मातीच्या घनीकरणाने घटते उत्पादन

जमिनीमध्ये घनीकरणाची प्रक्रिया हळूहळू आणि नकळत होते. नेहमीइतकेच पाणी, भरपूर खते देऊनही उत्पादन वाढत नाही हे पाहिल्यावर मातीचे निरीक्षण केले जाते आणि तेव्हा पिकांची आडवी पसरलेली मुळे दिसतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे लक्षात आल्यानंतरही शेतीच्या पद्धतींमध्ये बदल केले जात नाहीत.
संपादकीय
संपादकीय

जमीन खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण   म्हणजे मातीचे घनीकरण. नांगरट केल्याने मातीची उलथापालथ होऊन जमीन खराब होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तितकाच दोष ट्रॅक्‍टर किंवा मशागतीच्या इतर यंत्रांच्या वजनाचा आहे. या वजनामुळे मातीवर अतिरिक्त दाब पडून मातीचे घनीकरण होते म्हणजे नक्की काय होते, तर मातीची रचना बदलते आणि तिच्यामध्ये पाणी आणि हवा जाण्यासाठीची छिद्रे कमी होतात. त्यामुळे मुळे मातीत शिरण्यालाही विरोध निर्माण होतो. जमिनीमध्ये ही घनीकरणाची प्रक्रिया हळूहळू आणि नकळत होते त्यामुळे ती शेतकऱ्यांच्या लवकर लक्षात येत नाही. नेहमीइतकेच पाणी, भरपूर खते देऊनही उत्पादन वाढत नाही, हे पाहिल्यावर मग मातीचे निरीक्षण केले जाते आणि तेव्हा पिकांची आडवी पसरलेली मुळे दिसतात.(वरील छायाचित्र पाहा) पण याहून अधिक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे लक्षात आल्यानंतरही त्याला महत्त्व देऊन शेतीच्या पद्धतींमध्ये बदल केले जात नाहीत. नांगरलेल्या शेतात कापणी-मळणी यंत्राच्या पहिल्याच फेरीत मातीचे ७०-८० टक्के घनीकरण होते. त्यामुळे उत्पादन ५० टक्के पर्यंत कमी होऊ शकते. मातीमध्ये हवा खेळती न राहणे, मुळांना आत शिरायला जागा नसणे, पाण्याचा अंतर्गत निचरा कमी होणे या सर्वांमुळे उत्पादनात मोठी घट होते. घनीकरणामुळे मातीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाणही घटते. परिणामी जैविक पदार्थांचे प्रमाण कमी होऊन वनस्पतींना पोषक द्रव्यांची कमतरता भासते. मातीचा ५० टक्के भाग हा स्थायू असून वाळू, गाळ, सेंद्रीय पदार्थ यांनी बनलेला असतो तर ५० टक्के जागा ही छिद्रांनी व्यापलेली असते. छिद्रांमधील निम्म्या जागेत पाणी साठलेले असते तर उरलेली जागा हवेने भरलेली असते. घनीकरणामुळे मातीची नैसर्गिक रचना बदलते. मातीचे कण एकमेकांच्या खूप जवळ आल्याने मातीत पाणी शोषले जात नाही, त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी साठून राहते किंवा ते उताराने वाहून जमिनीत घळी तयार होतात आणि पाणी वाया जाते. घनीकरणामुळे पृष्ठभागावरील मातीचे पोपडे बनतात आणि बी उगवायलाही त्रास होतो. मातीच्या शुष्क वजनाला मातीच्या आकारमानाने भागले की ग्रॅम/ घन सें.मी. मध्ये मातीची घनता मिळते. निरोगी मातीची साधारण घनता १.३ ते १.४ ग्रॅम/ घन सें.मी. असते. वालुकामय जमिनींमध्ये ती १.४ ते १.६ इतकी असते. जर मातीची घनता १.६ ग्रॅम/ घन सें.मी. पेक्षा जास्त असेल तर तिच्यात मुळे शिरू शकत नाहीत. ट्रॅक्‍टर, पेरणी यंत्र, कापणी यंत्र या सर्व जड यंत्रांचा मातीवर, विशेषतः आर्द्र मातीवर वाईट परिणाम होतो. जड यंत्रांमुळे ओल्या मातीचे ६० सें.मी. खोलीपर्यंत घनीकरण झालेले दिसते. यासाठी बरेच उपाय सुचवले जातात. उदा. मशागत करण्यापूर्वी माती कोरडी व्हायची वाट बघायला हवी, यंत्राचे वजन १० टनाच्या खाली असावे (कापणी - मळणी यंत्राचे वजन १५ टन असते), तसेच यंत्राला शक्‍य तितकी जास्त चाके असावीत कारण जास्त चाके असली तर वजनाचे विभाजन अधिक क्षेत्रफळावर होते, टायरमध्ये जास्त हवा भरू नये, एकाच जागेवरून यंत्र पुन्हा पुन्हा नेऊ नये, इ. शिवाय शेतकऱ्यांमध्ये असलेला एक मोठा गैरसमज म्हणजे घनीकरण झाले असेल तर ते खोल नांगरटीमुळे दुरुस्त होईल, माती मोकळी होईल. पण होते उलटेच. खोल नांगरटीमुळे जास्त घनीकरण होते आणि ढेकळे तयार होतात. त्यामुळे हवा खेळती राहण्याचे प्रमाण कमी होते. पण मुळात प्रश्‍न आहे की शेत नांगरायचेच कशाला? तणांचा बंदोबस्त करण्याच्या इतर पद्धती आहेत. त्यातील एक उत्तम पद्धत म्हणजे कव्हर क्रॉप्स (आच्छादन किंवा आवरण पिके), म्हणजे पिकांच्या आधी, नंतर किंवा बरोबर दुसरी पिके घेणे. घनीकरण झालेली जमीन दुरुस्त करायला काय उपाय आहेत? तर त्या जमिनीत काहीही करायचे नाही. मग काही वर्षांनी हळूहळू जमीन सुधारेल. पण मध्येच जर परत ट्रॅक्‍टर वापरला तर पुन्हा जैसे थे परिस्थिती होणार. बैलांच्या मदतीने जमीन कुळवलेली मात्र चालेल. मातीचे घनीकरण टाळण्याआठी नो टिल किंवा शून्य मशागत हेच उत्तर आहे. कारण माती हलवणे ही जमिनीसाठी सर्वात वाईट गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जमीन कधीच मोकळी ठेवू नये. कारण पावसाचे थेंब किंवा धारा जोरात आपटूनही घनीकरण होते. त्यामुळे पीक काढल्यावर त्याचे बुडखे व इतर अवशेष तसेच ठेवावेत. पेरणी पद्धतीमध्येही थोडा बदल केला तर पीक अधिक जोमाने येईल. आपण पेरणी केल्यावर माती मोकळी ठेवतो, ती दाबत नाही त्यामुळे मातीचे पृष्ठभागाचे पोपडे पडतात. अर्थात हा दाब हलका असावा. पेरणी केल्यावर मातीवर हलका दाब दिला की बिया चांगल्या प्रकारे रुजतात आणि मातीतील आर्द्रताही टिकून राहते. पेरणी यंत्रात प्रेस व्हील्स (दाबचाके) असतील तर उत्तम परिणाम साधला जातो किंवा रोलिंग ड्रम सीडर (घरंगळणारे पेरणी यंत्र) चाही वापर करता येईल. संशोधनातून पुन्हा पुन्हा असे दिसून येत आहे की शेतीच्या आतापर्यंत झालेल्या आणि या पुढेही होणाऱ्या नुकसानीचे मुख्य कारण म्हणजे ट्रॅक्‍टर. मोठे ट्रॅक्‍टर वापरून जोरात खोल नांगरट करणे ही वाईट सवय आहे. आपल्या इथे शेतकरी आता लहान ट्रॅक्‍टर घेऊ लागले आहेत. त्यांचे वजन कमी असल्याने ते तुलनेने बरे. पण एक लक्षात घ्यायला हवे की भारत वगळता इतर देशांमध्ये सर्व प्रकारच्या ट्रॅक्‍टरचा वापर झपाट्याने कमी होतो आहे. बॉन निंबकर : ०२१६६- २६२१०६ (लेखक निंबकर कृषी संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com