agriculture stories in marathi agrowon special article on bt failure | Agrowon

दिशाभूल करणाऱ्या प्रचाराचे बळी
विजय जावंधिया
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

गेल्या वर्षी बीटी कापसावर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने उत्पादनात मोठी घट आढळून आली. या वर्षी तर सुरवातीपासूनच या अळीने कापसाला विळखा घालायला सुरवात केलीय. या पार्श्‍वभूमीवर २००१ मध्ये मोन्सॅन्टो महिकोच्या वर्धा जिल्ह्यातील प्रात्यक्षिक प्लॉटला भेट दिल्यानंतर मी जे पत्रक प्रकाशित केले होते, ते इथे देत आहे.
 

आज देशात जवळपास ९८ टक्के बीटी कापूसच आहे. हे सर्व बियाणे संकरित आहे, म्हणून दरवर्षी कापूस बियाणे विकत घ्यावे लागते. ज्या शेतकऱ्यांचा जन्म १९९०-९५ च्या दरम्यान झालेला आहे, त्यांना बीटी तंत्रज्ञानाचा देशात प्रवेश कसा झाला व त्या काळात माझ्यासारखे कार्यकर्ते जो प्रश्‍न उपस्थित करीत होते, तो प्रश्‍न आज गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने पुन्हा चर्चेत आला आहे. या लेखात २००१ मध्ये मोन्सॅन्टो महिकोच्या वर्धा जिल्ह्यातील प्रात्यक्षिक प्लॉटला भेट दिल्यानंतर मी जे पत्रक प्रकाशित केले होते, ते इथे देत आहे. 

७ नोव्हेंबर २००१ ला लिहिलेले हे पत्रक आहे. यंदा कापसावरील बोंड अळीने शेतकरी त्रस्त आहेत. याचा फायदा घेऊन बहुराष्ट्रीय मोन्सॅन्टो कंपनी कापसाचे नवीन बियाणे बीटी कॉटन शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत आहे. वर्धा जिल्ह्यात मोन्सॅन्टो महिको कंपनीने या बीटी बियाण्यामध्ये सात ठिकाणी प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड केली आहे. परंतु बोंड अळीने या बीटी कॉटनचे बारा वाजविले असल्यामुळे या प्रयोगाचा ‘शेतकरी दिन’ साजरा करून गाजावाजा करण्यात येत नाही, ही वास्तविकता आहे.
गुजरात राज्यात नवभारत सीड कंपनीने सुमारे १२ हजार एकरात बीटी कॉटनचे बियाणे गैर कायदेशीर पद्धतीने विकले आहे. या बियाण्यांच्या कापसाच्या झाडावर कीटकनाशक फवारण्याची गरजच नाही, असाही प्रचार करण्यात येत आहे. बीटी कापूस बियाण्याला कीटकनाशक कंपन्यांचा विरोध आहे, असाही प्रचार खासगी दूरचित्रवाहिण्यावरून करण्यात येत आहे. हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा दिशाभूल करणारा प्रचार देशासाठीही घातक आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील शेतकरी, यांच्या सिंचित शेतातील बीटी कापसाच्या प्रात्यक्षिक क्षेत्रात बोंड अळीने बीटी कापूस फस्त केला आहे, हा या तंत्रज्ञानाच्या अपयशाचा स्पष्ट पुरावाच आहे. खुद्द कंपनीने या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अळ्यांचा हल्ला असल्यास कीटकनाशकांच्या फवारणीची सूचना दिली होती. या कापसावर फवारणीही करण्यात आली, पण अळींचे नियंत्रण झाले नाही. प्रत्यक्ष पाहणी करताना झाडावर १० बोंडेसुद्धा नाहीत.

या शेतकऱ्याला याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, आजची कापूस पिकाची परिस्थिती पाहता समाधान होत नाही. या बियाण्यांची किंमत काय? या प्रश्‍नाचे उत्तर होते, कंपनीने फुकट दिले आहे, पण त्या शेतकऱ्यांचे म्हणणे असे होते की, बीटी कापूस बियाण्याची किंमत पारंपरिक बियाण्यांपेक्षा १०० रुपयांपर्यंत जास्त राहिली तरच शेतकरी या बियाण्यांचा वापर करण्याचा विचार करू शकेल. परंतु १००० ते १२०० रुपये प्रती ४५० ग्रॅम ही किंमत राहिली तर तो हे बियाणे वापरणार नाही. मी त्यांना विचारले, असे का म्हणता? त्यावर त्यांचे उत्तर होते, बियाण्यांची पण जास्त किंमत द्यायची व कीटकनाशकाची फवारणीही करावयाची, हे त्याला न परवडणारे आहे.

बीटी कापूस लावल्यानंतर कापसाला १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर शेती नफ्याची होईल का? त्यांचे म्हणणे होते की १६०० ते १७०० रुपये भाव परवडणारा नाही. कंपनीने त्यांना जे प्रचार साहित्य दिले आहे, त्यात स्पष्ट लिहिले आहे की, आठवड्यात दोन दिवस सकाळी शेतात फिरावे. २० झाडे इकडून तिकडून (रॅंडम) निवडावी व २० झाडांवर २० अळ्या सापडल्या तर कीटकनाशकाची फवारणी करण्याची गरज आहे, असे समजावे. मावा-तुडतुडे यासाठीही फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी आवश्‍यक आहे. या प्रचार साहित्याची माहिती खासगी दूरचित्रवाहिन्या का सांगत नाही, हा खरा प्रश्‍न आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कोणाकोणाला विकत घेतले? हा संशोधनाचा विषय आहे. भारत सरकारने अजून या बियाण्यांना मान्यता दिलेली नाही. मग गुजरातमध्ये व देशाच्या इतर भागात चोरून बियाणे विकणाऱ्यांवर काय कार्यवाही होणार? भारत सरकारने गुजरात सरकारला १२ हजार एकरावरील कापूस पीक जाळून टाकण्याचे आदेश दिले आहे. गुजरात सरकारने हे शक्‍य नाही असे म्हटले आहे. गुजरातचा कापूस जाळायचा तर वर्धेतील या प्रात्यक्षिक शेताचे काय करायचे? जिल्ह्यात सात ठिकाणी कापूस पेरणी करण्यात आली आहे, त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला आहे का? या ठिकाणाची नावे का जाहीर करण्यात येत नाही? असे प्रश्‍न उपस्थित होतात.
महिको मोन्सॅन्टोच्या या प्रात्यक्षिक शेतात बीटी कापसाच्या झाडावर १० बोंडेसुद्धा नाहीत, पण याच परिसरात काही शेतात पारंपरिक कापसाची शेतं आहेत व तिथे झाडांवर ३० ते ४० बोंडे आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर बीटी कापूस बियाण्यांच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. उत्पादन वाढविणे म्हणजे नफा वाढविणे नाही, हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. संकरीत कापसामुळे उत्पादन वाढले, पण नफा वाढला नाही. मागच्या वर्षी (१९९९-२०००) कमी फवारे करून कापूस उत्पादन चांगले झाले होते. यंदा बोंड अळीने बीटी कापूस पिकाचे बारा वाजविले. बीटी कापसाच्या शेतीत फवारण्याची गरज नाही या बनवाबनवीच्या प्रचारापासून सावध राहावे. या विषयावर महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने खुली चर्चाही आयोजित करावी. 

भारत सरकारने २००२ मध्ये या तंत्रज्ञानाला परवानगी दिली त्या वेळेस ४५० ग्रॅम बियाण्यांच्या पॅकेटची किंमत १६५० रुपये ठेवण्यात आली होती व कंपन्यांचा प्रचार होता की एका एकरात एक पॅकेटच बियाणे पुरेल. नंतर आंध्र प्रदेशची एक महिला अधिकारी कोर्टात गेली होती. कोर्टाच्या माध्यमातून बियाण्यांच्या किमती ९५० रुपये प्रतिपॅकेट करण्याचे आदेश दिले गेले. कंपन्या दोन पॅकेट प्रति एकर बियाणे वापरण्याचा प्रचार करू लागल्या. आज शेतकरी एकरी २ ते ३ बीटी बियाण्याचे पॅकेट वापरतात. महाराष्ट्रात १.५ ते २ कोटी पॅकेट बियाणे वापरले जाते. आजही सर्व बियाणे गुजरात-आंध्र प्रदेशमधून येत आहेत. महाराष्ट्रात १० टक्केही बियाण्यांचे उत्पादन होत नाही. राज्यातील एकूण कापूस उत्पादन सरासरी २.५ कोटी ते ३.५ कोटी क्विंटलच आहे म्हणजेच प्रति पॅकेट २ ते ३ क्विंटल. या १५ वर्षात रासायनिक खते, तणनाशके, कीटकनाशकांचा वापर किती वाढला याचा अभ्यास केला तर कर्जबाजारीपणा का वाढला, याचे उत्तर मिळेल.                         

विजय जावंधिया ः ९४२१७२७९९८
(लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...