शास्त्राशी सुसंगत असावीत शेतीची कामे

आधुनिक शेतीच्या शास्त्राप्रमाणे केलेली शेती आर्थिकदृष्ट्या फायद्याची करता येते, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्याचे काम कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांप्रमाणे शेती खात्याचेही आहे.
संपादकीय
संपादकीय

आपल्या देशातील शेतीचा तीन हजार वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. शेतीचे शास्त्र निसर्गाने तयार केले आहे. निसर्ग स्वतःच्या शास्त्राप्रमाणे शेती कशी करायची, याचे प्रात्यक्षिक दररोज करून दाखवत असतो. हे काम आजही चालू आहे. पूर्वीच्या शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकाच्या निरीक्षणातून शेतीच्या दैनंदिन कामाचे तंत्रज्ञान प्राप्त केले. हे तंत्रज्ञान त्याच्या शेतीतील दैनंदिन कामातून प्रगट होत असे व पिकाच्या स्वरूपात दिसत असे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यांमुळे शेतीतील पिकाचे नुकसान होते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीन हंगाम व २७ नक्षत्रे यांत हवामान बदलत असते. याचा पिकावर चांगला अथवा वाईट परिणाम होत असतो. या परिणामाचे पूर्वीच्या शेतकऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण चालू असे. या निरीक्षणातून प्रतिकूल हवामानात टिकून राहणे व अनुकूल हवामानाचा जास्तीत जास्त लाभ मिळविणे याचेही तंत्रज्ञान त्यांनी मिळविले होते. यामुळे पूर्वीच्या शेतकऱ्यांनी हजारो वर्षे कुणाच्याही मदतीशिवाय उत्तम शेती केली. त्यांनी मिळविलेले हे तंत्रज्ञान दैनंदिन शेतीच्या चाललेल्या कामाच्या प्रात्यक्षिकातूनच पिढ्यान्‌पिढ्या चालत आले. अशी शेती आपल्या देशात १९४०-१९५० च्या दशकापर्यंत चालत होती. आज निसर्गनिर्मित शेतीचे शास्त्र लिखित स्वरूपात उपलब्ध नाही.

पूर्वीच्या शेतीत घरचे निवडक शुद्ध बियाणे व शेणखत या दोनच निविष्ठा व बैलाच्या मोटेचे पाणी यावर त्यावेळचे शेतकरी भरघोस पिके घेत असत. मी १९४९ साली शेतीला सुरवात केली होती, त्या वेळी अशी भरघोस पिके घेणारा मीही एक शेतकरी आहे. पूर्वीच्या शेतीचे सर्व व्यवहार शेतमालाच्या स्वरूपातच चालत होते. रोख पैशाचा व्यवहार नव्हता. आधुनिक शेतीच्या सुरवातीलाच शेतीचे सर्व व्यवहार रोख पैशात सुरू झाले. यामुळे आपल्या देशातील शेतीचे मूळ स्वरूप बदलले व शेतीचा शेती व्यवसाय झाला.

शेती व्यवसाय सोडून इतर सर्व व्यवसायांची सतत भरभराट चालू आहे. फक्त शेती व्यवसायच तोट्यात चालतो. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांना स्वतःचा प्रपंच चालवणेच कठीण होत आहे. या सर्व अडचणी शेतकरी प्रत्यक्ष शेतीत काम करतात तिथेच येतात. या सर्व अडचणी सोबतच मोठ्या जिकीरीने व कष्टाने शेतकरी आपली शेतीची दैनंदिन कामे करत असतात. या अडचणींना कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा फक्त आपल्या देशाचा मूलभूत स्वतंत्र प्रश्‍न आहे. आपल्या देशाच्या १२५ कोटी लोकसंख्येच्या ५५ ते ६० टक्के शेतकऱ्यांचा चरितार्थ व रोजगार शेतीच्या उत्पन्नावर चालतो. इतक्‍या मोठ्या संख्येच्या शेतकऱ्यापुढे कशामुळे या अडचणी आल्या आहेत, याचा सर्व क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितचिंतकांनी विचार केला पाहिजे. यासाठी स्वतःची शेती व्यवसायाप्रमाणे चालवून शेतकऱ्यांना स्वतःच ती फायदेशीर करता आली पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून सरकारच्या सर्व योजना तयार झाल्या पाहिजेत व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्‍यक तितके अर्थसाह्य सरकारने केले पाहिजे. शेतकरी शेतमाल विकत घेऊन त्याची विक्री करत नाहीत तर स्वतः उत्पादन करून त्याची विक्री करतात. यामुळे स्वतःच्या पिकांचा तपशीलवार उत्पादन खर्च माहीत असल्याशिवाय शेती व्यवसायाप्रमाणे करता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी पिकाचा तपशीलवार उत्पादन खर्च लिहून काढावा. उत्पादन खर्च माहीत असल्यामुळे आपला शेतमाल बाजारपेठेत विकून मिळालेल्या पैशामुळे आपला फायदा झाला का तोटा झाला, हे समजते. तोटा झाला असेल तर तो कशामुळे झाला व फायदा झाला असेल तर तो कशामुळे झाला हे उत्पादन खर्चाचे आकडे सांगतील. स्वतः पुढच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग पण हे उत्पादन खर्चाचे आकडे दाखवतील. कृषी अर्थशास्त्र माहीत असणाऱ्यांना या आकड्यांची भाषा समजते. पूर्वीच्या निसर्गाचे काम आज आधुनिक शेतीत कृषी विद्यापीठाकडे आहे. कृषी विद्यापीठात आधुनिक शेतीचे शास्त्र तयार झाले. आधुनिक शेतीच्या शास्त्राप्रमाणे केलेली शेती आर्थिकदृष्ट्या फायद्याची करता येते, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्याचे काम कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचेच आहे. कृषी विद्यापीठात असे प्रात्यक्षिक करून दाखवले जात नाही. कृषी विद्यापीठात बी एसस्सी ॲग्री, एम एसस्सी ॲग्री या पदव्या मिळविण्यासाठी मुले शिकू लागली. आधुनिक शेतीच्या शास्त्राची पुस्तके वाचून या मुलांना हे आधुनिक शेतीचे शास्त्र समजते. शास्त्र समजले तरी शेती करता येत नाही. शेती करणे म्हणजे शेतीत प्रत्यक्ष काम करणे. हे काम शारीरिक श्रमाचे असो अथवा यंत्राने केलेले असो, शेतीच्या प्रत्येक कामात शास्त्र आहे. या शास्त्राशी सुसंगत प्रत्यक्ष शेतीची कामे कशी करायची, याचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना द्यावे लागते. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतीतील दैनंदिन कामातून प्रगट झाले पाहिजे व पिकाच्या स्वरूपात दिसले पाहिजे, अशी कामे सांगून कळत नाहीत व ती शिकवून समजत नाहीत. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजण्यासाठी या तंत्रज्ञानाप्रमाणे शेतीतील कामे प्रत्यक्ष करून दाखवून त्या कामाच्या प्रात्यक्षिकातूनच द्यावे लागते. या कामाचा सराव करून शेतकरी हे तंत्रज्ञान मिळवतात. निसर्ग स्वतःच्या शेतीच्या शास्त्राचे प्रात्यक्षिक करून दाखवतो. या प्रात्यक्षिकांच्या निरीक्षणातून आजही शेतकऱ्यांना निसर्गनिर्मित शेतीच्या शास्त्राप्रमाणे शेती करता येते. याच शेतीला आज सेंद्रिय शेती म्हणतात. आधुनिक शेतीच्या शास्त्राप्रमाणे केलेली शेती आर्थिकदृष्ट्या फायद्याची करता येते, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्याचे काम कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांप्रमाणे शेती खात्याचेही आहे. हे प्रात्यक्षिकाचे काम शेतकऱ्यांच्या शेतीत चाललेल्या दैनंदिन कामातूनच दाखवावे लागते.

आधुनिक शेतीला सुरवात होऊन ६८ वर्षे झालेली आहेत. आजही शेतकरी कर्जबाजारी आहे. कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही म्हणून आत्महत्या करतात. याचेही कारण त्यांना आपली शेतीतली दैनंदिन काम पार पाडत असताना येणाऱ्या अडचणी हेच आहे. या सर्व अडचणी नाहीशा झाल्यावर शेतकऱ्यांना आपली शेतीतली दैनंदिन कामे करण्याचे तंत्रज्ञान देता येईल. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळाल्यावर त्यांची शेतीतली सर्व कामे आधुनिक शेतीच्या शास्त्राशी सुसंगत चालतील. अशी कामे चालल्यावर कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना व शेती खात्याला आधुनिक शेतीच्या शास्त्राप्रमाणे केलेली शेती आर्थिकदृष्ट्या फायद्याची करता येते हे दाखवून देता येईल. थोडक्‍यात शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकाचा उत्पादन खर्च माहीत असला पाहिजे व आपल्या शेतीतील दैनंदिन कामाचे तंत्रज्ञान मिळाले पाहिजे.

नारायण देशपांडे  ः ९०९६१४०८०१ (लेखक आटपाडी येथील शेती परिवार कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com