Agriculture stories in Marathi, agrowon special article on adhunik baliraja on the occassion of diwali | Agrowon

आधुनिक बळी जागा झालाय
रमेश चिल्ले
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

नैसर्गिक आपत्ती तसेच अनिश्‍चित बाजार शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. तरीही स्वःतचे कौशल्य आणि त्यास अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अनेक शेतकरी यशस्वी शेती करू लागले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भविष्यातील शेतीबाबत विचार करून त्याने अशा शेतीस सुरवातदेखील केलीय.
 

दीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा केला जातो. त्यात प्रामुख्याने तेजाची, जलाची, धनाची, भूमी व तीला सुफल करणाऱ्या पशुंचीही पूजा करण्याचा प्रघात आहे. त्यातल्या अनेक अख्यायिकांमध्ये प्रामुख्याने आर्य जेव्हा उत्तर ध्रुवावरील प्रदेशात होते, तेव्हा सहा महिन्यांची रात्र व सहा महिन्यांचा दिवस सुरू होण्याच्या पर्वातील बदलानंतर हा सण साजरा करीत. प्रभू रामचंद्र सीतेसह १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत आल्याच्या दिवशी अथवा विक्रम संवत्सराचा प्रारंभ या दिवशी झाला म्हणून तसेच सम्राट अशोकाच्या दिग्वीजयाप्रीत्यर्थ तर काहींच्या मते विक्रमादित्यांच्या राज्यभिषेकांच्या समारंभानंतर हा दिवस दरवर्षी पाळला गेला.

विजयी विरांच्या पराक्रमाप्रीत्यर्थ आनंदोत्सव साजरा केलेला दिवस दिवाळीचा असला तरी मला वाटते, बळिराजाबाबतच्या आख्यायिकांची कारणे पडताळून पाहता त्यांनी वामनाला तीन पाऊले टाकण्याचा वर दिला. वामनाने दोन पावलात स्वर्ग व पृथ्वी व्यापून तिसरे पाऊल बळीच्या मस्तकी ठेवून त्याला पाताळात गाडले. ही घटना घडली अश्‍वीन वद्य त्रयोदशी ते अमावस्याला. या वेळी बळीच्या यमयातना टळाव्यात म्हणून व सर्वसामान्यांचे जीवन सुखी-समृद्ध होण्यासाठी वामनाकडे प्रार्थना केली. हा बलिप्रतिपदेचा दिवस अभ्यंगस्नान करून, दीप लावून पंचआरतीने ओवाळून आनंदोत्सव साजरा करण्याचा असे दाखले आढळतात.

पुढे असेही आढळते, की निसर्गाचे विलोभनीय दृश्‍य, पीकपाणी मुबलक पिकलेले. घरी धान्याच्या राशी आलेल्या, गुराढोरांना चारापाणी मिळाल्याने ते धष्टपुष्ट होऊन शेपटी उंचावून चौखूर उधळताहेत. सगळीकडे सौंदर्य, समृद्धी व तृप्तीचे वातावरण, रानात हिरवे चैतन्य बहरलेले म्हणजे ही तृप्तीची पर्वणीच म्हणून आम्ही उल्हासित होऊन हा सण साजरा करतो.
निसर्गाच्या भरभरून देण्याबद्दल दुमत नाहीत, पण कष्टकऱ्यांच्या पदरात त्यातले काय अन्‌ किती पडते हा प्रश्‍न आहे? मागच्या अनेक वर्षांपासून तर बहुतांश शेतकऱ्यांनी दिवाळीचा सण आनंदाने साजरा करावा, अशी परिस्थितीच दिसत नाही.

मागच्या पाच-पंचेवीस वर्षांपासून दर हंगामाला सुरळीत पाऊस पडलाय अन्‌ शेतीत बरकत आली असं कधी घडलंच नाही. कधी पाऊस ऐन पेरणीत गायब होतो, तर कधी फुले, शेंगा लागण्याच्या अवस्थेत ढगाकडे बघायला लावतो. पडतो तर धो-धो पडून पिकाचं, धान्याचं नुकसान करून जातो. पाऊस पडला तर ठीक नाही तर दोन-तीन वर्षे दुष्काळामुळे शेतकऱ्यांना होरपळावं लागतं. माणसाबरोबर मुक्‍या जिवांचेही हाल होतात. निसर्गाच्या असल्या बेभरवश्‍याच्या वागण्यानं नुकसान फक्त अन्‌ फक्त शेतीवर ज्यांची मदार आहे, अशा कष्टकरी वर्गाचे होते. शहरातल्या नौकरदार, व्यापारी, पांढरपेशा अशा कुठल्याचेही खरे नुकसान होत नसते.

मेहनत करून काढलेले धान्य घरात येते मग सणासाठी सर्वच शेतकऱ्यांनी एकदम माल बाजारात आणला, की भाव पडतात. त्याचा फायदा व्यापारी घेण्यासाठी टपलेलेच असतात. लक्ष्मीपूजनाला शेतकऱ्याकडील लक्ष्मी व्यापाऱ्यांच्या गोदामात जाते अन्‌ शेतकऱ्यांचं दिवाळं निघतं. या ना त्या निमित्ताने त्याला लुटणारे त्याच्या असंघटितपणाचा फायदा घेणारे सर्वत्र वेगवेगळ्या स्वरुपात दबा धरून बसलेले आहेत.

शेतीइतका बेभरवशाचा दुसरा व्यवसाय नसावा. पिके हाती येऊन खात्रीशीर भाव मिळेपर्यंत कुठलाच अंदाज बांधता येत नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता. पण आता शिक्षण आले. तांत्रिक बाबी बांधापर्यंत पोचल्या. तो संघटित होऊन हक्कासाठी भांडतो आहे. त्याच्या कष्टाच्या घामाचे दाम त्याला ठरविता येत नसतील तर असे बेभरवश्‍याचे उद्योग त्याने काय म्हणून करावेत? हे ही त्याला कळायला लागलेय. यापुढे त्याला लुटणे शक्‍य होणार नाही. ओला-कोरडा दुष्काळ, नापिकी, कमी उत्पादकता, शेतीमालाचे कमी भाव आणि तोट्याची शेती या विवंचनेच्या गर्तेत अडकलेल्या बळिराजाला तुम्ही आम्ही सर्वांनीच धीर देण्याची गरज आहे. 

उल्लेखनीय बाब म्हणजे आधुनिक बळी आता जागा झालाय. त्याला शेतीचे अर्थकारण उमगायला लागलेय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या शेतीत तो विविध प्रयोग करतो आहे. एका हंगामात विविध पिके घेऊन तसेच संरक्षित शेतीच्या माध्यमातून जोखीम कमी करायची हे त्याला कळू लागले आहे. जे विकते तेच पिकवून प्रसंगी त्याचे मूल्यवर्धन-प्रक्रिया करून चार पैसे कसे अधिक मिळतील, हे तो आता पाहतोय.

देशांतर्गत बाजारपेठांबरोबर आपल्या मालाची निर्यातही तो करू लागला आहे. यांत्रिक शेतीतून कष्ट, पैसा आणि वेळेची बचत तो करू लागलाय. गटशेती, समूहशेती या संकल्पना बहुतांश शेतकरी प्रत्यक्षात उतरवून त्याचे लाभ पदरात पाडून घेताहेत. महत्त्वाची बाब म्हणजे भविष्यातील शेतीच्या अनुषंगाने तो विचार करू लागला असून काहींनी अशा शेतीस सुरवातदेखील केली आहे. आधुनिक बळीच्या या यशोगाथा दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो, हीच या दिवाळीनिमित्त अपेक्षा! 

रमेश चिल्ले ः ९४२२६१०७७५
(लेखक शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...
असा घ्यावा मातीचा नमुना मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला...
हिरवळीच्या खतांवर भर द्या : सुभाष शर्मायवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती...
कापूस आयात शुल्कवाढीचा विचारमुंबई ः केंद्र सरकारने देशांतर्गत शेतमालाचे दर...
कृषी संजीवनी प्रकल्पाचे एक पाऊल पुढेमुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,...
कृषी, घरगुती पाणी वापर दरात १७ टक्के...मुंबई: महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...
फळबागेचे फुलले स्वप्न‘माळरानात मळा फुलला पाहिजे` हे वडिलांचे वाक्‍य...
नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी महोत्सवास...नाशिक : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे...
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...