संपादकीय
संपादकीय

कापूस संशोधनाची पुढील दिशा

फक्त खासगी कंपन्यांतर्फेच संकरित बीटी वाण विकसित होत गेल्याने या वाणांच्या लागवड पद्धती विकसित करणे, त्यांचे मूल्यमापन करणे आदी आवश्‍यक गोष्टींकडे सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी दुर्लक्ष केले. परिणामतः कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.
केंद्र शासनातर्फे बीटी जनुकांचे बौद्धिक संपदा हक्क विकत घेऊन ते सार्वजनिक क्षेत्रातील संशोधकांना उपलब्ध करून देण्याविषयीची बातमी सुमारे २० वर्षांपूर्वी वाचली होती. परंतु तसा करार न झाल्याने सार्वजनिक क्षेत्रात बीटी वाण विकसित केले गेले नाहीत. फक्त खासगी क्षेत्रातील कंपन्यांतर्फेच संकरित बीटी वाण विकसित होत गेल्याने या वाणांच्या लागवड पद्धती विकसित करणे, त्यांचे मूल्यमापन करणे आदी शेतकऱ्यांसाठीच्या आवश्‍यक गोष्टींकडे सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. तसेच शासकीय कृषी खात्यानेसुद्धा याकडे लक्ष्य दिले नाही. परिणामतः शेतकऱ्यांचे व्हायचे ते नुकसान झालेच. रेफ्युजीला नकारच वास्तविकतः बीटी जनुकामुळे बियाण्यास ७०-७५ टक्के इतकीच प्रतिरोधकता प्राप्त होत असते. याचा फारसा विचार केला गेला नाही. संकरित बीटी बियाण्याबरोबर नॉन-बीटी बियाणेसुद्धा वेगळ्या छोट्या पाकिटात पुरविले जाते. ते रेफ्यूजी पीक म्हणून ठराविक बीटी ओळीनंतर लावणे आवश्‍यक असते. नॉन-बीटी झाडांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर तिचे रसायनांद्वारे त्वरित नियंत्रण करता येते आणि प्रसार थांबविता येतो. मी नियमितपणे नॉन-बीटी बियाणे बीटी बियाण्यांबरोबर लावत असे आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना दरवर्षी ते पेरण्याचा आग्रह करीत असे. पण सर्वसाधारणपणे शेतकरी नॉन बीटी बियाणे पेरतच नाहीत. पुढे काही बीटी बियाणे कंपन्यांनीही नॉन बीटी बियाणे देणे बंद केले. त्यामुळे अमेरिकन बोंडअळीत उत्परिवर्तन घडून येऊन बीटी जनुकाविरुद्ध प्रतिकारकता निर्माण झाली आणि असा उत्परिवर्तीत बोंडअळीपुढे बीटी बियाणे निष्प्रभ ठरू लागले. बीजी -२ चा दावा फोल बीजी-१ हा पहिल्या स्तरावरील वाण अमेरिकन बोंडअळीस बळी पडू लागल्याने बीजी-२ हा दुसऱ्या स्तरावरील (वेगळा जनुक असलेला) वाण कंपन्यांनी बाजारात आणला. बीजी-२ वाणं बीजी-१ वाणांपेक्षा निश्‍चितच अधिक प्रतिरोधक आहेत. या वाणांत हेलिओथिस आणि स्पोडोप्टेरा या दोन्ही प्रकारच्या अळ्यांना प्रतिरोधकता दिसून आली. गुलाबी बोंडअळीलासुद्धा बीजी-२ वाणांमध्ये प्रतिरोधकता असल्याचा कंपन्यांचा दावा होता. सुरवातीला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नसल्याने किंवा हंगामात उशिरा व फार कमी प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. पण गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढे वाढल्यानंतर हे लक्षात आले की बीजी-२ वाणांमध्ये गुलाबी बोंडअळीला प्रतिरोधकता नाही. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी वेगळ्या प्रतिरोधक जनुकाचा शोध आता घ्यावा लागेल. तणनाशक प्रतिरोधक वाणाची घुसखोरी गेल्या एक - दोन वर्षात बियाणे कंपन्यांमार्फत अवैधरीत्या तणनाशक प्रतिरोधक जनुक असलेल्या बियाण्याचे वितरण झाले आहे. (अशाच प्रकारे बीटी बियाण्याचे अवैध वितरण १६-१७ वर्षांपूर्वी गुजरातमध्ये झाले होते.) तणांच्या बंदोबस्तांसाठी भरपूर मजूरशक्ती उपलब्ध असल्याने अशा तणनाशक प्रतिरोधक जनुकांच्या उपयोगास भारतात सध्या बंदी आहे. तथापि सध्या मजुरांची कमतरता भासत असल्याने अशा बियाण्यास मान्यता देण्याविषयी शासनावर दबाव येऊ शकतो. तथापि बीटी बियाण्यासारखीच इतिहासाची पुनरावृत्ती होऊन या बियाण्यामुळे शेतकऱ्यांची फसगत होऊ नये. सरळ बीटी वाणांचा विकास क्राय वन (एसी) या जनुकाचा बौद्धिक संपदा हक्क कालावधी संपल्यामुळे हा जनुक वापरण्यासंबंधी आता निर्बंध नाहीत. या संधीचा फायदा घेऊन सार्वजनिक संशोधन क्षेत्रातील संस्थांनी सरळ बीटी वाण तसेच संकरित वाण विकसित केले आहेत. लवकरच ते लागवडीसाठी शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत, ही आनंदाची बातमी आहे. पण बोंडअळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याने आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला असल्याने हे वाण कितपत यशस्वी होतील याबद्दल शंका आहे. असे सरळ बीटी वाण प्रतिरोधक ठरले आणि उत्पादनाच्या बाबतीत संकरित वाणांच्या जवळपास पोचले तर ती गोष्ट शेतकऱ्यांच्या दृष्टीने फारच फायद्याची होईल. या सरळ वाणांचे बियाणे संकरित बीटी वाणांच्या बियाण्याच्या तुलनेत एकदशांश ते एकपंचमांश किंमतीत उपलब्ध झाले पाहिजेत. कारण सरळ वाणांच्या बियाण्याचा उत्पादन खर्च कमी येतो. यांत्रिकीकरणास सुलभ वाणांची गरज सध्या मजुरांना मोठे बोंड वेचण्याची सवय झाली आहे. लहान बोंड वेचण्यास ते नाखूष असतात. कापूस वेचणीची मजुरीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे मोठी बोंडे असलेले वाण हवेत. मजुरांची कापूस वेचणीची क्षमता वाढविण्यासाठी लहान यंत्रांचा विकास झाला पाहिजे. ट्रॅक्‍टरचलित कापूस वेचणी यंत्रांसाठी एकाच वेळी सर्व बोंडे उमलतील, असे वाण विकसित करावे लागतील. आपल्याकडील बेभरवशाच्या हवामानाला असे वाण कितपत योग्य होतील, ते पहावे लागेल. बीटी नांदेड - ४४ होईल यशस्वी नांदेड - ४४ हा संकरित वाण कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरला होता कारण या वाणाच्या झाडांना पाऊसमानाप्रमाणे दोन (किंवा अधिक) वेळा फुलांचा बहर येत असल्याने चांगले उत्पन्न मिळत होते. बीटी नांदेड-४४ संकरित वाण यशस्वी होऊ शकतो, परंतु बोंड लहान असल्याने वेचण्याची मजुरी वाढेल. सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन संस्थांनी स्वतःच कीटक प्रतिरोधक जनुक शोधून काढण्यावर भर दिला पाहिजे. एकात्मिक कीड नियंत्रणाकडेही हवे लक्ष संकरित बीटी वाणांच्या प्रसारात गेल्या १५ वर्षांत एकात्मिक कीड नियंत्रण/ व्यवस्थापन या बहुमूल्य तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा अवास्तव वापर केला आणि आजची परिस्थिती ओढवून घेतली. या तंत्रज्ञानाकडेही पुनः लक्ष केंद्रित केले पाहिजे. डॉ. योगेंद्र नेरकर ः ७७०९५६८८१९ (लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com