Agriculture stories in Marathi, agrowon special article on controlled use of insecticides | Agrowon

कीटकनाशकांचा वापर हवा नियंत्रितच
ड़ॉ. नागेश टेकाळे :
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

औषधे (मेडिसीन) विक्रीची दुकाने ज्या पद्धतीने डिजिटल केली आहेत, त्याच आधारावर कीटकनाशके विक्री करणारी दुकाने डिजिटल हवीत आणि शासनातर्फे त्यांची विक्री व साठा यांची मासिक नोंद घेण्यात यायला हवी.

दोनवर्षांपूर्वी पंजाबमधील ‘तरनतारन’ जिल्ह्यामध्ये मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या शेतकऱ्यांच्या हजारो तरुण मुलांबरोबर व्यसनमुक्तीचे काम करताना मी हटकून बाजूच्याच फरिदकोट जिल्ह्यासही भेट दिली. हे दोन्हीही जिल्हे पाकिस्तानाच्या सीमेलगतच आहेत. फरिदकोट आणि परिसरामधील गावांस भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील कापसाची शेती. पंजाबमध्ये गहू तांदळानंतर शेतकरी कपाशीचे उत्पन्न घेतात. भारतात उत्पन्न होणाऱ्या एकूण कपाशीपैकी दोनतृतीयांश उत्पादन पंजाबमध्ये होते. यामध्ये फरिदकोट जिल्हा तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे आघाडीवर आहे.

साठ-सत्तरच्या दशकात आपल्या देशात हरितक्रांती झाली आणि पंजाबमधील शेतकरी मालामाल झाला. बैठ्या घरांचे दोन मजली घरांत रूपांतर, दारात ट्रॅक्‍टर, मुलामुलींच्या लग्नावर ५-१० लाखाचा खर्च हे सर्व ऐंशीच्या दशकामध्येच पहावयास मिळाले. मेक्‍सिकन गव्हाचे वाण पंजाबच्या भूमिमध्ये रुजण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्याचे ठरले. त्यासाठी कालमर्यादा होती; पण येथील शेतकरी थांबवयास तयार नव्हता. डॉ. नॉर्मल बोरलॉग आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा कौशल्याने वापर करण्यास सांगितले; पण उपयोग झाला नाही. रासायनिक खते आणि पाण्याच्या अतिवापराने पिके हिरवे लुसलुशीत होतात. अशा पिकांकडे कीटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. त्यांना मारण्यासाठी पुढे कीटकनाशके आली. या चक्रात पंजाबची पूर्वीची ब्रेड बास्केट ही ओळख आता डिसिज बास्केट अशी झाली. पंजाबमध्ये ४०० फूट खोल पाण्यामध्ये सुद्धा आपणास रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे अंश आढळत आहेत. 

पंजाबमधील शेतकरी १९९५ पर्यंत देशी कापसाची निरोगी शेती करत होता. नद्या आणि धरणाचे मुबलक पाणी आणि रासायनिक खते यामुळे गव्हाच्या बरोबरीने कापसाने सुद्धा पंजाबच्या शेतकऱ्यांना श्रीमंत केले. त्याला सोन्याची किंमत मिळू लागली. कृषी जाणकार सांगतात, की फरिदकोट जिल्ह्यामधील एका लहान गावच्या परिसरात अमेरिकन बोंड अळीने प्रथम प्रवेश केला. रासायनिक खतामध्ये गुंतून गेलेल्या शेतकऱ्यांनी सुरवातीस त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि १९९७-९८ मध्ये या किडीने चांगलेच बस्तान बसविले. परिणामी उत्पन्न कमी आणि प्रतवारीही घसरली. या जिल्ह्याचे कापूस लागवडीखाली क्षेत्र मोठे असल्यामुळे शासन दरबारी त्याची नोंद झाली. पंजाब कृषी विद्यापीठाने कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे धडे देण्यास सुरवात केली. या धड्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. 

२००४मध्ये येथे बीटी वाण आले. कीड आटोक्‍यात आली; पण उत्पन्न कमी म्हणून शेतकरी नाराज होऊ लागला. देशी वाणात गुंतलेला जीव हेसुद्धा नाराजीचे एक कारण होते. १९९७ ते २००४ या सात वर्षांत या जिल्ह्यामध्ये कापूस वाचविण्यासाठी कीटकनाशकांचा अतोनात वापर झाला. एकेकाळची आकाशातील आणि वृक्षावरील पक्षी श्रीमंती नष्ट झाली. समाजसेवी संस्थांनी २००५ मध्ये केलेल्या आरोग्य तपासणीमध्ये अनेकांच्या रक्तात किटकनाशकांचे अंश आढळले. आज तेथील अनेक शेतकऱ्यांच्या घरात वाढत्या वयामधील मुलांमध्ये शारीरिक अपंगत्व आले आहे.

कीटकनाशकांच्या वापराबद्दल आता तेथे मोठ्या प्रमाणावर जनजागृती चालू आहे; पण छोट्या मुलामधील अपंगत्व तर आता जन्मभर पुरणारच ना! 
पंजाबमधील कपाशी आणि कीटकनाशके यांचा १९९७ ते २००५ हा कालखंड अभ्यासताना आपण आंध्र प्रदेशामधील वरंगळ जिल्ह्यामधील २००१ मध्ये केवळ कापसावरील कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू पावलेल्या ५०० शेतकरी आणि शेतमजुरांना विसरू शकत नाहीत. जे १००० लोक वाचले ते सुदैवीच. त्या वेळी तेथे हिरव्या आणि गुलाबी बोंड अळीने हाहाकार माजवला होता. हातातोंडाशी आलेली कपाशीचे उत्पन्न हातातून जाते, की काय या भीतीने शेतकरी सैरभैर झाला. अनेक कीटकनाशके मुबलक प्रमाणात फवारण्यात आली. त्यापैकी एंडोसल्फान जास्त घातक ठरले.

आज या कीटकनाशकावर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली असली तरी त्याच्याएवढेच इतर जहाल आणि घातक कीटकनाशके शेतकरी सहज हाताळताना दिसतात. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे झालेले मृत्यू, कारणे, उपाय यांवरचा एक संपूर्ण अहवाल आजही आंध्र प्रदेश कृषी खात्याकडे उपलब्ध आहे. डोळ्यांची जळजळ होणे, नाकातून रक्तस्राव, डोळे जड होणे, चक्कर येणे, उलट्या होणे ही लक्षणे फवारणी करणाऱ्यांमध्ये प्रत्यक्षदर्शनी आढळून आली आहेत. या अहवालात शेतकऱ्यांना फवारणीस मदत करणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी करताना अनेकांना स्तनांचा कर्करोग, गर्भपात, वेदनादाई मासिक पाळी, प्रसूतीच्या वेळी रक्तस्राव, गरोदरपणासाठी विलंब होणे याचीही नोंद झाली आहे. 

पंजाबमधील अभ्यासामध्ये कीटकनाशके फवारणी करणाऱ्या स्त्री-पुरुषांना होणारी मुले जन्मताच कुठले तरी व्यंग घेऊन येतात, असेही आढळले आहे. कपाशीच्या एका पिकाला शेतकरी ३५ ते ४० वेळा फवारणी करतो. अशा प्रकारच्या फवारण्यांमधून किडींची प्रतिकारशक्तीही वाढत आहे. तिची प्रजोत्पादन क्षमताही वाढते आहे. 

बीटी कापसाची वाणं फक्त बोंडअळीस प्रतिकारक आहेत. यावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. अलीकडे गुलाबी बोंड अळीसही हे बीटी वाणं लवकरच बळी पडताहेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बीटी लागवडीचे विशेष तंत्रज्ञान आहे. आपण ते पाळतो का? याचाही कीटकनाशक फवारण्यापूर्वी विचार होणे गरजेचे आहे. विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे बोंड अळी नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱ्या फवारण्यांपेक्षा अधिक फवारण्या रसशोषक किडी आणि लाल्याची विकृती घालविण्यासाठी शेतकऱ्यांना कराव्या लागत आहेत. 

विदर्भ हे राज्यातील कापसाचे आगार. येथील जमिनीस ‘ब्लॅक कॉटन सॉईल’ म्हणून संबोधिले जाते. पांढरे सोने म्हणून हे पीक विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये नावारुपाला आले आहे. सुरवातीस या पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली. पण आता कापसावर रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या वापराचे प्रमाण भयंकर वाढले आहे. त्यातच बोगस कीडनाशके, औषधांचे अनियंत्रित प्रमाण यामुळे आज ही किटकनाशके किडीऐवजी शेतकऱ्यांचा जीव घेत आहेत. कीटकनाशक फवारणीमधील शेतकऱ्यांचे मृत्यू मानवी चुकांमधून झाले आहेत, हे सत्य असले तरी कीटकनाशके निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेते आपली जबाबदारी झटकून टाकू शकत नाहीत.

शासनाने प्रत्येक शेतकऱ्यास फवारणीसाठीचे संरक्षक किट देण्याचे ठरविले असले तरी ते वापरणे बंधनकारक करावे लागेल. ज्याच्याकडे संरक्षण किट आहे, त्यालाच कीटकनाशक मिळणार हे संगणकामार्फत (डिजिटल तंत्र) सहज राबविता येऊ शकते. आदिवासी, मजूर टोळ्यांना फवारणीचे तांत्रिक शिक्षण देणे गरजेचे आहे. बीटी लागवडीच्या प्रगत तंत्राबाबतही जागृती गरजेची आहे. औषधे (मेडिसीन) विक्रीची दुकाने ज्या पद्धतीने डिजिटल केली आहेत, त्याच आधारावर कीटकनाशके विक्री करणारी दुकाने डिजिटल हवीत आणि शासनातर्फे त्यांची विक्री व साठा यांची मासिक नोंद घेण्यात यायला हवी. शासन आणि कृषि विद्यापीठांद्वारे राबविण्यात येणाऱ्या शाश्‍वत आणि संरक्षित उपाययोजनांमधून भविष्यात शेतकऱ्यांचे असे बळी थांबविणे शक्‍य आहे. शेतकऱ्यांच्या प्रवास विषयुक्त शेतीकडून विषमुक्त शेतीकडे असावा, असे मला वाटते.

ड़ॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

इतर संपादकीय
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
सेवा कसली, ही तर चक्क लूटबॅंकांच्या सेवांमध्ये काही त्रुटी असतील तर...
‘परभणी शक्ती’ने मिळेल ज्वारीला बळआपला आहार हा रिजन अन् सिझन स्पेसिफीक असला पाहिजे...
संकट टाळण्यासाठी...मागच्या वर्षी वऱ्हाड प्रांत आणि खानदेशामध्ये...
निर्यातवृद्धीनेच मिळेल हमीभावाला बळखरीप पिकांना हमीभाव जाहीर झाल्यानंतर एकूणच...
कृषी तंत्रनिकेतनचा सावळा गोंधळखरे तर एकूणच कृषी शिक्षणाचे राज्याचे काय धोरण...
अपरिणामकारक उतारादुधाचा वाढलेला उत्पादन खर्च आणि मिळणारा कमी दर,...
‘कृषी तंत्रनिकेतन’ संस्थाचालकांची...शै क्षणिक वर्ष २०००-०१ पासून कृषी पदविका हा...
‘कार्टेल’चा कचाटाकेंद्र शासनाने पीक उत्पादन खर्चाच्या ‘एटू एफएल’...
हमीभाव आणि भाववाढचालू खरीप हंगामासाठी १४ पिकांचे हमीभाव केंद्रे...
प्रत्येक शेतच व्हावे कृषी विद्यापीठआमच्या सदनिकेच्या गॅलरीमध्ये विराजमान असणारी...
उद्यमशीलतेअभावी अन्नप्रक्रियेला ‘ब्रेक...भारतीय खाद्यान्न प्रसंस्करण उद्योग कात टाकत...
झुंडशाही नाही चालणारआठवड्यापूर्वी धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे...
दीडपट हमीभावाचा दावा फसवादेशभरातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र-राज्य शासनबाबत...
लबाडाघरचं आवतणकेंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत...
कापसाच्या भावातील तेजी टिकेल?अमेरिका आणि चीनच्या व्यापारयुद्धामुळे भारतातून...
कापूस उत्पादकता वाढीची दिशादेशात बीटी तंत्रज्ञानाच्या आगमनापूर्वी कापसाची...
कायद्याचे उल्लंघन, कारवाई होईल?मंत्री आणि नोकरशहा करतात काय? माहिती अधिकार...
ई-व्यापार फायदे अपार‘राष्ट्रीय कृषी बाजार’ (ई-नाम) या केंद्र...