रोजगाराच्या संधी वाढवणारी चौथी औद्योगिक क्रांती

चौथी औद्योगिक क्रांती उद्योग जगतात उलथापालथ करणारी ठरून बेरोजगारीचे प्रमाण वाढवेल, अशी भीती दावोस येथील जागतिक मंचावर व्यक्त करण्यात आली. परंतु, माझी अशी धारणा आहे की विकसनशील देशांसाठी चौथी औद्योगिक क्रांती रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणारी ठरेल.
sampadkiya
sampadkiya

फेब्रुवारी महिन्यात संपन्न झालेल्या या वर्षीच्या दावोस येथील जागतिक आर्थिक मंचावर चौथी औद्योगिक क्रांती हा चर्चेचा विषय होता. काही प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरवात आधीच झालेली आहे, त्यामुळे चौथी औद्योगिक क्रांती उद्योग जगतात उलथापालथ करणारी ठरून बेरोजगारीचे प्रमाण वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दावोस येथील संमेलनात याबद्दल चर्चा करून ही भीती कमी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. माझी अशी धारणा आहे, की विकसनशील देशांसाठी चौथी औद्योगिक क्रांती खरे तर रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देऊन फायद्याचीच ठरणार आहे. काय आहे ही चौथी औद्योगिक क्रांती? निरनिराळ्या औद्योगिक क्रांत्या ह्या आपल्या समाजाचे वैशिष्ट्य ठरल्या आहेत. पहिली औद्योगिक क्रांती १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाली. या क्रांतीमध्ये स्नायूबलाची जागा मुख्यतः कोळशापासून निर्मित वाफेने घेतली. दुसरी औद्योगिक क्रांती २० व्या शतकाच्या पूर्वार्धात सुरू झाली आणि ती विद्युतचलित होती. मोठमोठी यंत्रे आणि संघातसरणी (असेंब्ली लाईन) वस्तुनिर्माण ही तिची वैशिष्ट्ये होती. १९६० च्या पूर्वार्धात सुरू झालेली तिसरी औद्योगिक क्रांती संगणके, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्वयंचलित उत्पादनांवर आधारित होती. 

सध्याच्या चौथ्या औद्योगिक क्रांतीची वैशिष्ट्ये म्हणजे रोजच्या वापरातील गोष्टींचे महाजाल (इंटरनेट ऑफ थिंग्ज - आयओटी), दिवसाचे २४ तास संधानता (कनेक्टीव्हिटी), जलदगती संदेशवहन, रचनेचे लघुकरण आणि त्रिमिती (थ्री-डी) मुद्रण ही आहेत. आयओटी मध्ये अशी सर्व उपकरणे येतात की जी इंटरनेटला जोडलेली असून एक-दुसऱ्याशी संवाद साधतात, एकमेकांना माहिती पाठवतात. त्रिमिती मुद्रणाच्या माध्यमातून जिथे वस्तूची आवश्यकता आहे तिथे तिचे उत्पादन करणे शक्य होते. मला असे वाटते, की रोजच्या वापरातील वस्तूंचे महाजाल आणि त्रिमिती किंवा मिश्रित (ॲडिटिव्ह) म्हणजेच थराथरांनी तयार होणाऱ्या उत्पादनाचा वापर करून भारतासारख्या देशांना चौथ्या औद्योगिक क्रांतीत उडी घेणे शक्य आहे.  भारत अगोदरच विकेंद्रित समाज असून त्याची ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात वसलेली आहे. ती दारिद्र्यावस्थेत रहात असून जगण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक सुविधाही त्यांना मिळू शकत नाहीत. उदाहरणार्थ : एका खोलीच्या खोपटात जिथे वीज नसल्यातच जमा असते, प्राचीन काळापासून वापरात असलेल्या घरातील हवा प्रदूषित करणाऱ्या जैवभाराचा जळण म्हणून वापर करणाऱ्या चुलीवर स्वयंपाक केला जातो आणि पिण्याजोग्या पाण्याची आणि शौचालयाची वानवा असते. अशा परिस्थितीत राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात तीव्र बदल घडवून आणण्यासाठी चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या मदतीने उपजीविकेच्या संधी आणि घरगुती सोयीसुविधा पुरविणे शक्य होईल.

शेतीतून उदरनिर्वाहाच्या संधी  सुमारे ८० टक्के ग्रामीण लोकसंख्येचा शेती क्षेत्रात सहभाग आहे. सध्या शेती ही गैरफायदेशीर असून ती आकर्षक होण्यासाठी तिचे पूर्णपणे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढवायचे असल्यास उच्च तंत्रज्ञानाधारित काटेकोर शेतीचा (प्रिसिजन फार्मिंग) उपयोग भविष्यात करावा लागेल. ही शेतजमिनीवर किंवा कवच (कंटेनर) शेतीच्या स्वरुपात करता येईल. कवच शेतीत जहाज वाहतुकीसाठी उपयोगात येणाऱ्या पूर्णपणे बंद अशा डब्यांमध्ये (कंटेनर्स) शेतीसाठी लागणारी सर्व निविष्ठा कार्यक्षम पद्धतीने वापरल्या जातात. जमिनीवर केल्या जाणाऱ्या म्हणजेच मृदाधारित शेतीच्या उलट कवच शेतीत उजेड, तापमान, आर्द्रता आणि अन्नद्रव्ये यांच्या अचूक पातळीचा वापर करून कोणतेही अन्न (धान्य, भाजीपाला, फळे) किंवा चारापिके पिकवता येतात. ही सर्व आदाने (स्मार्ट सेन्सर्स) आणि संगणक यांच्या माध्यमातून नियंत्रित केली जातात. अशा तऱ्हेच्या शेतीत अतिशय कमी मजुरांची तसेच अगदी थोड्या माती आणि पाण्याची गरज असते आणि ती पिकांना पाण्यात (हायड्रोपोनीक्स) किवा हवेत (एरोपोनीक्स) वाढवण्याच्या तत्त्वावर आधारलेली आहे.  कवच शेतीच्या व्यावसायिकांचा असा दावा आहे, की परंपरागत शेतीच्या तुलनेत तिच्यात ९० टक्के कमी पाणी वापरले जाते आणि मृदाधारित शेतीच्या १५० पट उत्पादन होते. पाश्चात्य देशात शहरी भागात अशी उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेती मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली आहे. भारतासारख्या विकसनशील देशांना याच नमुन्याचे अनुकरण करता येईल. आज भारतीय शेतीवरील सर्वात मोठे आरिष्ट हे मजुरांचा अभाव, शेतीमालाला मिळणारी कमी किंमत, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि अतिशय निकृष्ट जमिनी यांच्यामुळे आले आहे. सूर्यऊर्जा आणि इतर नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रणालींचा वापर करून केलेली मृदाधारित काटेकोर शेती किंवा कवच शेती ही अतिशय कार्यक्षम, उच्च उत्पादन देणारी आणि म्हणून किफायतशीर ठरू शकते. आणि हेच शेतीचे भविष्य आहे.  शेतजमिनीवरील मातीचे जतन करणे आवश्यक आहे आणि तसे करायला कवच शेतीचे सहाय्य होईल. शेतजमिनीचा वापर हा चाऱ्यासाठी गवत आणि फळे, लाकूड, रसायने आदींसाठी झाडे अशी बहुवार्षिक पिके लावण्यासाठीच मुख्यत्वे केला पाहिजे. या पिकांची मुळे माती धरून ठेवतात आणि तिची धूप थांबवतात. अशी झाडे आणि गवते हिरवे आच्छादन तर वाढवतातच पण त्याचवेळी मानवजातीला उपयुक्त अशी उत्पादने पुरवतात. अखेरीस हे कवच शेतीतील डबे उपहारगृहांच्या मालकीचे होतील. अशा तऱ्हेने पिकांचे उत्पादन आणि वापर अथ पासून इतिपर्यंत उपहारगृहे करतील. यातूनच ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर उपहारगृहांचा उदय होईल. त्यातून रोजगाराच्या संधीत वाढ होईल. 

ग्रामीण कुटुंबासाठी सुविधा त्रिमिती किंवा मिश्रित वस्तुनिर्माणाधारित चौथ्या औद्योगिक क्रांतीतून ग्रामीण कुटुंबांना सुखसोयी आणि साधने उपलब्ध करून देता येतील. जेथे यंत्रे अस्तिवात असतील तेथे कोठेही थ्रीडी प्रिंटींग किंवा त्रिमिती मुद्रणाद्वारे उत्पादनाचे भाग किंवा संपूर्ण उत्पादनच थराथरांनी उभारले जाते. आराखडा जगात कोठेही तयार करता येतो आणि इंटरनेटच्या माध्यमातून त्रिमिती मुद्रणयंत्राला पाठवता येतो. अशा तऱ्हेने कच्चा माल-जसे धातूंचे भाग बनवायला धातूंची भुकटी, प्लॅस्टिकची वस्तू बनवायला प्लॅस्टिकच्या तारा आणि योग्य असा गोंद वापरून किंवा कच्च्या मालाच्या घनीकरणाने अंतिम उत्पादन तयार होते. त्रिमिती मुद्रणाचा वापर अग्निबाणांचे भाग, संपूर्ण यंत्रे एवढेच नव्हे, तर शरीराचे अवयव निर्माण करण्यासाठीही केला जात आहे. त्रिमिती उत्पादन प्रक्रियेच्या तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती होत असून लहान आणि विशेषीकृत उत्पादनांच्या निर्मितीसाठी हे तंत्रज्ञान सर्वमान्य ठरत आहे.  ANILKUMAR RAJWANSHI : anilrajvanshi@gmail.com (लेखक फलटण येथील निंबकर  कृषी संशोधन संस्था (नारी) येथे  कार्यरत आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com