उसाला तुरा येण्याची कारणे

तुरा आलेल्या उसाची लवकर तोडणी करावी.
तुरा आलेल्या उसाची लवकर तोडणी करावी.

तुरा आलेला ऊस जर शेतामध्ये १.५ ते २ महिन्यांच्या पुढे राहिला तर पांगशा फुटतात, ऊस पोकळ पडण्यास सुरवात होते. त्यातील साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्‍टोज या विघटित साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे साखर उतारा कमी होतो. त्यामुळे तुरा आलेल्या उसाची लवकर तोडणी करावी. या वर्षी ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या काळात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे उसाच्या शेतात पाणी बरेच दिवस साठून राहिलेले होते. सततच्या पावसामुळे पिकास नत्राचे हप्ते वेळेवर देता आलेले नाहीत. जास्त पावसामुळे जमिनीतील बरेचसे नत्र पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेलेले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये उसामध्ये फुलकळी तयार होण्यास अनुकूल हवामान होते. त्यामुळे या वर्षी बहुतेक ऊस जातींना तुरा लवकर आणि जास्त प्रमाणात येणार आहे.  उसाला तुरा येण्यासाठी अनुकूल हवामान  

  • सर्वसाधारणपणे ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात उसाला तुरे येतात. दिवसाचे तापमान २६ अंश ते २८ अंश सेल्सिअस व रात्रीचे तापमान २२ अंश ते २३ अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के, साडेबारा तासांचा दिवस आणि साडेअकरा तासांची रात्र, प्रकाशाची तीव्रता १०,००० ते १२,००० फूट कॅन्डल्स अशी परिस्थिती किमान १० ते १२ दिवस सलग मिळाल्यास उसामध्ये फुलकळी तयार होऊन तुरा येण्यास कारणीभूत असते. 
  • अशा वेळी उसाच्या शेंड्यातील कायीकपणे वाढणाऱ्या अग्रकोंबाचे रुपांतर फुलकळीत होते आणि नंतर साधारण ७ ते १० आठवड्यांनी तुरा बाहेर पडतो. फुलकळी तयार होण्यासाठी उत्तर भारतात ऑगस्ट/ सप्टेंबर महिन्यात तर दक्षिण भारतात जुलै/ ऑगस्ट महिन्यात वातावरण असते. महाराष्ट्रात अशी परिस्थिती साधारणतः ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यानंतर ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या दरम्यान असते. 
  • तुरा आल्यानंतर उसाची वाढ पूर्णपणे थांबते आणि पक्वता वाढत जाते. तथापि तुरा आल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यात उसाची तोडणी झाली नाही, तर काही जातीमध्ये उसाला पांगशा फुटणे, दशी पडणे, वजन घटणे व साखर उतारा कमी होणे अशा प्रकारचे नुकसान होते. 
  • थंडीच्या कालावधीत अशा प्रकारचे नुकसान  कमी प्रमाणात होते. तथापि, वातावरणातील तापमान जसजसे वाढत जाईल तसे उसाचे वजन व साखर उतारा घटून नुकसान होते. उसाचे वजन व साखर उतारा टिकून रहाणे हे ऊस जातींच्या अनुवंशिक गुणधर्मावर अवलंबून असते. 
  • तुरा येण्यास कारणीभूत घटक  उसाची जात  

  • उसाच्या सर्व जातीमध्ये तुरा येण्याची क्षमता असते; परंतु जातीनुसार तुरा येण्याच्या प्रमाणात फरक आढळून येतो. काही जातींमध्ये लवकर तर काही जातींमध्ये तुरा उशिरा येतो. तुरा येण्याचे प्रमाण हे त्या जातीच्या अनुवंशिक गुणांवर अवलंबून असते. 
  • को-४१९, को-७२१९, कोसी ६७१ आणि को-९४०१२ या जातींना लवकर तुरा येतो.
  • को-७४०, कोएम- ७१२५, कोएम-८८१२१, को- ८०१४, को-८६०३२, कोएम-०२६५, एमएस- १०००१ आणि को-९२००५ या ऊस जातींना उशिरा तुरा येतो. 
  • भौगोलिक ठिकाण  तुरा येण्याचे प्रमाण निरनिराळ्या विभागांमध्ये वेगवेगळे असते. उदा.  केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र तसेच दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी उसाला तुरा लवकर आणि जास्त प्रमाणात येतो. जसजसे उत्तरेकडे जाऊ तसे उसाला उशिरा तुरा येतो. 

    प्रकाश कालावधी 

  • साडेबारा तासांचा दिवस आणि साडेअकरा तासांची रात्र, प्रकाशाची तीव्रता १०,००० ते १२,००० फूट कॅन्डल्स अशी परिस्थिती किमान १० ते १२ दिवस सलग मिळाल्यास उसामध्ये फुलकळी तयार होऊन तुरा येण्यास कारणीभूत असते.
  • राज्यात साधारणपणे असा कालावधी ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत असतो. या कालावधीमध्ये वाढ्यात वाढणाऱ्या कोंबामध्ये (मेरिस्टेमॅटिक टिश्‍यू) बदल होऊन त्या भागातील पेशींची वाढ थांबून प्रजननाच्या स्थितीमध्ये स्थित्यंतर होते. प्रकाशमान कालावधी हा जरी तुरा येण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असला तरी तो काही दरवर्षी मोठ्या प्रमाणात बदलत नाही. 
  • पाऊस आणि तापमान 

  • ज्या वर्षी पावसाचे प्रमाण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त असते, त्या वर्षी तुऱ्याचे प्रमाण अधिक असते, तसेच दिवसाचे व रात्रीचे तापमान यामधील फरक कमी असल्यास तुरा येण्यासाठी पोषक असते तसेच दिवसाचे व रात्रीचे तापमान यामधील फरक कमी असल्यास तुरा येण्यासाठी पोषक असते. 
  •  हवेतील आर्द्रतेचे प्रमाण व जमिनीतील पाण्याचे प्रमाण जास्त (पाणथळ) असेल तर तुऱ्याचे प्रमाण जास्त असते. दिवसाचे तापमान २६ अंश ते २८ सेल्सिअस व रात्रीचे तापमान २२ अंश ते २३ अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के हे तुरा येण्यासाठी पोषक असते. रात्रीचे तापमान १७ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर तुरा येण्याचे प्रमाण बरेच कमी होते. 
  • जमिनीचा प्रकार  ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवले जाते, पाण्याचा निचरा योग्य होत नाही, अशा पाणथळ जमिनीतील उसाला जास्त प्रमाणात तुरा येतो. भारी जमिनीत उशिरा तर हलक्‍या जमिनीत लवकर तुरा येतो. 

      जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये   पाणी साठून राहणाऱ्या जमिनीमध्ये नत्राची  उपलब्धता जरी असली तरी त्याचे शोषण पिकाच्या मुळाद्वारे योग्य प्रमाणात न झाल्यामुळे, तसेच जास्त पाऊस असणाऱ्या भागामध्ये उथळ आणि निचऱ्याच्या जमिनीमध्ये असलेला नत्राचा ऱ्हास झाल्यामुळे पिकाच्या शाखीय वाढीसाठी  आवश्‍यक असणारे नत्राचे प्रमाण कमी होते. अशा ठिकाणी उसाला जास्त प्रमाणात व लवकर तुरा येतो.  लागवडीचा हंगाम 

  • सुरू आणि पूर्वहंगामी हंगामात उसाची लागवड केली तर सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात उसाला तुरा येतो. तथापि मे/ जूनमध्ये लागवड केलेला ऊस ऑगस्ट/ सप्टेंबर या काळात कांड्या सुटण्याच्या अवस्थेत असतो. त्यास ३ ते ४ कांड्या आलेल्या असतात. अशा उसास तुरा येण्यासाठी अनुकूल हवामान मिळाले तर त्याला त्याच वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये तुरा येऊ शकतो. 
  • ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये उसाचे पीक जर उगवण किंवा फुटवा येण्याच्या अवस्थेमध्ये असेल तर त्या उसाला त्या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात तुरा येत नाही. 
  • तुऱ्यामुळे उसावर होणारा परिणाम

  • थंड हवामानात (डिसेंबर ते फेब्रुवारी) तुरा आल्यानंतर साधारणपणे १.५ ते २ महिन्यांपर्यंत उसाच्या उत्पादनात व साखर उताऱ्यात विशेष घट होत नाही. उलट तुरा आल्यामुळे त्या उसाची पक्वता लवकतर येते, त्यामुळे तो उस लवकर तोडणीसाठी घेता येतो, त्यासाठी साखर कारखान्यांनी हंगाम सुरू झाल्यानंतर प्रथम उसाची पक्वता पाहून त्याप्रमाणे त्याची तोडणी करावी.  उशिरा तुटल्या जाणाऱ्या खोडव्यामध्ये सुद्धा तुऱ्यामुळे नुकसान होते. 
  • तुरा येण्यास सुरवात झाल्यानंतर त्याची पाने अरुंद होऊन पिवळी पडण्यास सुरवात होते. पानांचे क्षेत्रफळ कमी होते, त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया मंदावते. पोंग्यामधील असणाऱ्या कोंबाची वाढ थांबून तुऱ्याची वाढ होऊ लागते आणि तुरा पोंग्यामधून बाहेर पडतो, तसतसे कांड्यांवरील डोळे फुटण्यास सुरवात होते, त्यास पांक्षा फुटल्या असे म्हणतात. 
  • तुरा आला की, उसाची शाखीय वाढ थांबून पक्वता येते. त्यामुळे रसाची शुद्धता वाढून साखर उतारा वाढतो, परंतु तुरा आलेला ऊस जर शेतामध्ये १.५ ते २ महिन्यांच्या पुढे राहिला तर पांगशा फुटतात, ऊस पोकळ पडण्यास सुरवात होते. त्यातील साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्‍टोज या विघटित साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे साखर उतारा कमी होतो. तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे रसाच्या उताऱ्यात जवळ जवळ १८ ते २० टक्केपर्यंत घट येते. ऊस उत्पादनात साधारण २० ते २५ टक्के व साखर उताऱ्यामध्येसुद्धा घट येते. 
  • तुऱ्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना 

  • लागवड शिफारस केलेल्या हंगामात आणि वेळेवर करावी. हंगामानुसार शिफारस केलेल्या जातींची लागवड करावी. 
  • लवकर पक्व होणाऱ्या कोसी-६७१, को-९४०१२, व्हीएसआय-४३४, को-८०१४, एमएस-१०००१ या ऊस जातींची तोडणी अगोदर करावी. 
  • शिफारस केलेल्या खतांची मात्रा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी द्यावी. 
  • पाणथळ जमिनीत पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी. नत्राची मात्रा विभागून द्यावी. 
  • जुलै/ ऑगस्टमध्ये उसाच्या शेतात पाणी साठून राहणार नाही यातची काळजी घ्यावी. 
  • संपर्क ः डॉ. अशोक पिसाळ , ९९२१२२८००७  

    (प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com