकाची पाण्याची गरज व कमी होणारी भुजलपातळी विचारात घेता ऊस पिकासाठी ताशी २ लिटरपेक्षा कमी क्षमतेचा ड्रिपर अजिबात वापरू नये.
  •  एप्रिल-मे महिन्यांत ६ ते ८ महिने वयाच्या ऊसपिकाची पाण्याची गरज हवामानानुसार ३२ ते ३८ हजार लिटर प्रतिएकरी असते. कमी डिसचार्ज क्षमतेचा ड्रिपर वापरल्यास जास्त कालावधीपर्यंत ठिबक संच चालू ठेवावा लागतो. क्षेत्र जास्त असल्यास व पिकाच्या गरजेप्रमाणे पाणी न दिल्यास पिकामध्ये शरीरक्रियांसाठी योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी मुख्य कोंबातील ओलाव्याचे प्रमाण कमी होऊन (आवश्‍यक प्रमाण ८० ते ८२ टक्के) पिकाची वाढ खुंटण्यास सुरवात  होते. 
  • ठिबक नळीचा प्रकार व वापर  शेताच्या लांबी-रुंदी व उतारानुसार ठिबक नळीचा प्रकार व वापर ठरवावा. बऱ्याच शेतकऱ्यांना शेतामध्ये सबमेन (उपनळी) नको असते. सेक्शनची संख्या कमी हवी असते, त्यावेळेस १६ एमएमऐवजी २० एमएमची ठिबक नळी वापरावी. आपल्याकडील पंपाचा मिळणारा डिसचार्ज याचाही अभ्यास करून सेक्शन / व्हाॅल्व्हची संख्या निश्चित करावी. उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचाही विचार करावा.

    संपर्क- विजय माळी, ९४०३७७०६४९ (वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com