मला भेटलेले डॉ. लालजी सिंह

जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉ. लालजी सिंह यांचे रविवार ता. 10 डिसेंबर 2017 ला निधन झाले आणि माझ्यासारख्या अनेकांना धक्का बसला. जैवविज्ञान प्रयोगशाळेत अविश्रांत संशोधनकरणाऱ्या या ध्येयवेड्या वैज्ञानिकांच्या कार्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...
मला भेटलेले डॉ. लालजी सिंह

डॉ. लालजी सिंह यांचा माझा परिचय १९७७-७८ पासूनचा. नागपूरच्या ‘निरी’ या केंद्र शासनाच्या संस्थेत मी संशोधक म्हणून कार्यरत असताना मला त्यांच्याबरोबर डीएनए फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञानच्या संशोधन प्रकल्पावर हैदराबादच्या ‘सेंटर फॉर सेल्युलर मॉल्युक्‍युलर बायोलॉजी’ (सीसीएमबी)मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. तीन-चार वेळा आमच्या भेटी झाल्या, पण केंद्र शासनाची कायम नोकरी सोडून प्रकल्पावर काम करणे मला थोडे अवघड वाटले आणि एक सोन्यासारखी संधी माझ्या हातून निसटून गेली. गेल्या ३५ वर्षांच्या माझ्या वैज्ञानिक वाटचालीमध्ये या हरवलेल्या संधीची मला अनेकवेळा आठवण येते. डॉ. लालजी अतिशय मनमिळावू, प्रेमळ आणि सहकाऱ्यांना मनस्वी जीव लावणारे जैवतंत्रज्ञानाचे वैज्ञानिक होते. मूलभूत विज्ञानावर त्यांचे फार प्रेम होते.  मला लालजी मनापासून आवडले ते शेतकरी म्हणून. उत्तर प्रदेशामधील जौनपूर जिल्ह्यामधील कलवारी हे त्यांचे गाव. वडील शेतकरी आणि गावचे सरपंच. गावानजीकची वाहती नदी, पारंपरिक शेती, मातीचा सुगंध यातच त्यांचे बालपण आणि शालेय जीवन पार पडले. कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा होती; पण या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आले तरच शेती आणि शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो, या एका वेगळ्या प्रेरणेने त्यांनी बनारस विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात प्रवेश घेतला. आपल्या देशात त्या वेळी फक्त याच विद्यापीठात हे तंत्रज्ञान जन्मास येऊ लागले होते.  डॉ. लालजींचे वडील त्यांच्या शेतीत नेहमी वेगवेगळे प्रयोग करत आणि त्या संबंधीची चर्चा सरपंच या नात्याने चावडीवर करत असत. ‘‘माझा मुलगा मोठा झाल्यावर याच क्षेत्रात मोठा शास्त्रज्ञ होणार आहे’’, हे ते नेहमी लालजींकडे बोट दाखवून गावकऱ्यांना सांगत असत. त्यांच्या शेतात त्या काळी ते जवळपास २५ ते ३० प्रकारची खरीप आणि रब्बीची पिके घेत, त्यांचे बियाणे साठवत. लालजींच्या वडिलांची शेती म्हणजे एक ‘जीन बॅंक’च होती. लालजींना जीन आणि डीएनएमध्ये जी रुची निर्माण झाली, त्यास मुख्य कारण म्हणजे त्यांच्या गावामधील शेतातील विविध पारंपरिक पिकांची श्रीमंती.  हैदराबादच्या सीसीएमबी संस्थेत त्यांनी डीएनए फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञानास १९७५ पासून सुरवात केली आणि पुढील दहा वर्षांत त्यास पूर्णपणे विकसित केले. ‘मानवी जिनोम’च्या अभ्यासामध्ये डॉ. लालजींचे विकसित राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांमध्ये मानाचे स्थान होते. नंदन निलकेणी यांनी बोटांच्या ठश्‍यांवरून ‘आधार कार्ड’ची संकल्पना विकसित करून प्रत्येक व्यक्तीस स्वतःची ओळख निर्माण करून दिली. जगामध्ये अब्जावधी लोक राहतात. प्रत्येक जणाची चेहरेपट्टी वेगळी असते. हे व्यक्ती व्यक्तीमधील वेगळेपण त्यांच्यातील डीएनए ठरवितात. प्रत्येकाचे बोटाचे ठसे जसे वेगळे असतात तसेच पेशीच्या पातळीवर डीएनएसुद्धा वेगळे असतात आणि म्हणूनच आपली चेहरेपट्टी इतरांपेक्षा वेगळी असते, यालाच डीएनए फिंगरप्रिंट म्हणजे ‘जनुकीय ठसा’ म्हणतात. भारतामध्ये या संशोधनाचा पाया डॉ. लालजी सिंह यांनी घातला.  वन्यजीव संवर्धन आणि रक्षण हा त्यांच्यासाठी दुसरा जिव्हाळ्याचा विषय होता. पारंपरिक पद्धतीने राखलेली देशी वृक्षवेलींची जंगलेच वन्यजीवांना आश्रय आणि अन्न देऊ शकतात या त्यांच्या मताबद्दल ते कायम आग्रही होते. जनुकीय आजारावर त्यांचे संशोधन कायमच श्रेष्ठ दर्जाचे राहिले. आदिवासींमध्ये आढळणाऱ्या ‘सिकल सेल ॲनेमिया’ या अनुवंशिक आजारावर अभ्यास करताना मी अनेकवेळा त्यांचा सल्ला घेतला होता. आदिवासींच्या डीएनए फिंगर प्रिंटिंगबद्दल त्यांना कायम उत्सुकता होती. अंदमान निकोबारमधील अस्तंगत होत असलेल्या आदिवासी जाती-जमाती, त्यांचे आशिया खंडामधील इतर आदिवाशींसी साम्य, त्यांचे स्थलांतर, आफ्रिका खंडाशी त्यांचा संबंध यावरचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे आहे. ठाणे जिल्ह्यामधील कातकरी जमातीबद्दलची दुर्मीळ माहिती मी त्यांना याच कामासाठी दिली होती. आज या जमातीस संरक्षणाची आणि संवर्धनाची गरज आहे.  पारंपरिक पिके, त्यांचे बी-बियाणे, त्यांच्यामधील रोगप्रतिकारकशक्ती यामध्ये त्यांना विशेष रुची होती. हजारो वर्षांपासून भारतीय शेती समृद्ध करणाऱ्या; पण आता अस्तंगत होत राहणाऱ्या या पिकांची जनुकीय बॅंक असावी, त्यांचे डीएनए फिंगरप्रिंट्‌स असावेत, यासाठी ते प्रयत्नशील राहिले. भारतीय शेती ही मोजक्‍या पिकांपुरती मर्यादित न राहता अनेक पारंपरिक पिकांना समावेश करून घेणारी असावी, असे ते आग्रहाने म्हणत. प्रत्येक पिकामध्ये स्वतःची एक वेगळीच प्रतिकारशक्ती असते आणि त्या प्रतिकारशक्तीस जागृत करण्यासाठी तिला स्वतःचा असा नैसर्गिक आहार आवश्‍यक असतो, हेच आज आपण विसरलो आहोत. मूलभूत विज्ञान आम्हास हे सर्व शिकविते; पण आम्ही त्यास दूर ढकलून आधुनिक कृषी विज्ञान शास्त्राचे इमले चढविण्यास सुरवात करतो. आणि जेव्हा बोंड अळीसारखा हाडविरहित शूद्र कीटक हे इमले काही काळात भुईसपाट करतो; तेव्हा माझ्या उद्‌ध्वस्त बळिराजाने कुणाकडे बोट दाखवावे? डीएनए फिंगरप्रिंटिग हे त्याचे क्षेत्र नाही. बी पेरून उत्पादन घेणे हे त्याचे काम; पण पेरलेले बी खरेच रोगप्रतिबंधक आहे का? कृषी क्षेत्रात सातत्याने नवीन वाणांचा शोध चालू असतो. या शोधयात्रेत आपण त्यांच्या पूर्वजांना पूर्णपणे विसरून जातो. डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाने या पूर्वजांचे स्मरण करून आपण कृषी क्षेत्रावर आलेले संकट सहज दूर करू शकतो. बाजारात नवीन बी-बियाणे सातत्याने येत असतात, पण त्याचे माता-पिता कोण, बियाणे खरेच खात्रीचे आहे का, हे या तंत्रज्ञानानेच समजू शकते. जनुकीय बदल करून बीटी वाण आले, पण खरेच तो बदल यशस्वी झाला का, हा बदल किती काळ टिकणारा आहे, याबाबत जागृत होणे गरजेचे असते, आज तसे झाले असते तर बोंड अळीचा एवढा प्रादुर्भाव झालाच नसता. जनुकीय बदल करून निर्माण केलेले वाण उत्पादन भरपूर देते; पण त्याची शास्त्रीय कसोटीवर हाताळणी करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. वातावरण बदल हे भारतीय कृषी क्षेत्रावर आलेले नवे संकट आहे. या ताणतणावास कसे सामोरे जावयाचे याचे जनुकीय विज्ञान विकसित करणे हे आपल्यासमोर एक मोठे आव्हान आहे. डॉ. लालजी सिंह यांनी डीएनए फिंगरप्रिंटिंगचा पाया आपल्या देशामध्ये घातला. याचा फायदा आज न्यायालये, वैद्यकीय क्षेत्रच जास्त घेत आहेत. मात्र कृषी क्षेत्र काही अपवाद वगळता अजूनही पूर्णपणे उपेक्षितच आहे. शेतातील पिकांच्या उत्पादनास महत्त्व देण्याआधी त्या पिकांच्या पेशींचा आणि त्यामधील जनुकांचा सन्मान केला तरच डॉ. लालजी सिंह यांना खरी श्रद्धांजली ठरावी! डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com