Agriculture Stories in Marathi, Agrowon, Nagesh Tekale article on Environment | Agrowon

संथ वाहावी ‘कृष्णामाई’
डॉ. नागेश टेकाळे
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

आपल्या भागामधील सर्व लहान मोठ्या नद्यांना एका मोठ्या पावसामध्येच महापूर येणे हे पर्यावरणावरचे संकट आहे. आता पाणी शेत-शिवार, नदीकाठी-पात्रात न मुरता सरळ वाहून जात आहे. त्यामुळे थोड्या पावसानंतर लगेच नदीला पूर येत आहे. जे पाणी धरणात जाते तेही भरपूर गाळ घेऊन जात आहे.

मराठवाड्यामधील बीड जिल्ह्यातील गणेशी नदीकाठी वसलेले खडकीघाट हे माझे आजोळ. माझ्या जन्मापासून या नदीशी माझा संबंध आला आहे. आई म्हणत असे, नदीवरून आणलेली पाण्याची घागर घरात ठेवली आणि तुझा जन्म झाला, त्या दिवसापासून नदी माझी दुसरी आई झाली. आजोबांच्या बरोबर पहाटेच मी नदीवर जात असे. पूजेसाठी स्वच्छ पाणी आणि पात्राच्या कडेस असलेली कन्हेरीची मुबलक फुले हा माझा प्रत्येक सुटीमधील उपक्रम. दहावी पास होईपर्यंत या नदीने मला खूप माया लावली.

हिवाळा आणि उन्हाळ्यामधील संथ स्वच्छ वाहते पाणी, किनाऱ्याच्या दोन्हीही बाजूस नदीपात्रापेक्षाही मोठा रुपेरी वाळूचा किनारा, त्यास लागून घनदाट वृक्षराजी. त्यात वड, पिंपळ, उंबर, आंबे अशी झाडं होती. पसाभर वाळू बाजूला केली, की खाली स्वच्छ पाण्याचा झरा मिळत असे. लहान वाटीने पाण्याची घागर भरून देताना नदीने मला प्रत्येक थेंबाचे महत्त्व शिकविले. पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात रुपेरी वाळूवर रेघोट्या ओढत रम्य बालपण कधी संपले कळालेच नाही. उच्च शिक्षणाच्या शिड्या चढत असताना प्रत्येक पायरीवर मी तिची सोबत ठेवली होती. कार्य प्रवाहात मला पुन्हा आजोळी जाता आले नाही, पण जेव्हा गेलो तेव्हा तो नदीचा भाग उजाड झाला होता. विलायती बाभळीचे तेथे मोठे वनच तयार झाले होते.

वड, पिंपळ, उंबर, आंबे ही झाडं कुठेच दिसत नव्हती. वाळूचा कणही नव्हता. डोळ्यात अश्रू जमा झाले होते. कुठे असेल माझी आई? कुणीतरी उत्तरले, येथे मोठे धरण होत आहे, गाव धरणाखाली गेले आहे. एका सुंदर नदीचे अस्तित्व इतक्‍या सहजासहजी पुसू शकते यावर विश्वास बसत नव्हता. हजारो वर्षांचा, नदीकाठच्या संस्कृतीचा, शेतीचा, वाळूचा, वृक्ष श्रीमंतीचा भूतकाळ तयार झाला. समोरचा भूगोल हे प्रखर वास्तव होते. महाराष्ट्रातील शेकडो नद्यांच्या नशिबी या अशाच भूगोलांचे सत्य लिहलेले आहे. शेतकरी आणि त्याची शेती उद्‌ध्वस्त होण्याच्या मागे त्यांच्या भागामधील नद्यांचे मिटलेले अस्तित्व हेही एक कारण आहे. 

प्रत्येक नदीचे आयुष्य तिच्या पात्रामध्ये असलेली वाळू आणि दोन्हीही किनाऱ्यावर असलेली वृक्षांची प्रभावळ ठरवत असते. मला आठवते, मृगाचा पाऊस वेळेवर पडत असे, त्यानंतरची नक्षत्रे सुद्धा कधीही कोरडी जात नसत. श्रावणात तर कायम रिमझिम चालू राहत होती मात्र नदीला पूर जेमतेम दोन तीन वेळाच येत असे. आजोबा म्हणत, उन्हाळ्यात नदी वहात असली तरी तिचा परिसर तहानलेला असतो आणि तो पावसाची आतुरतेने वाट पहात राहतो. सुरवातीचा पाऊस नदीच्या पात्रात, वाळूच्या किनाऱ्यात पूर्ण मुरून जातो. जेव्हा साठवण क्षमता संपते आणि वर पुन्हा पावसाची रिपरिप चालू होते तेव्हाच नदीला पूर येतो. किनाऱ्यावरील वाळू आणि दोन्ही बाजूचे वृक्ष या पुराला नेहमीच शांत करत असतात. पावसाळा संपला वाळूमध्ये खोल मुरलेले पावसाचे पाणी हळूहळू पृष्ठभागावर येऊ लागते आणि हेच स्वच्छ सुंदर जल पुन्हा वाहू लागते. यालाच आपण प्रवाह म्हणतो. नदीचा हा वाहता प्रवाह पहिल्या पावसापर्यंत असाच सुरू राहतो.

नदीकाठची झाडी तोडणे, पात्रातील वाळू काढणे म्हणजे नदीच्या मृत्युची घंटाच होय. आज आपल्या परिसरामधील अनेक नद्यांच्या काठावर कुठेही वृक्ष दिसत नाहीत, दिसते ती रासायनिक शेती जी थोड्या पावसातही मातीसह नदीच्या पुरात मिसळते. नदीत दिसतो फक्त माती आणि गाळ, वाळूचा कणही दिसत नाही. अशी नदी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात कशी वाहणार? राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या काही भागात दीड-दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर वरुण राजाचे पुनःच्छ आगमन झाले. ५० ते १५० मिलिमीटर पाऊस दोन दिवसांत पडला आणि परिसरामधील सर्व नद्यांना पूर आले आणि हे सर्व पाणी या पुरामधून वाहून गेले. पाठीमागे उरला तो प्रचंड गाळ. नदीकाठास वृक्षराजी असती आणि नदीची स्वनिर्मित वाळू तिच्याकडे असती तर एवढा पूर आलाच नसता.

निसर्गानेच पाण्याचे व्यवस्थापन केले असते. पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरविण्यात वृक्षांचा मोठा सहभाग असतो. सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर पाणी पित असते, शेतांना असणारे जैविक बांध यासाठी मदत करत असतात. वृक्षांच्या शीतल सावलीमुळे धूप कमी होते, जमिनीमध्ये पाणी टिकून राहते. आपल्या भागामधील सर्व लहान मोठ्या नद्यांना एका मोठ्या पावसामध्येच महापूर येणे हे पर्यावरणावरचे संकट आहे. कारण हे सर्व पाणी वाया गेले, जे धरणामध्ये गेले तेही जाताना भरपूर शेतजमीन (गाळ) घेऊन गेले. अशी भरलेली धरणे नेहमी भासमान असतात आणि त्यांचे आयुष्य इंचाने कमी होत असते. पावसाच्या प्रत्येक थेंबाचा अमृतासारखा उपयोग करावयाचा असेल तर सर्वप्रथम नद्यांना गाळमुक्त करून वाळूनिर्मितीस प्रोत्साहन द्यावयास हवे, वाळू उपसा ताबडतोब बंद करून नदी किनाऱ्यावर दाट वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.

रासायनिक शेती पावसासाठी जास्त संवेदनशील आहे. थोड्या जोरदार पावसात ती सहज वाहून जाते, त्यामुळे उतार तयार होतात. यातून ओढ्यांची निर्मिती होते आणि हेच ओढे नाले कोणे एक काळच्या कोरड्या नदीस मिळून पूरदर्शक परिस्थिती तयार होते. नदी किनारी रासायनिक शेती टाळावयास हवी. नदीला पावसाळ्यात पूर जरूर यावा, पण त्यासाठी तिला काठावरच्या वृक्षांची आणि पात्रामधील वाळूची साथ हवी. अशी पूर आलेली नदी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात स्वच्छ पाण्याने वहात असते आणि परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन करते. लहान मोठ्या नद्यांना येणारे पूर आपण समजून घ्यावयास हवेत. फक्त पावसाळ्यातच वाहणारी नदी जिवंत कशी असणार!

आपल्या गाव परिसरातीमधील नदीला या मोसमात आलेला पूर आपण कौतुकाने पाहिला पण जेव्हा हीच नदी आपण उन्हाळ्यात पाहतो तेव्हा तिच्यामध्ये गावातील अस्वच्छ नाल्यांचे पाणी आलेले असते आणि तेही डबक्‍यांच्या स्वरुपात त्याचसोबत केरकचरा, मलमूत्र, प्लॅस्टिकचे ढिगारे वेगळेच. 

 ‘संथ वाहते कृष्णामाई’ असे म्हटले जाते. परंतु नद्यांची आजही अवस्था पाहता ‘संथ वाहावी कृष्णामाई’ असे म्हणावे वाटते. गावा-गावांमधून अशा मोठ्या बहिणीकडे (नद्यांकडे) ओढ घेणाऱ्या शेकडो लहान बहिणींची अवस्था आज शोचनिय आहे. म्हणूनच त्यांना एका पावसात आलेले पूर आपणास खूप काही शिकवून जातात. त्याचबरोबर अपवाद वगळता जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि जलसिंचन या विषयामधील नापासाची गुणपत्रिकाही हातात पडते तेव्हा मन दुःखी होते.

; डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१
(लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

इतर संपादकीय
नवसंशोधनातून हवामान बदलावर करा मातहवामान बदलासाठी मानवाचा नैसर्गिक संतुलनात अवाजवी...
दूध का नासले?राज्यात दुधाच्या दराच्या मुद्यावरून सहकारी दूध...
शेतीत फुलताहेत उद्यमशीलतेची बेटं गेल्या वर्षी ''महाएफपीसी'' आणि शेतकरी कंपन्यांनी...
सुस्त प्रशासन, स्वस्थ शासनराज्यात बीटी कापूस व सोयाबीन पिकांवर कीटकनाशकांची...
होय, आम्हीच खरे लाभार्थी!राज्यभर झालेल्या मृद संधारणाच्या अनेक कामांवर...
शेतीमाल हमीभाव : एक सापळासरकारने शेतकऱ्यांपुढे लटकवलेले हमीभावाचे एक गाजरच...
कापूस संशोधनाची पुढील दिशाकेंद्र शासनातर्फे बीटी जनुकांचे बौद्धिक संपदा...
कापूस कोंडी फोडाकापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप झाल्यामुळे कापूस...
पांढरं सोनं का काळवंडलं?यवतमाळ जिल्ह्यामध्ये कपाशीवरील अनियंत्रित...
सुलभ व्यापार वाढवेल निर्यातदेशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन न देता आपली गरज...
पशुखाद्यातील प्रतिजैविकांच्या वापरामुळे...उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये १९५० पासून...
अन्नसुरक्षेच्या लढ्याची अर्जेंटिनात...जागतिक व्यापार संघटनेची (डब्ल्यूटीओ) अकरावी...
‘ओखी’चा विळखानैसर्गिक आपत्ती या वर्षी शेतकऱ्यांची पाठ सोडायला...
ऊसदराचा उफराटा न्यायकोल्हापूरची तडजोड  उसाला टनामागे पहिली उचल...
दिशा बदलत्या कृषी शिक्षणाचीबदलते हवामान, खुली अर्थव्यवस्था, आयात-...
सजीव माती तर समृद्ध शेतीपृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब...
केवढा हा आटापिटा!कडधान्ये, खाद्यतेल यांच्या आयात-निर्यातीबाबत...
नकाशा दाखवेल योग्य दिशाजागतिक तापमानवाढीमुळे बदललेल्या हवामानाच्या...
कसे असावे आयात-निर्यात धोरण?देशातील तेलबिया व कडधान्य पिकांचे बाजारभाव किमान...
अलिबाबाच्या गुहेत दडलंय काय?पी कवाढीसाठीच्या अत्यंत मूलभूत घटकांमध्ये माती...