आर्थिक तरतुदीबरोबर हवे तांत्रिक मार्गदर्शन

सधन कुक्कुट विकास गट स्थापनेसाठी राज्य शासनाने अनुदानासाठी १५ कोटी ५८ लाख ३३ हजार रुपयांची अर्थ तरतूद नुकतीच केली आहे. या योजनेचा हेतू चांगला आहे, परंतु योग्य तांत्रिक मार्गदर्शनाशिवाय योजनेचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होईल का, हा प्रश्‍न आहे.
संपादकीय
संपादकीय
अंड्याचे पोषणमूल्य पाहता, महाराष्ट्रात कुपोषित माता, कुपोषित बालके, वाढ खुंटलेली बालके, विकलांग बालके, नवजात बालकांचे मृत्यू होऊ नयेत म्हणून शासन परसातील कुक्कुटपालन या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. परसातील कुक्कुटपालनाद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील आर्थिक उत्पन्नाचे स्रोत अधिक बळकट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कमी बाजारमूल्य आणि उच्च पोषणमूल्य असणारा पण अत्यंत उत्कृष्ट, भेसळरहित प्रथिनयुक्त आहार सर्वांना उपलब्ध व्हावा, हा चांगला हेतू समोर ठेवून शासन या वर्षापासून सधन कुक्कुट विकासगट स्थापना करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू करत आहे, त्याचे अभिनंदन केले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात १६ जिल्ह्यांत शासकीय सधन कुक्कुट विकास प्रकल्प आणि चार ठिकाणी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र कार्यरत आहेत. या प्रकल्पातून कुक्कुटपालन या व्यवसायाचा विस्तार व्हावा म्हणून विविध योजनेद्वारे अनुदानावर उबवणीसाठी अंडी वाटप, एक दिवसाचे पिल्ले वाटप, तलंग्याचे गट वाटप अशा योजना राबवल्या जातात. याचबरोबर सध्या महाराष्ट्रात सार्वजनिक-खासगी भागीदारी या तत्त्वावर अजून १४ जिल्ह्यांत प्रत्येकी २ याप्रमाणे २८ सधन कुक्कुट विकास गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे प्रकल्प असणारे तालुके सोडून इतर ३०२ तालुक्‍यांत सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्याचाही मनोदय आहे. त्यासाठी प्रत्येक गटावर २००० पक्षांची प्राथमिक समूह गट ठेवण्याची मंजुरीदेखील मिळालेली आहे. या योजनेसाठी प्रत्येक प्राथमिक समूहाचे संगोपन करण्यासाठी राज्य शासनाकडून एक हजार चौरस फुटांचे दोन पक्षीगृहांचे बांधकाम, स्टोअर रूम, पाण्याची टाकी, विद्युतीकरण, खाद्य-पाण्याची भांडी, ब्रुडर, लघू अंडी उबवणी यंत्र, ४०० उबवणीची अंडी, १००० एकदिवसीय पिल्ले तसेच मिश्र एक दिवसाचे १००० पिल्ले, या २००० पिल्लांसाठी २० आठवड्यांचे खाद्य, २० आठवडे वयाची अंड्यावरील ५०० पक्षी, पक्षीखाद्य यांचा पुरवठा करण्यासाठी ५० टक्के अनुदान देणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला अनुदानासाठी ५ लाख १३ हजार ७५० रुपये मिळणार आहेत. या योजनेत समाविष्ट झालेल्या लाभार्थ्याला ५ दिवसांचे कुक्कुटपालन प्रशिक्षण दिले जाणार आहे. सधन कुक्कुट विकास गट स्थापनेसाठी राज्य शासनाने अनुदानासाठी १५ कोटी ५८ लाख ३३ हजार रुपयांची अर्थ तरतूद नुकतीच केली आहे. या योजनेचे लाभार्थी निवड समिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या सहा सदस्यांच्या समितीतर्फे निवडले जातील. या योजनेचा हेतू चांगला आहे, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही; परंतु तांत्रिक मार्गदर्शनाशिवाय योजनेचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होईल का? हा प्रश्‍न आहे. कुक्कुटपालन हा व्यवसाय नाजूक आहे. कुक्कुटपालनात व्यवस्थापनशास्त्र, आहारशास्त्र आणि आरोग्यशास्त्र काटेकोरपणाने पाळले गेले पाहिजे. कारण कुक्कुटपालनात निरनिराळ्या वयोगटांत निरनिराळ्या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन पक्षांची मरतूक होऊ शकते. त्याचबरोबर अंडी उत्पादन कमी होणे, चिकनची प्रत खराब होणे अशा अडचणींनाही सामोरे जावे लागते. वास्तविक पाहता निरनिराळ्या वयोगटांत निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोगप्रतिबंधक लसीकरण काळजीने करणे गरजेचे आहे. वातावरणात रोगकारक जिवाणू, विषाणू यांचे सदैव अस्तित्व असतेच, त्याचा केंव्हा प्रादुर्भाव होईल याचा नेम नसतो. व्यवस्थापनातील दोषामुळे होणारे रोग, असंतुलित आहार या सर्वांचा परिणाम म्हणजे अंडी उत्पादनातील घट, चिकनची प्रत खराब होणे आणि यातून थेट उत्पन्न घटू शकते. त्यामुळे या योजनेत समाविष्ट झालेल्या लाभार्थींना ५ दिवसांचे प्रशिक्षण देऊन कुक्कुटपालनातून चिरकाल टिकणारा शाश्‍वत स्वयंरोजगार ग्रामीण भागात निर्माण होणार नाही. त्यासाठी कुक्कुटतज्ज्ञ पशुवैद्यक यांच्या मार्गदर्शनाखाली कुक्कुटपालक दत्तक योजना या अंतर्गत सधन कुक्कुट विकास गट कार्यरत राहिला पाहिजे. कुक्कुटपालक दत्तक योजनेअंतर्गत खालील बाबी अपेक्षित आहेत. - तालुकास्तरावर कुक्कुटतज्ज्ञ पशुवैद्यकांची नेमणूक असली पाहिजे. - कुक्कुटतज्ज्ञ पशुवैद्यकांच्या कार्यालयास मोबाईल व्हॅन आणि अपेक्षित कर्मचारी वर्ग असावा. - मोबाईल व्हॅनमध्ये आधुनिक सुसज्ज डायग्नोस्टिक लॅब असावी म्हणजे मृत्यू पावलेल्या पक्षाचे शव विच्छेदन करून त्याआधारे प्रक्षेत्रावरील इतर पक्षांवर औषधोपचार करता येतील आणि संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येईल. - सधन कुक्कुटगट प्रक्षेत्रावर कुक्कुटपालकांच्या माध्यमातूनच योग्यवेळी योग्य रोगप्रतिबंधक लसीकरण करून संभाव्य रोग टाळता येतील. - प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर व्यवस्थापनातील दोषांबाबत कुक्कुटपालकांना मार्गदर्शन मिळेल. - वेगवेगळ्या वयोगटांत असमतोल, असंतुलित आहारामुळे होणारे रोगांबाबतही कुक्कुटपालकांत जागृती होईल. - अंडी देणाऱ्या, अंडी न देणाऱ्या कोंबड्या कशा ओळखाव्यात, याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देता येईल. - प्रक्षेत्रावर कुक्कुटपालक आणि कुक्कुटतज्ज्ञ पशुवैद्यक यांच्यातील चर्चा, प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षणातून कुक्कुटपालनातील व्यवस्थापनशास्त्र, आहारशास्त्र आणि आरोग्यशास्त्राचे संस्कार होतील. कुक्कुटतज्ज्ञ पशुवैद्यक प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर कुक्कुटपालकांना प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक यांचा सुवर्ण मध्य साधला जावून सधन कुक्कुट गटास पशुवैद्यकीय शास्त्राचे आधिष्ठान लाभून चिरकाल टिकणारा स्वयंरोजगार मिळेल आणि या अथक प्रयत्नातून पोल्ट्री उद्योजक निर्माण होतील आणि हेच अन्नाचे पोषणमूल्य जोपासू शकतील. सधन कुक्कुट प्रकल्प हे मातृसंस्था म्हणून कार्यरत राहणार आहे. परसातील कुक्कुटपालक, पशुपालक शेतकरी, महिला स्वयंम साह्यता गट, सुशिक्षित बेरोजगार यांना एक दिवसाचे पिल्ले, तलंग्या, उबवणीचे अंडी हे या प्रकल्पातून सहज उपलब्ध होऊन त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होईल. परसातील कुक्कुटपालक, सधन कुक्कुट प्रकल्प आणि कुक्कुटतज्ज्ञ पशुवैद्यक यांची साखळी निर्माण झाली पाहिजे. क्‍लस्टरमध्ये काम झाले पाहिजे तरच हा व्यवसाय स्थिरावेल अन्यथा नाही. : डॉ. श्रीकांत सरदेशपांडे : ९६५७२५७८०४ (लेखक सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com