गोव्याचा 'बिग' ब्रँड येणार

गोवा राज्याचे कृषी, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई
गोवा राज्याचे कृषी, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई

गोवा हे पर्यटनामध्ये आघाडीचे राज्य. येथील शेतीला पर्यटन उद्योगाची जोड देत शेती आणि ग्रामीण विकासाची नव्या दृष्टिकोनातून आखणी करण्याचे काम गोवा राज्याचे कृषी, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी हाती घेतले आहे. गोव्यातील शेती आणि पूरक उद्योगाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट काय आहे, याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद.

गोवा राज्यातील शेती, पूरक उद्योगाचे सध्याचे चित्र काय आहे?

श्री. सरदेसाई :  मी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा पदवीधर. त्यामुळे गोवा राज्यातील शेतकऱ्यांची गरज, शेती आणि पूरक उद्योगाच्या विकासासाठी नेमके कोणते  धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत, याची मला जाणीव आहे. कृषिमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने राज्याचा कृषी विकासाचा नव्याने आराखडा तयार केला. त्यामध्ये नव्या जाती, सुधारित तंत्राचा वापर, यांत्रिकीकरण, फूलशेती, सेंद्रिय शेती, ग्रामपातळीवर प्रक्रिया उद्योग आणि कृषी पर्यटनावर भर दिला आहे.  पर्यटन हा गोवा राज्याचा मुख्य व्यवसाय. वर्षभर जगभरातील पर्यटक येथे येतात. गोव्यात सुमारे १६ टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. भात शेती, भाजीपाला, काजू, नारळ, सुपारी आणि मसाला पिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे. या शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान जलद गतीने पोहोचविण्यावर आमचा भर आहे. पडीक जमिनी व्यावसायिकदृष्या लागवडीखाली आणण्याचे नियोजन आहे. ग्रामीण युवक आणि युवतींना शेती, यंत्र-अवजारे आणि प्रक्रिया उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.  खरीप हा मुख्य हंगाम. पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बी आणि उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड असते. भात हेच मुख्य पीक. पारंपरिक पद्धतीने भाताच्या जया, ज्योती या जातींची लागवड जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे उत्पादनवाढीला मर्यादा पडते. यंदाच्या वर्षीपासून मी भात शेतीमध्ये नवीन जातींचा वापर, नवीन व्यवस्थापन तंत्र आणि यांत्रिकीकरण यावर लक्ष केंद्रित केलं. जमीन मशागत, चिखलणी, रोप लागवड, आंतरमशागत आणि मळणीपर्यंत यंत्रांचा वापर कसा वाढविता येईल यावर भर आहे. प्रायोगिक तत्त्वावर यंत्राच्या माध्यमातून दोन हजार एकर क्षेत्रावर भात रोपांची लागवड करण्याचं नियोजन केलं. प्रत्येक शेतकऱ्याला नवीन यंत्र विकत घेणं शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही विभागनिहाय पॉवर टिलर, भात रोप लागवडीचे यंत्र आणि मळणी यंत्र पुरवणारे स्थानिक व्यावसायिक तयार केले. त्यांना आम्ही यंत्रं, अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले. शेतकऱ्यांना यंत्रं, अवजारं वेळेवर मिळू लागली. मजुरांच्या समस्येवर यातून मात करता येईल. उत्पादन वाढीला मदत होईल. जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली येईल. सुधारित बियाणे, खतांसाठीही विशेष अनुदान शेतकऱ्यांना दिलं आहे. नवीन जाती, आधुनिक व्यवस्थापन तंत्र आणि प्रक्रिया उद्योगातून भात शेती किफायतशीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

नवीन पिके आणि तंत्रज्ञान प्रसारासाठी काय प्रयत्न आहेत? 

श्री. सरदेसाई :  गोव्याचे हवामान आणि वर्षभर पर्यटकांचा राबता लक्षात घेता आम्ही फूलशेतीला चालना दिली. फूलशेतीचं आधुनिक प्रशिक्षण देणारं केंद्र लवकरच सुरू करत आहोत. त्याचा युवा शेतकऱ्यांना फायदा होईल. गोवा जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे आॅर्किडच्या विविध प्रजाती आहेत. गोव्यामध्ये ‘सीतेची फाती` ही आॅर्किडची जंगली जात आढळते. यावर विशेष संशोधन करण्यासाठी चालना दिलीय. येत्या काळात स्थानिक प्रजाती ‘गोवा आॅर्किड` म्हणून ओळखल्या जातील. संशोधन, तंत्रज्ञानासाठी नेदरलॅंडमधील एका कंपनीशी सहकार्य करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या माध्यामातून गोव्यातील हवामानात रूजू शकतील आणि ज्या जातींना जगभरात मागणी आहे अशा ३२ आॅर्किडच्या जाती गोव्यातील फूलशेतीमध्ये येतील. शेतीमध्ये सुधारित तंत्र रुजण्यासाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स`ची उभारणी करतोय. यासाठी इस्त्रायलमधील कृषी कंपन्यांशी माझी प्राथमिक चर्चा झाली आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेती याचे प्रशिक्षण तिथे मिळेल. तसेच आम्ही प्रत्येक तालुक्यात आदर्श गाव योजनेची आखणी केली आहे. या माध्यमातून एकात्मिक शेतीसाठी पशुपालन, कुक्कुटपालन, प्रक्रिया उद्योग आणि मत्स्यशेतीलाही चालना दिली. ग्रामीण युवकांना आम्ही सुधारित शेतीकडे वळवतोय.

‘ब्रॅंड गोवा` ही संकल्पना नेमकी काय आहे?

श्री. सरदेसाई :  गोव्याची भौगोलिक स्थिती पाहाता केवळ शेतीवर अवलंबून राहून शेतकरी आणि गावांची आर्थिक स्थिती बदलणार नाही. गोव्याचे पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक स्थान लक्षात घेता शेतीला पर्यटनाची जोड दिली आहे. ग्राम पर्यटनाही आकार घेत आहे. यातून शेतमाल, स्थानिक प्रक्रिया उत्पादनांना चालना मिळत आहे. त्यादृष्टीने कृषी आणि पणन विभागाने नियोजन आहे. याचा थेट फायदा शेतकरी आणि स्थानिक प्रक्रियादारांना होईल.  भातानंतर भाजीपाला हे महत्त्वाचे पीक. राज्यात भाजीपाला पुरवठ्यात आम्ही कमी पडतोय. त्यामुळे भाजीपाला लागवडीमध्येही सुधारित तंत्राच्या प्रसाराला मी प्राधान्य दिले आहे.  ‘ब्रॅंड गोवा`च्या माध्यमातूच भाजीपाला उत्पादन आणि विक्रीत वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतमाल आणि प्रक्रिया उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘बॉर्न इन गोवा` अर्थात BIG हा येत्या काळात आमचा ब्रॅंड असेल. पर्यटकांकडून सेंद्रिय भाजीपाला, शेतमालाची मागणी वाढत आहे. काळाची गरज आणि नवीन बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे. ही शेती पर्यावरणपूरक आणि पर्यटनपूरक असणार आहे. जागतिक बाजारपेठ मिळविण्यासाठी आम्ही अमेरिकेतील सेंद्रिय उत्पादनात कार्यरत असलेल्या कंपनी बरोबरीने चर्चा करीत आहोत. परदेशी पर्यटक हेच आमच्या शेतमालाचे प्रचारक असतील. पर्यटकांसाठी ‘टेक अवे फ्रॉम गोवा` ही संकल्पना आम्ही राबवित आहोत.

शेती विकासासाठी कोणते वेगळे प्रयत्न आपण करीत आहात?

श्री. सरदेसाई :  गोव्यातील शेती तुकड्यांमध्ये विभागलेली आहे. शेतकऱ्यांचे जमीन धारणा क्षेत्र कमी आहे. त्यामुळे तो शेतीमध्ये आर्थिक गुंतवणुकीस फारसा तयार नाही. यावर उपाय म्हणून आम्ही विविध गावांमध्ये सामूहिक शेती, गटशेतीला चालना दिली. यातून पडीक जमिनीदेखील लागवडीखाली येतील. सामूहिक शेती, गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही बियाणे, खतं, अवजारे, सोलर पंप, शेती कुंपणासाठी अनुदानाची योजना तयार केली. लागवड तंत्राबाबतही प्रशिक्षण दिले जात आहे. शेतकरी उत्पादक कंपनीलाही चालना दिली आहे. परदेशातील गोवेकर वडिलोपार्जित शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी उत्सूक आहेत. करार शेतीच्या दृष्टीने सुटसुटीत कायदे करतोय. डोंगर उतारावर वनशेतीच्या बरोबरीने काजू लागवडीलाही प्राधान्य दिले आहे. काजू फेणी, कोकोनट फेणीला पर्यटनामुळे मागणी वाढली आहे.   राज्यातील महामार्गाच्या कडेने असलेल्या गावात शेतमाल विक्रीसाठी ‘फार्मर्स मार्केट`ची उभारणी होत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर भाजीपाला, शेतमालाची उपलब्धता होईल. पर्यटकांनाही प्रक्रियायुक्त पदार्थ खरेदी करता येईल. भाजीपाला उत्पादक गटांना कोल्ड व्हॅन तसेच लहान क्षमतेची शीतगृहे उभारून देत आहोत. त्यामुळे नाशवंत शेतमालाची साठवणूक चांगल्या प्रकारे होईल. विविध शहरात भाजीपाला विक्रीसाठी विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. शेतकऱ्यांच्या बरोबरीने  पशूपालक तसेच मच्छीमारांसाठीही विविध योजना आम्ही राबवित आहोत. नुकताच आम्ही नारळाला ‘स्टेट ट्री` असा दर्जा दिला आहे. त्यामुळे नारळ लागवड आणि प्रक्रिया उद्योगालाही बऱ्यापैकी चालना मिळणार आहे. वर्षभर गोवा हिरवागार राहिला पाहिजे, हेच माझे ध्येय आहे.    ग्रामीण भागातील महिला शेतकरी गटांसाठी काही उपक्रम राबविले जात आहेत का?

श्री. सरदेसाई :  शेती आणि प्रक्रिया उद्योगात महिलांना चांगली संधी आहे. माझ्या फातोर्डा मतदार संघातील शंभराहून अधिक महिला बचत गटांचे मी फेडरेशन तयार केले. हे गट सोळा प्रकारचे मसाले तयार करतात. या मसाल्यांची विक्री ‘वुमेन आॅफ फातोर्डा` या बॅंडनेमने केली जाते.  मसाल्यांना खास गोवन स्वाद असल्यामुळे वाढती मागणी आहे. हेच मॉडेल इतर प्रक्रिया उत्पादनांसाठी राज्यभरात राबविणार आहे. फणस, काजू, भात, नारळ, केळी, भाजीपाला, मसाला पिके आणि मत्स्यप्रक्रियेमध्ये महिला गटांना चांगल्या संधी आहेत. आम्ही बचत गटांना देश-विदेशातील मार्केट उपलब्ध करून देत आहोत.

माहिती आणि जैव तंत्रज्ञानाची शेती विकासाला कशी गती मिळेल?

श्री. सरदेसाई :  शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. आम्ही पीक व्यवस्थापन ते शेतमाल विक्रीसाठी ‘ॲग्रो क्लाऊड` ही संकल्पना राबवत आहे. ही आॅनलाइन प्रणाली आहे. यामध्ये उत्पादक आणि ग्राहकांच्यामध्ये थेट व्यवहार होतील. मोबाईल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना शेतीसंदर्भात सर्व माहिती उपलब्ध होत आहे. हवामान बदलाचा फटका गोव्यातील शेतीलाही बसला आहे. त्यामुळे हवामान बदलातही टिकून रहाणाऱ्या विविध पिकांच्या पारंपरिक जातींच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. गोव्यातील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे केंद्र, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, राज्याचा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्या समन्वयातून विभागनिहाय प्रकल्प आराखडा तयार केला आहे. तसेच गोवा विद्यापीठात जैवतंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून पिकांच्या देशी जातींतील जैवविविधतेचे संवर्धन, नव्या जातींच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. जैवविविधता जपत जेथे गरज आहे तेथे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागणार आहे. त्यासाठी मी आग्रही आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com