आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास

ग्राहक बॅंकेत न जाताच तो आपले खाते बॅंक वेबसाइट किंवा वैकल्पिक डिलिव्हरी चॅनेलच्या माध्यमातून इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीचा वापर करून चालवू शकतो. यातून ग्राहकांचा वेळ व श्रम वाचतात. मात्र, अशा व्यवहारासाठी बॅंकांनी ग्राहकांचा विश्‍वास संपादन करणे आवश्‍यक आहे.
संपादकीय
संपादकीय

संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग व्यवस्थेने आर्थिक सुधारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. अर्थात, याची बीजे आर्थिक सुधारणा हाती घेतानाच आपण रोवली होती. आधुनिक बॅंकिंग क्षेत्रात संपूर्ण बॅंकिंग प्रक्रियेला रूपांतरित करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहाराच्या कसोटीवर ते खरे उतरले आहे. बॅंकिंगची वृद्धीकडे झपाट्याने वाटचाल होत असताना त्यात आता लवचिकताही आली आहे. याच वेळी नैतिक पातळीवर ती सामर्थ्यवान ठरते आहे किंवा नाही, याचाही अभ्यास करण्यात आला. २१व्या शतकात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आणि उद्धवलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बॅंका सक्षम आहेत, असे दिसून आले आहे. आधुनिक बॅंकिंगच्या विशेषत: अशा आहेत... -   आधुनिक भारतीय बॅंकिंगचे रूपांतर ‘बॅंकिंग ते क्‍लिक बॅंकिंग’ झाल्याचे आपणास दिसून येईल. ग्राहकांना विशेष महत्त्व आल्याने तो आपल्या अटी व शर्ती बॅंकांसमोर मांडू लागला आहे. ग्राहकांना अशी सेवा पाहिजे आहे, की कुठेही, केव्हाही, कोणत्याही प्रकारे तो बॅंकांतील व्यवहार करू शकेल.   

-  बॅंकिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन बॅंकांनी नवनवीन तंत्रज्ञान बॅंकांमध्ये आणले असून, ग्राहक टिकविण्यास व त्यांना आकर्षित करण्यासाठी ग्राहकानुकूल योजना उपलब्ध करून दिल्यात. ग्राहक जागरुक, संवेदनशील आणि विशेष अपेक्षा ठेवणारा आहे, हे बॅंकांनी ओळखले आहे.

-   बॅंकांनी परंपरागत माध्यमांना बाजूला सारून एटीएम, इंटरनेट बॅंकिंग, पीओएस टर्मिनल, मोबाईल बॅंकिंग, मोबाईल वॉलेट, टेलि बॅंकिंग, मोबाईल ॲप, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एनइएफटी, आरटीजीएस, सोशल बॅंकिंग, ईसीएस, स्मार्ट कार्ड इत्यादी तंत्रज्ञान सेवांचा अवलंब करून बॅंकांना उच्च स्तरावर पोचविले आहे. बॅंकिंग उद्योगासाठी हा सकारात्मक संकेत आहे. 

-   जुलै २०१५ पासून भारतात औपचारिकरीत्या डिजिटल इंडियास सुरुवात झाली. आज डिजिटल बॅंकिंगद्वारा फंड ट्रान्फर, ऑनलाइन बिलाचा भरणा, बस, रेल्वे, विमान प्रवास यांची तिकिटे, ऑनलाइन शॉपिंग, बॅंकांकडून वारंवार ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सूचना त्वरित मिळू लागल्यात. डिजिटल बॅंकिंगमुळे कागदी पत्रव्यवहार थांबला असून, २४ तास सेवा इलेक्‍ट्रॉनिक माध्यमद्वारा प्राप्त होऊ लागल्या आहेत. ग्राहक बॅंकेत न जाताच तो आपले खाते बॅंक वेबसाइट किंवा वैकल्पिक डिलिव्हरी चॅनेलच्या माध्यमातून इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीचा वापर करून चालवू शकतो. यातून ग्राहकांचा वेळ व श्रम वाचतात. मात्र, अशा व्यवहारासाठी बॅंकांनी ग्राहकांचा विश्‍वास संपादन करणे आवश्‍यक आहे.

-   सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या गरीब ग्राहकांना आधुनिक बॅंकिंग तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात आलेला आहे. अनेक बॅंकांनी मोबाईलसाठी इंटरनेट बॅंकिंग ॲप तयार केले आहेत. ते डाउनलोड करून ग्राहक अत्यंत सहजरीत्या बॅंकिंग सेवाचा उपयोग करून घेऊ शकतात. एम वॉलेट, एम पासबुक, एम पैसा व पेटीएमसारखे मोबाइल ॲप प्रमुख लोकप्रिय आहेत. 

-   पेटीएम, मोबिक्विक अशा अनेक कंपन्या बॅंकांकडून शुल्क आधारित व्यवसाय मोठ्या प्रमाणात हस्तगत करीत आहेत. ग्राहकांच्या किमान गरजांची पूर्तता करण्यासाठी या कंपन्या बॅंकांना शह देण्यासाठी टपून बसल्या आहेत. ग्राहकांना टिकवून ठेवणे आणि नवीन ग्राहक मिळविणे, यासाठी त्या शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. यासाठी बॅंकांनी आपल्या व्यवसायात अधिकाधिक सुधारणा करून ग्राहकांना सेवा दिली पाहिजे.

-   आज आपली अर्थव्यवस्था रचनात्मक आणि प्रभावी होत आहे. सध्या भारतीय बॅंका एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचल्या असून, त्यांच्या कार्य पद्धतीत नित्य नवे बदल होत आहेत. नवीन खासगी बॅंका, विदेशी बॅंकांचा प्रवेश, पेमेंट बॅंका, लघु वित्त बॅंक इत्यादींची स्थापना, मुक्‍त व्याजदर, विमा सेवा, गुणवत्तापूर्ण स्पर्धा, आयएसओ प्रमाणपत्र आदींमुळे बॅंकांच्या सेवेत आमूलाग्र परिवर्तन होत आहे.   

-  जागतिकीकरणासोबतच खासगीकरण, स्वयं-बॅंकिंग यांसारख्या कल्पनांना जन्म देऊन बॅंका-बॅंकांमध्ये गळेकापू स्पर्धा सुरू झाली आहे. बॅंकांसमोर असलेल्या या जोखीमांचा सामना करणे अनिवार्य आहे. त्या कमी करता येण्यासारख्या नाहीत, मात्र त्याला निश्‍चितच शह देता येईल, अशी यंत्रणा निर्माण केली पाहिजे.

-   बॅंका अनेक योजनांतर्गत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. त्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टार्ट/स्टॅण्डअप योजना, शिक्षा ऋण, किसान क्रेडिट कार्ड, लघुवित्त ऋण, कौशल्य विकास ऋण यांसारख्या सबसिडीवर आधारित कर्ज, अशा अनेक योजनांचा समावेश आहे. 

-   जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण, तसेच अद्ययावत माहिती तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस ग्राहकांची बॅंकांकडून अपेक्षा वाढत जाणार आहे, हे निश्‍चित. 

-   बॅंकांकडून ग्राहकांना दिल्या जाणारे धनादेश (चेक) प्रणालित बदल करण्यात आला आहे. चेकचा आकार, माइकर कोड, प्रिंटेड चेक, कागदाचा दर्जा, वॉटर मार्क, बॅंकेचा लोगो यासाठी काही मानके निश्‍चित केली आहेत.    या सर्व बाबी बॅंकांनी हाताळत असताना प्रशिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये ग्राहकांपासून ते व्यावसायिकांपर्यंतचा समावेश होतो. आर्थिक सुधारणाची गती अधिक तीव्रतेने वाढत जाणारी आहे. त्या गतीबरोबर बॅंकांनाही आपले मार्गक्रमण करावे लागणार आहे.

प्रा. कृ. ल. फाले : ९८२२४६४०६४  (लेखक राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्थेचे संचालक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com