पर्यावरणपूरक अक्षय ऊर्जा फायदेशीर

ऊर्जा ही आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गरज. काळाबरोबर संपत असणारे पारंपरिक ऊर्जा स्रोत व त्यांचे वाढलेले दर, वीजपुरवठ्यातील कपात आणि वाढते प्रदूषण यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर अनिवार्य आहे.
संपादकीय
संपादकीय

देशात उपलब्ध अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपैकी पवनशक्तीद्वारे ऊर्जानिर्मितीचा (३४०४६ मेगावॅट) मोठा वाटा आहे. त्याखालोखाल जलविद्युत ऊर्जा (४४८५ मेगावॅट), बायोमास (८७०० मेगावॅट) आणि त्यानंतर सौर  ऊर्जेचा (२१६५१ मेगावॅट) क्रमांक लागतो. सौर ऊर्जा : हा  वर्षानुवर्षे मिळणारा, प्रदूषणरहित आणि सहज उपलब्ध स्त्रोत आहे. भारतामध्ये सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही ५० मेगावॅट प्रति चौरस कि.मी. इतकी उपलब्ध आहे. ही सौर ऊर्जा फोटोव्होल्टाईक तंत्राच्या मदतीने उपयोगात आणली जाते.   सौर फोटोव्होल्टाईक तंत्र :  सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याच्या पद्धतीला सौर फोटोव्होल्टाईल तंत्र म्हणतात. सौर फोटोव्होल्टाईक पॅनेल वापरून सौर पथदिवे, सौर कंदिल, घरगुती प्रकाश व्यवस्था, फवारणी यंत्र पाणी उपसण्याचा पंप इ. उपकरणे चालविता येतात. नविकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेल्या अटल ज्योती योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी विभागामध्ये सौर पथदिवे बसविण्यात येत आहेत. 

सौर विद्युत निर्मिती संयंत्र : सौर ऊर्जाचे विद्युत ऊर्जेत रूपांतर म्हणजेच सौर प्रकाशीय ऊर्जा. सौर विद्युत संयंत्राचे मुख्य भाग म्हणजे सौर प्रकाशीय कुपी मोडयूल/पॅनेल. विद्युत घट, बॅटरी चार्ज कंट्रोलर, इन्व्हर्टर नियंत्रण कक्ष. पारेषण प्रणालीचा समावेश असतो. एक किलो वॅट क्षमतेच्या संयंत्रापासून स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असताना प्रतिदिन ३.० ते ३.५ युनिट इतक्या विजेची निर्मिती होऊ शकते.  रूफ टाॅप पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्प : एक किलो वॅट क्षमतेच्या पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्पामधून दरदिवशी सुमारे ५ किलो वॅट तास इतकी विद्युत निर्मिती होऊ शकते. या प्रकल्पामुळे विजेची वहन हानी कमी होते. इमारतीच्या गच्चीवर असे प्रकल्प उभारणेत येत असल्याने त्यांना अतिरिक्त जागेची आवश्यकता नाही. 

सौर औष्णिक कार्यक्रम : सौर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सौर ऊर्जेचा वापर घरगुती, व्यापारी तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये पाणी तापविणे, तसेच वाफ तयार करून अन्न शिजविणे, तसेच विद्युत निर्मिती करणे यासाठी होतो. सौर उष्णजल संयंत्र : यामध्ये किरणे सौर संकलकावर एकत्रित करून त्यापासून औष्णिक ऊर्जा तयार केली जाते. साधारणतः १०० लिटर्स प्रति दिन क्षमतेच्या सयंत्राद्वारे वर्षाला अंदाजे १५०० युनिट्‌स इतक्या विजेची बचत होते.  सौर चूल : सौर उष्णता अन्न शिजविण्यासाठी सुद्धा वापरता येते. त्यामुळे इंधनामध्ये बचत होते.

सौर प्रकाशीय साधने : सौर पॅनेलवर पडणाऱ्या सूर्यकिरणांच्या माध्यमातून विद्युत निर्मिती करण्यात येते. सौर कंदील, सौर पथदीप, सौर घरगुती दिवे, सौर पाणी उपसा पंप, सौर विद्युत संच यांसारख्या सौर प्रकाशीय संयंत्राचा दैनंदिन कामामध्ये वापर करता येतो.

पवन ऊर्जा : पवन ऊर्जा हे सौर ऊर्जेचे अप्रत्यक्ष रूप. पवनचक्क्यांच्या सहाय्याने वाऱ्यातील गती ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये केले जाते. पुढे ही यांत्रिक ऊर्जा वेगवेगळ्या स्वरूपांत वापरली जाते. पवन विद्युत जनित्राच्या वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते किंवा पाणी उपसा करण्यासाठी वापरली जाते. पवनचक्क्यांच्या आधारे २५,००० ते ५०,००० लिटर्स पाणी प्रतिदिन उपसता येते. जगभरामध्ये भारताचा पवनशक्तीद्वारे ऊर्जानिर्मितीत चौथा क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये ४,६६६ मेगावॅट इतकी पवनशक्तीद्वारे विद्युत निर्मिती केली जाते.  जैव ऊर्जा : भारतामध्ये ऊर्जानिर्मितीकरिता ५४०  टन इतके जैवपदार्थ दरवर्षी उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये कृषी अवशेष, कृषी उद्योगातून मिळणारे टाकाऊ पदार्थ शेवाळ, जनावरांचे मलमूत्र तसेच जंगलातील पालापाचोळा इत्यादींचा समावेश होतो. यापैकी ७० ते ७५ टक्के जैवपदार्थ जनावरांकरिता चारा तसेच घरगुती इंधन व इतर वापराकरिता उपयोगात आणले जातात. याव्यतिरिक्त उरलेला १५० टन जैवपदार्थ प्रतिवर्षी ऊर्जा निर्मिती करिता उपलब्ध होऊ शकतो, यापासून १८००० मेगावॅट पेक्षा जास्त विद्युत ऊर्जानिर्मिती होऊ शकते. देशातील ५५० साखर कारखाने आधुनिक तंत्राचा वापर करून चालविल्यास अतिरिक्त १००० मेगावॅट इतकी ऊर्जानिर्मिती होऊ शकते. देशामध्ये जैवपदार्थापासून २५,००० मेगावॅट इतकी विद्युतनिर्मिती शक्य आहे. जैविक पदार्थाचे थेट ज्वलन, कार्बनीकिरण, द्रवीकरण आणि गॅसीफिकेशन करून त्यांचा स्थायू, द्रव व वायु या स्वरूपांत इंधन म्हणून वापर करू शकतो. देशात  ६० टक्के ऊर्जा जैविक पदार्थापासून मिळू शकते.

बायोगॅस : बायोगॅस संयंत्र उभारणीमध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. अलीकडे इतर सेंद्रिय पदार्थसुद्धा बायोगॅसच्या निर्मितीसाठी वापरले जातात. उदा. शहरातील कचरा, जलाशयातील कचरा, कृषिउद्योगातील टाकाऊ पदार्थ. बायोगॅस हा डिझेल इंजिनमध्ये वापरून विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते. गॅसीफायरवर आधारित विद्युत निर्मिती : गॅसीफिकेशन तंत्र वापरून जैवपदार्थांपासून तयार केलेला प्रोड्युसर गॅस हा इंजिनमध्ये वापरून विद्युत निर्मिती केली जाते. जैवपदार्थांपासून द्रव इंधन : इथेनाॅल, मिथेनाॅल ही जैवपदार्थांपासून तयार करण्यात येणाऱ्या द्रव इंधनाची उदाहरणे आहेत. देशात डिझेलसाठी पर्यायी इंधन म्हणून वनस्पती तेलांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. 

भूगर्भ औष्णिक ऊर्जा ः  भूगर्भामध्ये जसजसे पृथ्वीच्या केंद्राकडे जावे तसतसे पृथ्वीचे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली अशी काही स्थानिक उष्ण केंद्रके असतात. जेव्हा भूगर्भ जल या उष्ण खडकांच्या संपर्कात येते तेव्हा कोरड्या, आर्द्र वाफेमध्ये किंवा उष्ण पाण्यामध्ये रूपांतरित हाते. अशा उष्ण केंद्रकापर्यंत विहीर खोदून कोरडी किंवा आर्द्रवाफ बाहेर काढली जाते. याचा वापर विद्युत ऊर्जानिर्मितीसाठी किंवा वातावरण ऊबदार करण्यासाठी होतो. भारतात पर्वतीय प्रदेशात अशी ३४० केंद्रके आहेत. त्यापैकी ११३ ठिकाणी भूगर्भ औष्णीक ऊर्जा वापरात आणली जाऊ शकते. 

समुद्रापासून मिळणारी ऊर्जा : भारतामध्ये कॅम्बेची खाडी, कच्छची खाडी व सुंदरबन येथील त्रिभूज प्रदेश अशा प्रकारच्या विद्युत निर्मितीकरिता अनुकूल आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पासून ८००० ते ९००० मेगावॅट विद्युतनिर्मिती शक्य आहे.  देशात नेहरू राष्ट्रीय सोलर मिशन :  २०२२ पर्यंत २०,००० मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट. या प्रकल्पामुळे प्रतिवर्षी ४३४ दशलक्ष टन कार्बनचे उत्सर्जन रोखता येईल. डिसेंबर, २०१८ पर्यंत देशात २१,६५१ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात ७३७ मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित आहेत. भारत सरकारच्या नॅशनल सोलर मिशनअतंर्गत दुसऱ्या टप्प्यात सौर ऊर्जेपासून सन २०२२ पर्यंत सौर ऊर्जेपासून १,००,००० मेगावॅट विद्युत निर्मितीचे उद्दिष्ट आहे. 

डॉ, सुरेंद्र काळबांडे : ७५८८७६३७८७ (लेखक डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com