sericulture
sericulture

तीन महिन्यांत ६६२ एकरांवर तुती लागवड

पुणे ः पुणे विभागात १६५० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी एक हजार ९९६ एकरांसाठी दोन हजार ८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे आत्तापर्यंत ६६९ शेतकऱ्यांनी ६६२ एकरांवर तुती लागवड केली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत लागवडीत आणखी वाढ होईल, अशी माहिती पुणे प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.  पुणे विभागात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, तर कोकणातील ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. पूर्वीदेखील हे जिल्हे रेशीमसाठी तुतीचे हब म्हणून ओळखले जात होती. परंतु, गेल्या चार ते पाच वर्षांपासून पाणीटंचाई असल्याने येथे तुती लागवडीच्या क्षेत्रात घट झाली. यंदा ३१ मार्चअखेर विभागातील दहा जिल्ह्यांतील १५०९ शेतकऱ्यांनी अवघ्या १७०३ एकरांवर लागवड केली होती. त्यामुळे यंदा प्रादेशिक रेशीम कार्यालयाने पुणे विभागात तुती लागवडीवर भर देण्याचे ठरविले. त्यासाठी नोंदणीची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे.  यंदा रेशीम कार्यालयाकडून शेतकऱ्यांना लागवडीसाठी ५७९ टन तुती बेणे देण्याचे, तसेच २९ लाख ७५ हजार २५० रोपवाटिकेतील रोपे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळविण्याच्या उद्देशाने मनरेगा योजनेतून तुती लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. याशिवाय तुती लागवडीकरिता बेणे पुरवठा, अंडीपुंज पुरवठा, शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरे आदी घटकांसाठी अनुदान देण्यात येते.  यंदा लागवड नोंदणीसाठी दोन हजार ८ शेतकऱ्यांनी दहा लाख १८ हजार ६२५ रुपये भरले आहेत. सध्या विभागात लागवडी सुरू असून, एक हजार ३३९ शेतकऱ्यांनी एक हजार ३३४ एकरांवर लागवड करणे बाकी आहे. लागवड करत असलेल्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवड व जोपासना, साहित्य खरेदी, बेणे, औषधे अशा विविध बाबींसाठी तीन वर्षांसाठी दोन लाख २१ हजार ७४२ रुपयांचे अनुदान दिले जाते.  

यामध्ये पहिल्या वर्षासाठी ९८ हजार ९७२, दुसऱ्या वर्षी ६५ हजार ८८५, तिसऱ्या वर्षी ५६ हजार ८८५ रुपयांचे अनुदान वितरित होते. कीटक संगोपनगृह मजुरी, कीटक संगोपनगृह यासाठीही अनुदान देण्यात येते. त्यामुळे पुणे विभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुती लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com