अर्थशास्त्र बावीस एकर शेती मालकाचे

बावीस एकरांचा शेतकरी, त्याच्या घरातील चोवीस तास राबणारे कुटुंबीय त्यांची मजुरीच कशीबशी त्यांच्या पदरात पडत असेल, तर शेतात तयार झालेल्या उत्पादनाच्या हिशेबाचे काय; आणि ज्यांच्या घरी राबणारे हात नाहीत, त्या शेतकरी कुटुंबांचे काय?
संपादकीय
संपादकीय

दत्तू पाटील (नदीवाडी ता. निलंगा जि. लातूर)  या माझ्या शेतकरी मित्राला मी पंचवीस वर्षांपासून ओळखतो. त्यांच्या आणि भावाच्या वाटण्या झाल्या त्या वेळी त्यांच्या वाट्याला तेरा एकर जमीन आणि गावातील जुने घर वाटून आले. आत्ता त्यांच्याकडे बावीस एकर जमीन आहे. सगळ्या शेताला हंगामी पाणी मिळायची व्यवस्था केलेली आहे. शेतात चांगले आरसीसीचे घर बांधले आहे. दोन मुलांसह स्वतः व त्यांची बायको मिळून शेती करतात. एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं आहे. दोन्हीही मुलांचे पण लग्न होऊन त्यांना दोन दोन लेकरांसह संसार सुरळीत चालू आहेत. सगळे कुटुंब एकत्र नांदते आहे. कधी काळी मुंबईला नोकरी लागली होती, ती सोडून आवडीने शेतात रमले. तिघे बापलेक आणि आई रात्रंदिवस शेतात राबत असतात. परवा गेलो त्यावेळी सांगत होते, ‘‘तीन लाखाची  हरभऱ्याची रास हमी नवरा बायकोनंच केलाव बगा’’ आता त्यांचे वय साठीच्या पार झालेले आहे म्हणजे निवृत्तीचे वय. या वयातसुद्धा ते तरुणपणातील तडफेने काम करतात. सगळे कुटुंब पहाटे पाच साडेपाच वाजेपासून कामाला लागलेले असते ते रात्री झोपेपर्यंत सतत कामातच असते. हे राबणे वर्षभर चालू असते. ज्यावेळी शेतातच कामाची लगबग कमी असते, त्या वेळीच काय सवड मिळायची ती मिळते. याशिवाय एक सालदार गडी असतोच. एखादे दिवशी कामात हायगय झाली तर काही तरी गुन्हा घडलाय, असा भाव घेऊन हे कुटुंब जगते आणि वावरते. 

अशा कुटुंबाचे कारभारी दत्तू पाटील यांनी त्यांच्या कर्तबगारीने नऊ एकर जमीन कमावली. लातूरला अर्धा प्लॉट घेऊन बांधकाम केले. शेतात मोठे घर बांधले, मुलामुलीचे लग्न पार पाडले, शिवाय घरातील प्रत्येक सदस्याच्या नावाने पूर्वीपासूनच विमा काढलेला आहे. नातवांच्या शिक्षणासाठी लातूरला घर केले आहे. एक सून तिकडे मुलांना घेऊन राहते. सुनांना मात्र शेतातील कामाला नेले जात नाही. रुपया रुपया काटेकोरपणे खर्च करण्याचा स्वभाव त्यामुळे अवांतर खर्च फारसा होतच नाही. परवा गप्पा मारता मारता विषय निघाला मी विचारले, ‘‘किती माल झाला पाटील?’’ म्हणाले, ‘‘आठ लाखाचा होईल, अशा कमी भावानेसुद्धा. यावर्षी तूर, हरभरा आणि सोयाबीन या तीनही पिकांचे बाजारभाव पडलेले असल्यामुळे तेही हैराण झालेले दिसले. मुख्यतः त्यांचेकडे  सोयाबीन, तूर, हरभरा ही तीनच पिकं घेतली जातात. घरच्या पुरते गहू, ज्वारी अशी पिकं थोड्या प्रमाणात घेतात. या शिवाय थोडा ऊस असतो, बाकी सगळ्या पिकांना फटका बसला तर हे उसाचे पीक निभावून नेते. तर असे हे दत्तू पाटील ज्यांनी साधारण सरकारी नोकरदार कमावतो तेवढी कमाई केली आहे. म्हटलं तर ते शेतकऱ्यांच्या ‘सक्सेस स्टोरी’ या व्याख्येत बसतात. मागच्या महिन्यात आमच्या गप्पा झाल्यावर मला अनेक प्रश्न पडायला लागले. शेतकऱ्यांचे फार हाल चालले आहेत, असे आपण सारे म्हणत असतो त्या वेळी असे दत्तू पाटलासारखे शेतकरी समोर आल्यावर काय समजावे? शेतकऱ्याचे फार बरे चाललेले आहे, असा याचा अर्थ निघतो का? याच राज्यातील अनेक शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतात, हे वास्तव कसे नाकारायचे? त्यांच्या यशाचे इंगित कशात असावे?

मी ज्या वेळेपासून बघतोय तसे हे कुटुंब आजच्याच तन्मयतेने  शेतात काम करते आहे. या वर्षीचाच हिशेब केला तर तीन बापलेकाची मजुरी तीनशे रुपये रोजचे गृहीत धरली तर तीन लाख चोवीस हजार होतात. एका बाईचे दीडशे रुपये रोज गृहीत धरले तर वर्षाचे चोपन्न हजार होतील म्हणजे घरातील चार जणांची वर्षाची मजुरी तीन लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये होतील. खरे तर ही मजुरी त्यांच्या कामाचा झपाटा बघता खूपच कमी आहे. कारण ते जेवढे काम करतात तेवढे काम बाहेरील माणसांकडून करून घ्यायला त्यांच्यापेक्षा किमान दीडपट मजुरी नक्कीच द्यावी लागली असती. घरातील या सगळ्यांना स्वयंपाक करून घालणारी सूनबाई वेगळीच आहे. तिच्या कष्टाचा येथे विचाराचं केला नाही. या बावीस एकर शेतीचा वार्षिक हिशेब तपासायला गेलं तर काय चित्र समोर येईल?  ३,७८,००० रुपये घरातील माणसांची मजुरी  ८०,००० रुपये सालदार गड्याची मजुरी  २,००,००० रुपये बी बियाणे, खत, खुरपण, वाहतूक, काढणी आदी खर्च.  ६,५८,००० रुपये एकूण खर्च  या खर्चात शेतीचे भाडे, त्यावरील व्याज इत्यादी खर्च गृहीत धरलेला नाही. वर्षभरातील एकूण उत्पादन आठ लाखांचे झाले, असे दत्तू पाटील सांगत होते. याचा अर्थ या वर्षी हातात एक लाख बेचाळीस हजार रुपये खर्च वजा जाता जास्तीचे पडले. या एक लाख बेचाळीस हजारांत वर्षभराचे कुटुंबाचे खाणेपिणे, कपडे, मुलांचे शिक्षण, पाहुण्यांचे लग्न, दवाखाना, प्रवास आदी खर्चाचा हिशेब गृहीत धरल्यानंतर दत्तू पाटलांच्या हातात काहीही शिल्लक राहत नाही. गेलेले वर्ष त्यांच्यासाठी अस्मानीची कृपा असलेले वर्ष होते. म्हणजे शंभर टक्के पिकलेले वर्ष होते. असे अस्मानीची कृपा असलेले वर्ष सरासरी चार पाच वर्षांनी एखादे वेळी येत असते. त्यामुळे हाच हिशेब दरवर्षी  येईल असे नाही. नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान गृहीत धरले तर शेतात येणारा खर्च आणि हातात येणारा पैसा यांची बरोबरी होईल, कधी कधी उत्पादन कमी झाले तर मोठी तूटही येवू शकते. शेतात लागणारी मजुरी वाचवून आणि स्वतः काबाडकष्ट करून वाचवलेल्या पैशामुळे त्यांना हे जमले आहे. घरातील काम करणाऱ्या माणसांच्या श्रमाचा मोबदला घरातच राहत असतो, तेच मजूर बाहेरून कामाला लावावे लागले असते तर दत्तू पाटलांना एवढी कमाई करता आली नसती. मजुरी देता देता ते हैराण झाले असते कर्जबाजारी झाले असते, हे तेही मान्य करतात.

बावीस एकराचा शेतकरी, त्याच्या घरातील चोवीस तास राबणारे कुटुंबीय त्यांची मजुरी कशीबशी पदरात पडते, हा हिशेब येत असेल तर शेतात तयार झालेल्या उत्पादनाच्या हिशेबाचे काय? हा खरा प्रश्न आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देत देत काढलेल्या दोनशे तीनशे क्विंटल उत्पादनाचा पैसा जातो कुठे? फक्त मजुरी पदरात पडत असेल तर ज्यांच्या घरी शेतात राबायला माणसाची कमतरता आहे, त्यांचे काय? शेतीउत्पादन हे प्राथमिक उत्पादन आहे. कोणत्याही प्राथमिक उत्पादकाला त्याच्या उत्पादनातील ते उत्पादन पक्के होऊन ग्राहकाला विकत घ्याव्या लागणाऱ्या किमतीतील किती लाभ मिळवता येऊ शकतो, यावर शेतकऱ्यांना भाव मिळवता येऊ शकतो. तो लाभ पदरात पडून घेता येईल अशी रचना तयार झाल्याशिवाय शेती व्यवसायाचे प्रश्न सुटायला सुरवातही होणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचे सारे उत्पादन फुकटात बाजारात नेऊन टाकावे लागेल. त्यापुढील कमाईत शेतकऱ्यांना वाटा मिळवता येणार नाही. आपण राबलेल्या मजुरीवरच त्यांना समाधान मानावे लागेल. त्यांचे अतिरिक्त उत्पादन लुटले जाईल आणि शेतकरी हतबलपणे पाहात राहील आणि हे लुटीचे सत्र असेच सुरू राहील. (दत्तू पाटील ः ९४२१३७८००८)

अनंत देशपांडे : ९४०३५४१८४१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com