Agriculture stories in Marathi, agrowon special article on basic needs of farmers | Agrowon

सहनशीलतेचा अंत किती दिवस पाहणार?
अनंत देशपांडे
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

सतत तोटा येणार आहे हे कळूनसुद्धा शेतीसारखा आतबट्ट्याचा व्यवसाय करणारे असे अनेक तात्या आपल्यासारख्यांना खाऊ घालत आहेत. आम्ही मात्र त्यांचे आर्थिक आणि शारीरिक भांडवल काढून आणण्याचाच कुटिल डाव खेळतो आहोत.

परवा सुसलाद, तालुका जत या गावी जाण्याचा योग आला. माझे व्याही रामचंद्र जतकर यांचे हे गाव, कर्नाटकाच्या सीमेवर, तसे ते मूळचे पंढरपूरचे परिचारक. पणजोबा दत्तक गेले आणि हे सुसलादचे जतकर झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणींचे लग्न वगैरे झाल्यावर, चार भावांचा शेतीत निभाव लागणार नाही, हे हेरून दोघे भाऊ पस्तीस वर्षांपूर्वी पुण्याला आले. बाकी दोघे भाऊ शेतीवर राहिले. पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी पुण्यात आले, नोकरी करून मुलाबाळांचे संसार व्यवस्थित लागल्यावर आणि सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी गावाकडे जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. मधल्या काळात चारही भाऊ वाटण्या करून बाजूला राहिले. मुळातला शेतकरी पिंड त्यांना स्वस्थ बसू देईना, म्हणून शेती करायला गावाकडे गेले. त्याला आता तीन वर्षे झाली. ते स्वतःच शेती करतात. आत्ता त्यांचं वय पासस्ट वर्षांचं. शेतात चांगलं घर बांधलंय. जुन्या सामाईक विहिरीचं थोडं पाणी उपलब्ध आहे, त्याच थोड्या पाण्याच्या आधाराने सात एकर शेती करत आहेत. एक मुलगा, दोन मुली सगळ्यांची लग्न झाली आहेत. अनेक दिवसांपासून मला गावाकडे येण्यासाठी आग्रह चालूच होता, त्यात त्यांचेकडे हुरडा आलेला. मलाही जायचे होतेच, गेलो एकदाचा. 

एके काळी मीही अत्यंत आवडीने आणि चांगल्या प्रकारची  शेती करायचो. निसर्गाशी तादात्म्य पावण्याची अनुभूती शेतकऱ्याला शेती सोडता सोडवत नाही. मलाही सोडवत नव्हती पण अत्यंत नाइलाजाने मला शेती सोडावी लागली. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने माझा शेतीव्यवसायिक म्हणून पराभव केला आणि तो पराभव स्वीकारून अत्यंत जड अंतःकरणाने मी शेती विकून टाकली. पण शेतीची ओढ अजूनही कायम आहे. गावाकडे गेल्यावर कोणातरी शेतकरी मित्राच्या शेताला जाऊन ती ओढ सांतवण्याचा प्रयत्न करत असतोच. असो, सुसलाद हे गाव महाराष्ट्राच्या टोकाला असल्यामुळे रस्ते काय दर्जाचे असतील, ते वेगळं सांगायला नको.

गावापासून शेती साधारण एक किलोमीटर, चालतच जावे लागते. एसटी ने सायंकाळी पाच वाजता गावात उतरलो. तात्या (माझे व्याही) घ्यायला आलेले होते. गिट्टी उघडी पडलेल्या रस्त्याने चालत शेतात गेलो. चहा पाणी झाल्यावर तात्यांनी शेतात वापरण्याचा ड्रेस अंगावर चढवला. ज्वारीच्या पिकावर पाखरांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या, त्या राखणे गरजेचे  होते. हातात गोफण घेऊन आणि माझी परवानगी घेऊन ते पाखरं हाकायला गेले. गंभीरपणे शेती करायला ते गावाकडे आल्याचे जाणवत होते. गेल्याबरोबर आमची हुरडा खायची सोय केलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी सलग तीन वेळा हुरडा खाऊ घातल्यावरच त्यांना समाधान वाटलं. दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन वापस निघण्याच्या पहाटे साडेतीन वाजता बाहेर कुत्रे भुंकण्याचा आवाज आला म्हणून जागा झालो व उठून बाहेर आलो. घराच्या बाजूला असलेल्या शेतात दारं धरण्यासाठी तात्याच्या भावाच्या शेतात त्यांचा भागीन आला होता. थ्री फेज लाईट येण्याची ही वेळ, दहा अंश सें. ग्रे. तापमानात पहाटे साडेतीन वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत हा गडी  मका व हरभऱ्याच्या पिकाला पाणी देत उभा. मनात आल रात्री शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांना  आणि वीज मंत्र्याला महिन्यातील किमान आठ दिवस रात्री  शेतात पाणी देण्यासाठी पाठवायला पाहिजे.

निघायच्या दिवशी सकाळीच एका माणसाला बोलावून तात्यांनी लेकीसाठी, जावयासाठी, नातींसाठी  गरम हुरडा भाजून बांधून द्यायची सोय केलेली. आमच्या बरोबर काय देऊ आणि काय नको, असं त्या दोघा नवरा-बायकोला झालेलं. बोरं, ढाळे, लिंबू, लाल मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा, लाल तिखट, नातीने फोन करून सांगितलंय हे निमित्त सांगून, काय देऊ आणि काय नको, असं त्यांना झालं होतं. पोटच्या पोरीबद्दल त्यांच्या मनात असलेला कोवळेपणा आणि त्यापायी चाललेली धावाधाव एका आईबापाच्या मनाची कालवाकालव बघून ते जे बांधून देतील ते नाही म्हणवेना. सगळं सामान घेतलं आणि आम्ही बस गाठायला बाहेर पडलो, अनेक प्रश्नांचे ओझे घेऊन.

आदल्या दिवशी बोलता बोलता तात्यांनी दोन-तीन लाख रुपये खर्च करून नवीन विहीर पाडणार असल्याबद्दलची भावी योजना सांगितली, नव्हे तसा निर्धारच व्यक्त केला. मी मात्र त्यांची योजना ऐकून मनातून हादरलो. कारण कर्ज काढून ही योजना राबवणार आहेत. सामायिक विहिरीतील पाणी पुरेसं नाही, सातच्या सात एकर रान पाण्याखाली आणण्याची ओढ त्यांना गप्प बसू देणारी नाही, हे मी ताडलं. सतत तोटा येणार आहे हे कळूनसुद्धा शेतीसारखा आतबट्ट्याचा व्यवसाय करणारे असे अनेक तात्या आपल्यासारख्यांना खाऊ घालत आहेत. आम्ही मात्र त्यांचे आर्थिक आणि शारीरिक भांडवल काढून आणण्याचाच कुटिल डाव खेळतो आहोत. काय जादू असेल त्या काळ्या आईची कुणास ठाऊक? पुनर्निर्माणाचा आनंद कि आणखी काही, मरणाकडे जाणार आहोत, हे माहिती असूनसुद्धा दिव्यावर झेप घेणारा पतंग आणि शेतकरी यातला फरक याची तुलना करत करत आणि तात्यांच्या भावी योजनेला शुभेच्छा देत  सुसलादहून पुण्याकडे निघालो, तो जुन्याच प्रश्नांची उजळणी करतच.

देश स्वतंत्र झाल्याला सत्तर वर्षं व्हायला आली. नियोजनाचा बोलबाला करत, कल्याणकारी समाजरचनेचे ढोल बडवीत आम्ही ग्रामीण भारताची परवड केली आहे. तिचे भग्न अवशेष खेडेगावात पाऊल टाकताच दिसायला लागतात. ना पाण्याची सोय, ना विजेची उपलब्धता, ना रस्त्याची उभारणी, बाकीच्या शेतीसाठी  लागणाऱ्या संरचेनेचा, सुधारणेचा तर विचारच करायला नको. शेती व्यवसायात बाहेरून भांडवल येऊच नये अशा प्रकारचे सारे बंदोबस्त आपल्या राज्यकर्त्यांनी आणि नियोजनकर्त्यांनी करून ठेवले आहेत. त्यामुळे  कर्तबगार उद्योजक इच्छा असूनही शेतीत येऊ शकत नाहीत. संरचेनेचा अभाव, तंत्रज्ञान वापराला बंधन आणि त्यात कहर म्हणजे शेतमालाचे भाव सातत्याने पाडण्याचे सरकारचे धोरण. त्यामुळे संपूर्ण ग्रामीण भारत उध्वस्त झालाय, हे पाहता क्षणीच जाणवतं. इतकी विपरीत परिस्थिती असूनही शेतीचं उत्पादन टिकून आहे, ते  तात्यासारखी शेतीची आवड असणारे असंख्य संवेदनशील आणि कष्टाळू शेतकरी आणि रात्ररात्र उभे राहून पाणी देणारे  शेतकऱ्यांचे सहउत्पादक आहेत म्हणून. 
दिव्यावर पतंगासारख्या उड्या मारणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत सरकार आणि आपल्यासारखा समाज किती दिवस पाहणार आहे, कोण जाणे?  
अनंत देशपांडे : ९४०३५४१८४१
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...
बदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...
संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित...अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल या प्रणाली...
द्राक्षपट्ट्याला दुष्काळाचे ग्रहणसांगली ः गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय......
पर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालनापर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार...