Agriculture stories in Marathi, agrowon on go-shala | Agrowon

गोविज्ञानातून संपन्न होतील गोशाळा
डॉ. नितीन मार्कंडेय 
शनिवार, 6 जानेवारी 2018

राज्यात आजपासून गायींच्या संवर्धनासाठी गोविज्ञान महायज्ञाचे आयोजन गुंज (जि. परभणी) येथे तर गोविकासासाठी पुण्यात परिषदेचा उपक्रम सुरू होत आहे. गाय विज्ञानयुगात सिद्ध करण्यासाठी गोपालकांची जबाबदारी वाढली असून, संशोधन आणि सत्याचे गोविज्ञान अवलंबणे गरजेचे आहे.

आजही राज्यात वैयक्तिक सांभाळातील गायींची संख्या आणि समूहातील गायींची गोशाळा संख्या मोठी आहे. वैयक्तिक गोपालनात चार गायी सांभाळल्या जात असल्या तरी गोशाळेत शेकडो गायी वर्षानुवर्ष उभ्या आहेत. गोपालन आणि त्यास गरजेचे पशुविज्ञान सहजासहजी समजावून घेण्याची मानसिकता वैयक्तिक स्वरूपात असली किंवा नसली तर त्याची परिणामता कमी संख्येच्या गायींशी निगडित राहते. मात्र गोशाळांनी गोविज्ञान वगळल्यास मोठ्या संख्येच्या गायी संवर्धन आणि विकासापासून दूर राहतात. म्हणून राज्यात गोविज्ञान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. गायींच्या शारीरिक गरजा, आरोग्याच्या गरजा, वाढीच्या गरजा आणि पैदाशीच्या गरजा विज्ञानात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. मात्र, परंपरेचा पगडा विज्ञान संस्कृती आणि तंत्रज्ञान अनुभूतींना दूर ठेवतो. जगात गोसंवर्धनाची दिशा नेहमी विज्ञान व्यावहारिक होती. मात्र संस्कृतीच्या नावाखाली देशात गाय परंपरेतच झाकली गेली. 

गोशाळेची बेवारस गायींचे पालनपोषण केंद्र किंवा गोसंरक्षक केंद्र अशी भूमिका अजिबात अपेक्षित नाही. परिसरातील लाख गायी सांभाळाव्या कशा? याचे प्रशिक्षण केंद्र म्हणून गोशाळा पुनरुज्जीवित झाल्या तर आजारी, बेवारस, अशक्त, वांध, विकलांग गायी गोशाळांसाठी सोडण्याचे प्रमाणच कमी होऊ शकेल. वैयक्तिक स्तरावर गाय सांभाळता येत नाही म्हणून गोशाळेस द्यायची ही मानसिकता गोशाळांनीच बंद करावी आणि त्यासाठी गाय सांभाळायची कशी? याचे प्रत्यक्ष दर्शन गोशाळेत घडवावे लागेल. एक गोवंशाची गोशाळा हीच भूमिका गोशाळांनी स्वीकारणे आज गरजेचे आहे. समाजाला गोशाळेची ओळख देवणी गोशाळा, खिलार गोशाळा, लाल कंधार गोशाळा किंवा गीर गोशाळा अशी झाल्यास कमीत कमी वेळेत शुद्धवंश म्हणजे नेमकं काय? हे कळू शकेल. एका गोशाळेतील सगळ्या गायी एकाच वंशाच्या, सारख्या बाह्य स्वरूपाच्या नव्हे अनुवंशाने समान गुणवत्तेच्या आणि सतत वाढत जाणाऱ्या उत्पादकतेच्या दिसून आल्यास गोवंश विकास समृद्ध होईल.

गोवंशाची अनभिज्ञता, मिश्र गोवंश, वंशरहीत गोधन म्हणजे गोपालकांची अधोगती. गोपैदाशीबाबत अज्ञान असणे अपेक्षित नसून आपली चूक गोसंवर्धानास अडचण ठरणार नाही. यासाठी शास्त्रीय शिफारशींची सखोल माहिती गाय सांभाळण्यापूर्वीच असणे अपेक्षित आहे. पशुवैद्यकीय सल्ल्याने मिश्रगोवंश असणाऱ्या गायी शुद्ध गोवंशाच्या बनविण्यासाठी निर्धारित पैदास शक्‍य असते. किमान पन्नास टक्के मिश्रवंशीय गायी शुद्ध वंशाकडे वळविण्याचा दीर्घकालीन कार्यक्रम केवळ गोशाळांनाच शक्‍य होतो. गोशाळेतून शुद्ध वंश निर्मितीची उद्दिष्टे साकारल्यास ‘आदर्श गोशाळा’ संकल्पना सार्थ ठरू शकेल.  गोशाळेतील गायी नेहमी निरोगी, सशक्त, सतर्क, आनंदी, स्वयंप्रेरीत विहारी, समाधानी आणि पर्यावरणासह मानवाशी मैत्री असणाऱ्याच असाव्यात, हा विचार उद्दिष्ट म्हणून गोशाळेत दर्शनी भागात लिखित असावा. ताणमुक्त गाय, भरपूर व्यायाम करू शकणारी गाय, पोटभर चारा मिळणारी गाय, पाणी पिण्याने तृप्त गाय, परस्पर गायींचे सानिध्य सहज सहन करणारी गाय सांभाळण्यासाठी गोशाळांना भरपूर जागा, हवेशीर गोठे, वर्गवारीचे कप्पे, नियंत्रण रचना आणि संरक्षक यंत्रणा पुरविणे गरजेचे असते. सुधारीत गोव्यवस्थापन अल्पखर्चिक अल्पश्रमिक सुलभ असल्याने गोविज्ञानातून आत्मसात करणे महत्त्वाचे ठरते.

देशात नावाजल्या जाणाऱ्या गायी उपलब्ध असतील तरच गोशाळा शोभून दिसते. गोशाळेतील किमान २५ टक्के शुद्ध वंशाच्या गायी उत्पादन आणि प्रजनन क्षमतेसाठी नामांकित ठरल्यास गोशाळा आदर्श बनते. उच्चांकी दूध उत्पादन, सर्वोच्च दूध प्रत, सर्वाधिक वासरे निर्मिती, नियमीत प्रजनन, शून्य वंध्यत्व अशा निकषात प्रशंसनीय असणाऱ्या गायींमुळे गोशाळा सुरू ठेवण्याचा संकल्प दृढ होतो. संपूर्ण गोशाळेच्या खर्चाची स्वतःच्या भरीव उत्पन्नातून परिपूर्ती करणाऱ्या अशा गायींमुळे गोशाळा आर्थिकदृष्ट्या स्वयंनिर्भर ठरू शकतात. गोशाळा समाजाभिमुख असाव्यात. म्हणजे गोप्रेमींना गोशाळेची भेट ओढ लागणारी असावी. गोपर्यटन केंद्र, गो प्रशिक्षण केंद्र, गोविज्ञान केंद्र या बाबी नावाने नको तर कार्याने साकार झालेल्या दिसून याव्यात. गोशाळांच्या मालकी जमिनीवर चारा उत्पादनाचे प्रदर्शन प्रक्षेत्र निर्माण करता येते. समूह चारा उत्पादनाचा उपक्रम गोपालकांसह अवलंबल्यास गोशाळा परिसरातील एकही गाय सकस चाऱ्यापासून दूर असणार नाही. दररोज किमान तीन प्रकारचा चारा मिळण्यासाठी आणि उसाच्या वाढ्यातून सुटका मिळण्यासाठी गोशाळांकडून चारा उत्पादन झाल्यास राज्यातील गोपालनास नवसंजीवनी लाभेल. नवीन चाऱ्याच्या पौष्टिक जाती, साठवणूक, वापर, प्रक्रिया या बाबी गोविज्ञानात समजावून घ्याव्या लागतील. 

गोशाळा वितरणासाठी खात्रीच्या संस्था बनू शकतील. गोशाळांना विक्री करता येतील, माफक दरात पुरवता येतील अशा बाबींची सूची पाचशे ठरू शकते. गोधन, गोऱ्हे, खत, दुधजन्य पदार्थ, गोमय-गोमूत्र उत्पादने, गो साहित्य, गो प्रकाशने अशी यादी वाढविता आल्यास गोशाळा नव्हे गाय समृद्ध होऊ शकेल. वैयक्तिक वितरणातील भेसळ आणि दुय्यम प्रत यामुळे वैतागलेला गोप्रेमी ग्राहक गोशाळेच्या विश्‍वासाने समाधानी होईल. देशी गाय या नावाने गोशाळेच्या विश्‍वासाने समाधानी होईल. देशी गाय या नावाने सुरू असलेला बाजार आणि त्यातील चोर कमी करण्यासाठी आदर्श गोशाळांची मोठी गरज आहे.

गोशाळेचे संचालक मंडळ कसे असावे याचा विचार करण्यापेक्षा गोशाळांसाठी विज्ञान शिफारस मंडळ असणे अधिक वैचारिक ठरते. पशुविज्ञानातील उपयुक्त तंत्रज्ञानाचे कोरडे कौतुक करण्यापेक्षा गोशाळेत असे तंत्रज्ञान वापरून सिद्धता पटवण्याचे कार्य गरजेचे आहे. गोशाळा आणि पशुवैद्यक यातील अंतर संपणे आणि शासनाची योजनानिहाय मदत सतत प्रस्थापित होणे अनिवार्य आहे. महिला सबलीकरणासाठी गोशाळांचा पुढाकार गोउत्पादने निर्मिती व वापरात प्रचंड वाढ घडवून आणू शकेल. स्त्रीशक्ती आणि गोशाळा यांचे वरदान लाभणारा समाज निर्माण करण्यासाठी गोविज्ञानाची जोड अपेक्षित असून त्यासाठी सतत प्रयत्नांची गरज आहे. 

वैयक्तिक सांभाळापेक्षा सरस ठरणाऱ्या गोशाळा निर्माण करणे, गोवंश संवर्धन सहेतूक आणि उच्च दर्जाच्या व्यवस्थापन पद्धतीचे प्रशिक्षण केंद्र ठरणे, गोसांभाळ उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर घडणे आणि भारतीय गोवंशाचा बोलबाला जगाला पटविणे अशा साध्यतेची गोशाळा सर्वांना अपेक्षित आहे. आदर्श गोशाळा गोविज्ञानातूनच सार्थ ठरू शकते, आणि त्यातच गाय आणि गोशाळा सुसंपन्न होते याची जाणीव करून देण्यासाठी गोपरिषदा आणि तांत्रिक महायज्ञाचे आयोजन यथार्थ ठरते. 
डॉ. नितीन मार्कंडेय : ८२३७६८२१४१
(लेखक परभणी येथील पशुवैद्यक महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
वर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
भारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...