आनंदवन ः आनंदाचा दुर्मीळ महासागर

बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांची सेवा केली. त्यांच्यावर योग्य संस्कार केले. समाजाने बहिष्कार टाकलेल्या या माणसांना बाबांनीच माणूसपण बहाल केलं. आज ९ फेब्रुवारी बाबांचा नववा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश...
आनंदवन ः आनंदाचा दुर्मीळ महासागर

प्रत्येक माणूस जीवन जगतो. त्याच्या प्रवासाला सुरवात होते. मी, माझी बायको, माझी मुलं-बाळं, माझे आई-वडील, माझं कुटुंब एवढ्यातच माणूस अडकून बसतो. यापेक्षाही पुढे गेला तर माझाच समाज! या वर्तुळाबाहेर बहुतांश माणसं झेप घेऊ शकत नाहीत. ठराविक अशा वर्तुळातच गुंतून राहणारी अशी माणसं आपल्याला पावलोपावली पाहायला मिळतात. माणसाच्या जीवनात स्वार्थ आला की आनंदाची उंची खुंटते. स्वार्थ म्हणजे आनंदाला लावलेलं काटेरी कुंपण. जोपर्यंत आपण या काटेरी कुंपणाला अर्थात स्वार्थाला फेकून देणार नाही, तोपर्यंत आनंदाचा खरा अर्थ समजणार नाही आणि आनंदाची उंचीही वाढणार नाही.

एखाद्या दुकानातून गोळ्या, बिस्किटं विकत मिळतात, तशी आनंद ही विकत मिळणारी गोष्ट मुळीच नव्हे! पण जी माणसं स्वतःभोवतालच्या स्वार्थी वर्तुळाबाहेर काम करण्यासाठी झपाटलेली असतात, त्या माणसांना मात्र आनंद दुसऱ्यांना नक्कीच वाटता येतो. हे आनंद वाटण्याचं काम चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या ठिकाणी बाबा आमटे यांनी केलेलं आहे. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा त्यांनी वसा घेतला. अनेक कुष्ठरोग्यांना त्यांनी एकत्र केलं. या कुष्ठरोग्यांच्या जीवनात ते आपल्या सेवेद्वारे आनंदाची पेरणी करू लागले. मला नेहमी एक प्रश्न पडायचा, की कुष्ठरोग्यांच्या जीवनात कीती दुःख असेल? बाबांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली, त्यांचं दुःख जवळून पाहिलं आणि त्यांच्या दुःखाने तुडुंब भरलेल्या जीवनाला ‘आनंदवन’ हे विरोधाभासी नाव का दिलं असावं? बऱ्याच दिवसांनी मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं... ती आनंदवनातील आनंदी माणसं पाहूनच! जी माणसं आनंदवनात जातात, त्यांना आनंदाच्या महासागरात गेल्याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.

सकाळचे सहा वाजले होते. मी आनंदवनात पोचलो. दुःखी लोकांशी संवाद कसा साधायचा, ते आपल्याशी बोलतील की नाही, असे विचार मनात येऊ लागले. तेवढ्यात समोर दोन- तीन कुष्ठरोगी सायकलवर फेरी मारत असलेले दिसले. जवळ येऊन त्यांनी कुठून आलात, कधी आलात, अशी माझी विचारपूस केली आणि माझं हसून स्वागत केलं. आनंदवनात प्रवेश केल्यानंतर आनंदाची ही पहिलीच झलक मला पाहायला मिळाली. आनंदवनातील स्त्रियांच्या तोंडावर मला संकट दिसलं नाही, उलट आनंदाचा पूर वाहत असलेला दिसला. थकलेली सत्तर-ऐंशी वर्षांची म्हातारी आजी असेल. रस्ता झाडत होती. मी आजीजवळ गेलो आणि म्हणालो, ‘‘आजी, थोडावेळ बसा. एवढा दम आलाय तरी तुम्ही झाडताय?’’ आजी म्हणाली, ‘‘तसं नसते राजा! काम करा लागते. आपण आपल्या घरी असंच बसतो काय? सकाळी झाडलोट करतोच नं? काम केलं तरच रोटी गोड लागते.’’ 

‘काम केलं तरच रोटी गोड लागते’ हे जीवनाचं सूत्र मला या आजीकडून शिकता आलं. आजीच्या या सूत्रानुसार जर समाज चालत राहिला अन् दुसऱ्यांना त्रास न देता माणसं स्वतःची कामं स्वतः करायला लागली, तर दुःखाचा आलेखसुद्धा खाली यायला वेळ लागणार नाही. पण दुसऱ्यांना जेव्हा जास्त काम लागतं, तेव्हा आम्हाला जास्त आनंद होतो. आनंदाकडे पाहण्याची आमची दृष्टीच वेगळी आहे. स्वतः नापास झाल्याचं दुःख आम्हाला होत नाही. दुःख होतं ते दुसरा पास का झाला या गोष्टीचं. कामात आम्हाला दुःखांचा डोंगर दिसतो; पण कामातही आनंद असतो आणि तो आनंद पाहण्याची शक्ती मला या म्हाताऱ्या आजीकडून मिळाली. 

अनेक कुष्ठरोग्यांशी मी संवाद साधला. हाताची बोटं नसलेली एक मुलगी आपल्या पायाच्या बोटानं कापडावर विणकाम करत होती. कागदावर सुई-दोऱ्याच्या साहाय्यानं कलाकुसर काढत होती आणि स्वतःच्या कलाकृतीकडे पाहून स्वतःच हसत होती. मी जवळ गेलो तेव्हा ती मला तिच्या वेगवेगळ्या कलाकृती दाखवत बोबड्या बोलात म्हणाली, ‘‘सुंदर आलंय ना?’’ मी म्हणालो, ‘‘खूपच छान’’ हाताची बोटं नसताना पायाच्या बोटांनी एवढ्या सुंदर कलाकृती तयार करणं साधी गोष्ट नव्हे. माझं बोलणं ऐकताना त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र गगनात न मावणारा होता. हाताची बोटं असणारी असंख्य तरुण-तरुणी समाजात आहेत. त्यांना स्वतःच्या हाताच्या बोटांची किंमत समजत नाही. बोटं असून ते दुःखी आहेत. हाताची बोटं नसणारी मुलगी पायाच्या बोटांत समाधान मानते आणि दुःखानं भरलेल्या जीवनाला आपल्या कलाकृतीच्या साहाय्याने आनंदाची झालर लावते. दुःखातही आनंदाचा मार्ग कसा शोधायचा, हे मला आनंदवनातील स्पष्ट बोलताही न येणाऱ्या मुलीकडून शिकता आलं.

आनंदवनात मला शेतीही दिसली. रिकाम्या जागेत भाजीपाला लावलेला होता. शेताला पाणी देणारे, आनंदवनाला पाणीपुरवठा करणारे, विद्युतपुरवठा करणारे, स्वयंपाक करणारे, गाई-म्हशी चारणारे अशी वेगवेगळी कामं करणारी माणसं मला दिसली. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होता. कामचुकारपणा करणारा माणूस मला आनंदवनात पाहायला मिळाला नाही. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती. हातापायाला पट्ट्या बांधलेली माणसं जेवायला बसली. काही माणसं जेवायला वाढत होती. ज्यांना हातानं खाता येत नाही, त्यांना दुसरं कुणीतरी भरवत होतं. थकलेले आजोबा सर्वांना पाणी देत होते. मी आजोबांजवळ जाऊन म्हणालो, ‘‘आजोबा, तुम्ही जेवायला बसा. मी सर्वांना पाणी देईन.’’ आजोबा म्हणाले, ‘‘नाही, सर्वांनी जेवल्यावरच मी जेवण करतो. हे माझं रोजचंच काम आहे.’’ स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांना जेवण वाढण्यात काय आनंद असतो हे अजोबांकडून शिकता आलं. शेवटी आनंदवनाचा निरोप घेताना फुलझाडांना पाणी घालणारी आजी मला भेटली. मी आजीला गावाचं नाव विचारलं तर आजी म्हणाली, ‘‘आम्हाला कशाचा गाव अन् देव बाबा? केव्हाच विसरून टाकला आम्ही!’’ मी म्हणालो, ‘‘तुम्हाला जर कोणी तुमचं गाव कोणतं, देव कोणता, असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगाल?’’ तेव्हा आजीने दिलेलं उत्तर फार समर्पक होतं. आजी म्हणाली, ‘‘आनंदवनच आमचं गाव... आणि बाबा (आमटे) आमचा देव...’’

बाबा आमटे एक सर्वसामान्य माणूसच होते; पण या आजीने अर्थात कुष्ठरोग्यांनी बाबांना देव मानलं. कारण बाबांनीच कुष्ठरोग्यांची सेवा केली, त्यांच्यावर योग्य संस्कार केले. समाजाने बहिष्कार टाकलेल्या या माणसांना बाबांनीच माणूसपण बहाल केलं. आनंदवनात कितीही दुःखी माणूस राहत असेल, तर त्याच्या दुःखाच्या कितीतरी पटीने जास्त आनंदात तो जीवन जगतो. आनंदवनातील माणसांप्रमाणेच समाजातील माणसांनीही आनंद शोधण्याचा प्रयत्न करावा आणि दुःखाला कायमचं दूर करावं. मला जेव्हा जेव्हा आनंदवनाची आठवण येते, तेव्हा मनाला असंच वाटतं, की आनंदवन... आनंदाचा एक दुर्मीळ महासागरच आहे. आनंदवनाचे निर्माते बाबा आमटे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!  भऱतकुमार गायकवाड ः ९८८१४८५२८५ (लेखक ग्रामीण कथाकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com