Agriculture stories in Marathi, agrowon special article on chemical farming and human health | Agrowon

रासायनिक शेती आणि मानवी आरोग्य
प्र. र. चिपळूणकर
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017
एखादे पीक घेत असताना जसे तुमच्यासाठी काही उत्पादन केले जाते तसे जमीन व त्यातील सूक्ष्मजीवासाठीही निसर्गात उत्पादन होतच असते. आपण त्यांचा भाग जमिनीला परत दिल्यास जमिनीची सुपीकता खालावतेय, हा प्रश्‍नच संपून जातो.

हा लेख लिहिण्यामागे मुख्य उद्देश असा आहे, की १९९०-२००० दरम्यान हरितक्रांती बदनाम होण्यामागे फक्त रसायनांना दोष दिला जातो हे कितपत योग्य आहे. यावर सेंद्रिय शेती हा योग्य पर्याय होऊ शकतो का? या सर्वामागे पायाभूत विज्ञान आहे, त्याचा अभ्यास न करता एक हत्ती व सात आंधळ्यांच्या गोष्टी प्रमाणे प्रत्येक जण आपले मत मांडत आहे.

कोणतेही पीक वाढण्यासाठी त्याचे पोषण जमिनीतील सूक्ष्मजीवांमार्फत केले जाते. या कामापोटी सूक्ष्मजीव जे काम करतात त्यासाठी त्यांची शरीरवाढ व प्रजोत्पादन या कामासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा वापर केला जातो. यानुसार एखादे पीक घेणे म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब संपविणे, उत्पादन जास्त मिळविणे अगर दीर्घ मुदतीची अगर बहुवार्षिक पिके घेत असता जास्त जास्त सेंद्रिय कर्ब संपतो. जुन्या कमी उत्पादन देणाऱ्या जाती लावल्यास सेंद्रिय कर्ब कमी संपतो. एखाद्या पिकाच्या काढणीनंतर जितका सेंद्रिय कर्ब आपण वापरून संपविला त्यापेक्षा थोडा जास्तच जमिनीला परत दिल्यासच जमिनीची सुपीकता टिकून राहू शकते. अनेक कारणामुळे आता आपण गरजेइतका सेंद्रिय कर्ब परत देऊ शकत नाही.

डॉ. एफ. जे. स्टिव्हन्सन आपल्या ‘ह्युमस केमेस्ट्री’ या पुस्तकात लिहितात की शेतकऱ्याने सेंद्रिय कर्ब वापराकडे दुर्लक्ष केले तरी मूळ जमिनीमध्ये असणाऱ्या सेंद्रिय कर्बाचे जिवावर जमीन तुम्हाला २०-२५ वर्षे उत्तम पीक देऊ शकते. त्यानंतर उत्पादकतेचे प्रश्‍न निर्माण होतात. या संदर्भानुसार ज्या ज्या ठिकाणी हरितक्रांती झाली त्या त्या ठिकाणी २०-२५ वर्षांनंतर उत्पादकतेचे प्रश्‍न निर्माण होऊन ती बदनाम झाली. दुसरा कोणताच सक्षम पर्याय पुढे नसल्याने यातून शेती रेटणे चालू आहे. या अभ्यासातून माझे स्पष्ट मत आहे की जमिनीची सुपीकता व उत्पादकतेचे प्रश्‍न निर्माण होण्यामागे रसायनांचा वापर हा मुळातच दोष नसून चुकीचे सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन हा दोष आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर गेले २५ वर्षे सेंद्रिय खत व्यवस्थापन या विषयावर काम करीत आहे. यावर माझी मते प्रचलित मतापेक्षा खूप वेगळी आहेत.

पशुपालनातून सेंद्रिय खत व्यवस्थापन हा विषय कालबाह्य झाला आहे. (माझे वैयक्तिक मत सर्वांनी सहत व्हावे असा आग्रह नाही.) एखादे पीक घेत असताना जसे तुमच्यासाठी काही उत्पादन केले जाते तसे जमीन व त्यातील सूक्ष्मजीवासाठीही निसर्गात उत्पादन होतच असते. आपण त्यांचा भाग जमिनीला परत दिल्यास जमिनीची सुपीकता खालावतेय, हा प्रश्‍नच संपून जातो. किमान जमीन न नांगरता शेती करावयास शिका. मागील पिकांचे अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत. दोन पिकांच्या ओळीत युक्तीने तणे वाढवा व जशी आहेत तशीच तणनाशकानेच मारा. आपली सेंद्रिय खत व्यवस्थापनाची गाडी अजून २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले खत वापरा इथेच अडकून पडली आहे.

कालानुरूप शेती करण्याच्या पद्धतीत जे बदल करणे गरजेचे आहे त्यावर अभ्यास न करता जुने ते सोने यातच आपण जास्त रममाण झालो आहोत. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे कार्य शेतकऱ्यांना समजून सांगणे गरजेचे आहे. सुपीकता कमी झाली म्हणजे नेमके काय झाले? व परत मूळ पदावर जमीन नेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे? बिना नांगरणी व तण व्यवस्थापनातून मी बिघडलेली जमीन दुरुस्त केली व आता ती ५०-६० वर्षांपूर्वी पिकत होती तशी त्यावेळेपेक्षा कमी खर्चात पिकत आहे. मी सर्व रसायनांचा गरजेप्रमाणे वापर करतो. उत्पादन चांगले घेतो. उत्पादनाचा दर्जा अतिउत्तम असतो, असे ग्राहकांचे मत आहे.

आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होण्यामागे फक्त रासायनिक शेतीतील अन्नाचे सेवन हेच एकमेव कारण आहे का? इथे एकात्मिक विचार होणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न असा आहे मानवी स्नायुंच्या ताकदीवर यापूर्वी जीवनावश्‍यक बहुतेक कामे होत होती. शहाण्या माणसाने बुद्धिचातुर्याने प्रत्येक कष्टाचे कामासाठी यंत्राचा शोध लावला. पूर्वीपेक्षा आर्थिक स्तर उंचावल्यानंतर घरातील कष्टाची कामे मोलकरणींना दिली. शहरवासीयांना शुद्ध हवा शुद्ध पाणी मिळणे अवघड. मुलामध्ये बाजारी पदार्थ खाण्याकडे जास्त कल, बेकरीपुढे सायंकाळी होणारी गर्दी, मुलांना खेळण्या बागडण्यास जागाच नाही. दूरदर्शन व मोबाईलवरील खेळ ही करमणुकीची साधने! ही यादी खूप वाढविता येते. हा जीवन पद्धतीतील बदल सर्व आरोग्यदायी आहे का? आरोग्याचा दोष फक्त रासायनिक शेतीतील उत्पादनांना देणे चूक की बरोबर आपणच ठरवावे. फक्त सेंद्रिय शेतीतील अन्न खाऊन आरोग्य मिळणार असते तर आरोग्य हे बाजारातून पैसे टाकून खरेदी करून आणण्याची गोष्ट झाली असती. वास्तवात असे नाही आरोग्य बाजारातून विकत आणण्याची बाब नाही. आरोग्य फुकट मिळत नाही. ती एक कष्ट साध्य गोष्ट आहे.

याबाबत इतर जनांच्या तुलनेत आम्ही शेतकरी नशिबवान आहोत. शुद्ध हवा, पाणी, व्यवसायातून आपोआप होणारे कष्ट, योग्य वेळी भूक लागणे, भूक लागली म्हणून खाणे, वेळ झाली म्हणून खाणे नाही. अपवाद वगळता रात्री शांत झोप. मित्रांनो तुलनात्मक पैसा कमी मिळणे व सतत नैसर्गिक आपत्तींशी संघर्ष करावा लागणे हे आपल्या पाचवीलाच पुजले आहे. हेच दुःख सतत उगाळत बसला तर सुख आपल्याला कधीच भेटणार नाही. हरितक्रांतीत काय दोष होते ते हरितक्रांती केल्याशिवाय सापडणार नाहीत. ते दोष दूर केल्यास हरितक्रांतीची मधूर फळे कायमस्वरुपी चाखता येतील. नॉर्मन बोरलॉग अगर स्वामिनाथन यांना आरोपी करून आपले प्रश्‍न सुटणार नाहीत. विज्ञानात सर्वांसाठी उत्तरे आहेत, शोधा म्हणजे सापडतील!
प्र. र. चिपळूणकर ः ८२७५४५००८८
(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

इतर संपादकीय
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
फूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...
शेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...
नदीजोड ः संकल्पना की प्रकल्परखडलेले प्रकल्प ः असंख्य प्रकल्प इतके रखडले आहेत...
‘ई-नाम’ कशी होईल गतिमान?प्र चलित बाजार व्यवस्थेतील कुप्रथा, लूट,...
‘ट्रेलर’चा उत्तरार्धही फसवाआमच्या शासन काळात भ्रष्टाचार दूर झाला, महागाई कमी...
आयातीने कोलमडले काजू शेतीचे अर्थकारण२०२२ अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
भ्रष्ट आणि निगरगट्टकृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण विभागात राजरोस...
सेंद्रिय शेतीस मिळेल बळखरे तर सेंद्रिय शेती ही आपली पारंपरिक कृषी पद्धती...
हमीभावाची सदोष पद्धती आणि कार्यप्रणाली हमीभाव जाहीर करण्याची प्रक्रिया...