काँग्रेस नेतृत्वासाठी कसोटीचा काळ

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊन पराभवाने खचलेल्या पक्षाला हतोत्साहित करून टाकले. हे लढवय्या नेत्याचे लक्षण नव्हे. पराभव पचविण्यासाठी धैर्य लागते आणि त्यातूनच नेतृत्वाची कसोटी लागते.
संपादकीय
संपादकीय

घराणेशाहीचे आरोप व प्रचार, पक्षाचे निष्क्रिय प्रादेशिक नेते, साधनसंपत्तीची कमतरता अशा अनेक अडचणींना काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत तोंड द्यावे लागले. सर्वांत मोठा घटक होता तो पराभूत मनोवृत्तीचे प्रादेशिक नेते आणि उमेदवारांचा ! त्यामुळेच शक्‍य असलेल्या ठिकाणीदेखील काँग्रेसने ‘जिंकण्यासाठी लढण्याची’ वृत्ती दाखवली नाही. परिणामी, पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात काँग्रेसला नेते आहेत की नाहीत आणि काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत की नाहीत, अशी शंका यावी इतकी पराकोटीची उदासीनता व निष्क्रियता दिसून आली. याबाबतचा अहवाल पक्षाकडे आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार नव्हते, पण हा पक्ष सत्तेत असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथेही फारशी वेगळी स्थिती नव्हती. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी या वेळी प्रचारात जीव ओतला होता, याबद्दल पक्षात तरी एकमत आहे. प्रियांका गांधी यांनीही त्यांच्या परीने त्यांना साथ दिली. परंतु, अन्य नेत्यांचे काय? पराभव झाल्यानंतर पक्षातल्याच अनेकांनी ‘नेतृत्व कुटुंबाबाहेर जाऊ द्यात, हल्ली लोकांना घराणेशाही पटत नाही व त्यामुळेच त्यांचा कल नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याकडे राहतो,’ असे बोलण्यास सुरवात केली. परिणामी, राहुल गांधी यांनी सरळ राजीनामा देऊन टाकला आणि कुटुंबाबाहेरच्या कोणालाही अध्यक्ष करावे, असे सांगितले. काँग्रेस कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा नामंजूर केलेला असला, तरी राहुल त्यावर ठाम आहेत. दरम्यान, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख म्हणून सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. 

सध्या काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या पेचप्रसंगाला अनेक पैलू आहेत. घराणेशाहीच्या शापाने हा पक्ष ग्रस्त आहे, हा सर्वांत मोठा आरोप. मुळात भारतात या शापाचा प्रादुर्भाव झालेले जवळपास सर्व पक्ष आहेत. अपवाद मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मानता येईल. ओडिशात नवीन पटनाईक पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या पक्षाच्या नावातच घराणेशाही आहे. त्यांचे वडील बिजू पटनाईक यांच्या नावानेच ‘बिजू जनता दल’ स्थापन झाले. म्हणजेच ओडिशामध्ये आता पाचव्यांदा घराणेशाही विजयी झाली, असे म्हणावे लागेल. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री होते. ते एन. टी. रामाराव यांचे जावई. त्यांना पराभूत करणारे जगनमोहन रेड्डी. अखंड आंध्र प्रदेशाचे दोन वेळा मुख्यमंत्री झालेले वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे ते पुत्र. काँग्रेसने ‘वायएसआर’ यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर जगनमोहन यांना तत्काळ मुख्यमंत्री न केल्याने नाराज होऊन त्यांनी वडिलांच्या नावे वायएसआर काँग्रेस पक्ष काढला. तेलुगू देशमच्या विरोधात संघर्ष करून ते आता मुख्यमंत्री झाले आहेत. याला एका घराणेशाहीकडून दुसऱ्या घराणेशाहीचा पाडाव, असे म्हणायचे काय? स्वतःला जयप्रकाश नारायण, लोहिया यांचे अनुयायी मानणारे रामविलास पासवान. त्यांनी बिहारमध्ये सहा जागा जिंकल्या. त्यामध्ये त्यांचे दोन भाऊ व मुलगा यांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्षाचा आणखी एक मित्रपक्ष शिवसेना. त्यात घराणेशाही नाही, असे कोण म्हणेल? सत्तारूढ आघाडीतील शिरोमणी अकाली दल. या निवडणुकीत या पक्षाचे अध्यक्ष सुखबीर बादल आणि त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर हे दोघेच निवडून आले. प्रकाशसिंग बादल यांचे पुत्र सुखबीर आणि सूनबाई हरसिमरत कौर. हरसिमरत आता पुन्हा केंद्रीय मंत्री झाल्या आहेत. रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, पीयूष गोयल, राव इंद्रजितसिंह या केंद्रीय मंत्र्यांवरदेखील घराणेशाहीचा शिक्का आहे. अनेक प्रादेशिक पक्षही याच धर्तीवर चालतात. त्यामुळे भारतीय राजकारणाला हा शाप आहे, असे म्हणणे ही शुद्ध फसवणूक आहे.

राहुल गांधी यांनी ते उपाध्यक्ष होते, तेव्हा काही मोजक्‍या पत्रकारांजवळ अनौपचारिकपणे बोलताना सूचक विधान केले होते. ‘गांधी कुटुंब आणि सत्ता यांच्यातले नाते मला संपवायचे आहे,’ असे ते बोलून गेले होते. त्याचा खुलासा करताना ते म्हणाले होते, ‘गांधी कुटुंबाला सत्ता हवी असते, अशी एक समजूत सार्वत्रिक आहे. ती समजूत दूर करण्याची गरज आहे.’ राहुल गांधी हे त्या मार्गाने जाऊ इच्छितात काय, याचे उत्तर आगामी काळच देईल. राहुल गांधी कार्यकारिणीच्या बैठकीत चिडले होते, ते या कारणामुळे नव्हे! त्यांनी नेता या नात्याने केलेल्या प्रचाराचा प्रादेशिक व स्थानिक पातळीवरील नेत्यांनी करावयाचा पाठपुरावा केला गेला नाही, याचा त्यांना राग आला होता. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड येथे काँग्रेसची सरकारे असताना तेथील नेतृत्वाने दाखविलेल्या निष्क्रियतेने राहुल गांधी खवळले होते. राजस्थानात काँग्रेसच्या किमान पाच- सहा जागा येतील, अशी स्थिती होती. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातला सुप्त संघर्ष आणि गेहलोत यांनी प्रचाराबाबत किंवा उमेदवारांना साधनसंपत्ती पुरविण्याबाबत दाखविलेली उदासीनता पक्षाला नडली. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे दिल्लीला फोन येत असत की अमुक जागा निघू शकते, पण थोडा पैशाचा जोर लावण्याची आवश्‍यकता आहे आणि मुख्यमंत्र्यांना जरा फिरायला सांगा. पण, हे महाशय हलायचे नाव घेईनात. परिणामी, भाजपने २५ जागा जिंकण्याचा दुसरा विक्रम केला. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ हे स्वतःला अतिशय मुरब्बी मानतात. परंतु, त्यांचा मुरब्बीपणा त्यांच्या छिंदवाडा मतदारसंघापलीकडे नसल्याचे आणि नेते व मुख्यमंत्री म्हणून ते पूर्णतः अपयशी ठरल्याचे या निवडणुकीने सिद्ध केले. कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला किमान पाच- सहा जागा जिंकणे अवघड नसते. परंतु, गेहलोत व कमलनाथ या दोघांनी काँग्रेसचे बारा वाजवले.

छत्तीसगडमध्येदेखील साधनसंपत्तीत कमी पडल्याचा फटका काँग्रेसला बसला. राहुल गांधी यांनी त्यांची नाराजी व्यक्त करताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्साहाने केलेल्या कामाची माहिती या नेत्यांना दिली. कार्यकर्ते दिल्लीला फोन करीत राहिले, पण तुम्ही त्यांना उपलब्ध झाला नाहीत, याबद्दल कानउघाडणी केली. राहुल गांधी यांचा राग वाजवी असला, तरी पक्षाला वाऱ्यावर सोडणे हा पोरकटपणा झाला. त्याऐवजी पोक्त व भारदस्तपणे पराभवाची जबाबदारी घेऊन व त्याची मीमांसा करणे व त्यानुसार आवश्‍यक दुरुस्त्या करणे याला नेतृत्व म्हणतात. कदाचित राहुल गांधी त्या मार्गाने जात असावेत. ती उपरती त्यांना व्हावी!

अनंत बागाईतकर (लेखक सकाळच्या दिल्ली  न्यूज ब्यूरोचे प्रमुख आहेत.)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com